Monday, 24 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.09.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24  September 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ सप्टेंबर २०१दुपारी १.०० वा.

****



 सिक्किम राज्यातल्या पेकयाँग विमानतळाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्यात आलं. हे विमानतळ सिक्किम राज्यातलं पहिलं आणि देशातलं शंभरावं कार्यरत विमानतळ असणार आहे. साडेपाचशे कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेलं हे विमानतळ समुद्रसपाटीपासून साडेचार हजार फूट उंचीवर आहे. येत्या चार ऑक्टोबरला या विमानतळावरून उड्डाणं सुरू होत असून, सुरुवातीला ही सेवा देशांतर्गत असेल आणि काही काळानंतर नेपाळ, बांगलादेश आणि भूतानसाठी आंतरराष्ट्रीय सेवाही सुरू होणार आहेत. या विमानतळाला उडान योजनेत समाविष्ट करण्यात आल्याचं यावेळी पंतप्रधानांनी सांगितलं. हे विमानतळ म्हणजे  भारतीय अभियंत्यांच्या क्षमतेची कमाल आहे, असं सांगून, पंतप्रधानांनी यासाठी काम केलेल्या कर्मचाऱ्यांचं आणि अभियंत्यांचं कौतुक केलं. देशातल्या शंभर विमानतळांपैकी पस्तीस विमानतळं गेल्या चार वर्षात निर्माण झाल्याचं सांगून, फक्त सिक्कीमच नव्हे, तर अरुणाचल प्रदेशासह देशभरात अनेक विमानतळं सुरू केली जात असल्याचं, पंतप्रधानांनी सांगितलं. सिक्कीममध्ये विमानतळासोबतच रेल्वे आणि रस्ता मार्गे दळणवळणाच्या सोयी विकसित करत असल्याचं सांगत, आपल्या सरकारनं देशाच्या सर्व भागांमध्ये, जलद गतीनं आणि लोकहितासाठी, काम केल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.

****



 पश्चिम बंगालच्या पूर्व दिनाजपूर जिल्ह्यात, पोलिसांच्या कथित गोळीबारात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षानं येत्या सव्वीस तारखेला पश्चिम बंगालमध्ये बारा तासांच्या बंदचं आवाहन केलं आहे. या विद्यार्थ्यांचा पोलिसांकडून मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला असून, या घटनेचा सीबीआयकडून तपास व्हावा, अशी मागणीही केली आहे.

****

 २०२२ साली होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा तसंच राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धांसाठी संभाव्य पदक विजेत्यांना सरकारकडून यापुढेही सहाय्य मिळत राहील, असं आश्वासन क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी दिलं आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेकडून आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या पदक विजेत्यांचा सत्कार काल नवी दिल्लीत करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. क्रीडा मंत्रालय अशा खेळाडूंना आवश्यक ते सगळं सहाय्य करेल, असं त्यांनी सांगितलं.

****

 गोव्याच्या मंत्रिमंडळातून दोन मंत्र्यांना वगळण्यात आल्याची माहिती गोव्याच्या मुख्यमंत्री कार्यालयानं आज दिली. भाजपचे सदस्य असलेले, नगर विकास मंत्री फ्रान्सिस डीसोझा आणि ऊर्जामंत्री पांडुरंग मडकईकर यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आहे. हे दोघेही काही काळापासून आजारी असल्यानं रुग्णालयात दाखल आहेत. या दोघांच्या जागी नीलेश काब्राल आणि मिलिंद नाईक, हे भाजपचे सदस्य आज संध्याकाळी मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी  पत्रकात म्हटलं आहे. मनोहर पर्रीकर हे गोव्याच्या मुख्यमंत्रिपदावर कायम राहणार असल्याचं तसंच मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचं, काल भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी सांगितलं होतं.

****



 राज्यातल्या कुष्ठरुग्णांचं आजपासून सर्वेक्षण सुरू होत असून, ही मोहीम येत्या नऊ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य संचालक डॉक्टर संजीव कांबळे यांनी दिली आहे. यासाठी एकाहत्तर हजार पथकं राज्यभरातल्या घराघरात भेट देऊन कुष्ठरोग्यांचा शोध घेणार असून, त्यानंतर रुग्ण आढळल्यास, गरजेनुसार उपचारही देण्यात येणार आहेत. राज्यातूनच नव्हे तर देशातून कुष्ठरोगाचं समूळ उच्चाटन करणं, हे या मोहिमेचं उद्दिष्ट असून, सगळ्या नागरिकांनी यामध्ये सहकार्य करावं, असं डॉक्टर कांबळे यांनी म्हटलं आहे.

****

 वर्धा यवतमाळ नांदेड या नवीन रेल्वेमार्गाचं काम प्रगतीपथावर असून, यवतमाळ इथं काल खासदार भावना गवळी यांच्या हस्ते रेल्वे रुळांसाठीच्या माती कामाला प्रारंभ करण्यात आला. यवतमाळ इथून, कळंबच्या दिशेने सुध्दा मातीकाम सुरु करण्यात आल्यानं, या कामाला वेग येणार आहे.

****

 उस्मानाबाद जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, सगळ्या प्रकल्पांमधली पाणी पातळी खालावली आहे आणि खरिपाची पिकं वाया गेल्यात जमा आहेत, असं प्रतिपादन करत, या जिल्ह्याला दुष्काळग्रस्त जिल्हा घोषित करावं अशी मागणी जनता दल सेक्युलर या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेवण भोसले यांनी उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

****

 औरंगाबाद इथं छावणी परिसरातल्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींचं विसर्जन आज होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी गणेश विसर्जनाची प्रथा आहे.

*****

***

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...