Sunday, 30 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.09.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 September 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ० सप्टेंबर २०१ सकाळी .५० मि.

****



vशेतकरी उत्पादक कंपन्यांना बाजारपेठेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vकृषी कर्जफेडीच्या एकरकमी तडजोडीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

vलातूर आणि उस्मानाबाद दुष्काळमुक्तीसाठीच्या जलसंधारण कामांचा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते किल्लारीत शुभारंभ

vउदगीर इथं होणाऱ्या ४० व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी  समीक्षक कवी डॉ. ऋषीकेष कांबळे यांची निवड

आणि

vडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या युवा महोत्सवात विद्यापीठाचा संघ प्रथम तर देवगिरी महाविद्यालयाला फिरता चषक

****



 कृषी उत्पादक कंपन्यांबाबत सर्व समावेशक आणि शेतकरी हिताचं धोरण लवकरच तयार करण्यात येईल तसंच  शेतकरी उत्पादक कंपन्यांना बाजारपेठेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी इथं एका कार्यक्रमात बोलत होते. राज्यात मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादक कंपन्या उभारून, त्यांची क्षमता वाढवली तर कृषी क्षेत्रात परिवर्तन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राळेगणसिद्धी इथं उभारलेल्या सौरऊर्जा पथदर्शी प्रकल्पाच्या धर्तीवर, राज्यात सौरप्रकल्पांची उभारणी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****



 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कृषी कर्जाच्या एकरकमी तडजोडीसाठी येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या संदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला. या योजनेअंतर्गत मुद्दल तसंच व्याजासह दीड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी त्यांच्या हिश्शाची संपूर्ण रक्कम भरण्याची मुदत येत्या ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही मुदत आज संपणार होती. हा निर्णय राज्य सरकारच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४८वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****



 भारतीय जैन संघटनेनं लातूर आणि उस्मानाबाद हे दोन जिल्हे दुष्काळमुक्त करण्यासाठी दत्तक घेतले आहेत. या दोन्ही जिल्ह्यात राबवण्यात  येणाऱ्या जलसंधारणाच्या कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दुपारी किल्लारी इथं करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे राहणार आहेत.

*****



 १९९३ मध्ये लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या प्रलयंकारी भूकंपाला आज २५ वर्षे पूर्ण होत आहेत. २९ सप्टेंबर १९९३ रोजी गणपती विसर्जनानंतर ३० सप्टेंबरच्या पहाटे तीन वाजून चाळीस मिनिटांनी हा भूकंप झाला. लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी जवळ या भूकंपाचं केंद्र होतं. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर.

 या भुकंपात लातूर जिल्ह्यात  ३हजार ६६७ व्यक्ती मरण पावल्या ४३६ व्यक्ती अपंग झाल्या. ५ हजार ९७३ जनावरेही दगावली. भुकंपग्रस्त कंमिटीनं प्रमुख १५ मागण्या ह्या शासनाकडे केल्या आहेत. भुकंपपुर्नवसन मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी शासन स्तरावर मागण्या पुर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. भुकंपग्रस्त भागातील समस्या गावकऱ्यांच्या सहभागाणं संपवण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल.

अरूण समुद्रे  आकाशवाणी बातम्यासाठी लातूर.



 या भूकंपामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा आणि लोहरा तालुक्यात अपरिमित नुकसान झालं होतं. नागरिकांचं सर्वांगीण पुनर्वसन आणि विकासासाठी ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या विविध प्रकल्पामुळे या भागाचं रूप हळुहळु पालटत आहे. या विषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर…. 



 ज्ञानप्रबोधिनीच्या या प्रकल्पात छोटे वैज्ञानिक आणि खटपट गृह यासारख्या उपक्रमातुन तसंच प्रज्ञाविकास प्रकल्पातून विद्यार्थांच्या मन आणि बुध्दीला चालना दिली जाते. किशोरी विकासाठी किशोरवयीन मुलींना  पोषक आहार, आरोग्य , स्वच्छते संबंधी मार्गदर्शन याशिवाय फळबागशेती, महिला बचत गटाचा अन्न फळ प्रक्रिया उद्योग कापडी पिशव्या तयार करण्याचा उद्योग  इथंचालवला जातोय. प्रकल्प परिसरात सौर उर्जेच्या ९० किलोवॅट वीजनिर्मितीतून वीज स्वयंपूर्णताही इथं आली आहे. डॉ. अण्णा  ताम्हणकर आणि लताताई भिंशीकर यांनी सुरू केलेल्या विविध सेवांच्या प्रकल्पाचं वटवृक्षात रूपांतर होतांना दिसतय.

देवीदास पाठक आकाशवाणी वार्ताहार उस्मानाबाद.

****



 औरंगाबाद ते चाळीसगाव या रेल्वे मार्गासह, मराठवाड्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी सकारात्मकता दर्शवल्याची माहिती मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी दिली आहे. ते काल औरंगाबाद  इथं वार्ताहरांशी बोलत होते. डॉ. कराड आणि रेल्वे कृती समितीच्या सदस्यांनी नुकतीच दिल्ली इथं रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं. यामध्ये औरंगाबाद - चाळीसगाव, तसंच रोटेगाव - कोपरगाव रेल्वेमार्ग, मुकुंदवाडी रेल्वेस्थानक इथं पीटलाईन टाकणं, मनमाड ते परभणी दुहेरी रेल्वेमार्गरोटेगाव रेल्वेस्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा, या प्रमुख पाच मागण्यांसह विविध मागण्यांचं निवेदन रेल्वेमंत्र्यांना देण्यात आलं.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचा समारोप काल प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या उपस्थितीत  औरंगाबाद इथं झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉक्टर अशोक तेजनकर होते. वेगवेगळ्या प्रकारात १६ पारितोषिकं घेऊन विद्यापीठाचा संघ या महोत्सवात प्रथम आला. तर देवगिरी महाविद्यालयाच्या संघानंही तेवढेच म्हणजे १६ पारितोषिकं प्राप्त करून, फिरता चषक पटकावला. तर कन्नडच्या शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा संघ उत्कृष्ट ग्रामीण संघ ठरला.

****



 अन्य मागासवर्गीय समाजास  राजकीय  पक्षांनी गृहीत धरू नये, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. बीड इथं समता परिषदेच्या मेळाव्यात काल ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे अध्यक्षस्थानी होते, तर आमदार जयदत क्षीरसागर प्रमुख पाहुणे म्हणून  उपस्थित होते. या मेळाव्यात मराठवाड्यातले समता सैनिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.



 तत्पूर्वी, जालना जिल्ह्यातल्या दोदडगाव इथं मंडल स्तंभाबाबत माजी आमदार डॉक्टर नारायण मुंढे यांनी लिहीलेल्या ‘गवसणी आकाशाला या कादंबरीचं विमोचन भुजबळ यांच्या हस्ते झालं.

****



 साहित्यिकांनी समाजाला विकृतीकडून संस्कृतीकडे नेण्याचं काम केलं पाहिजे, असं आवाहन ज्येष्ठ कवयित्री सिसिलिया कार्व्हालो यांनी केलं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं  काल लातूर इथं आयोजित, सतराव्या राज्यस्तरीय प्रतिभा संगम साहित्य संमेलनाचं उद्घाटन कार्व्हालो यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर होते. आज या संमेलनाचा समारोप होणार असून वास्तवातील शेती आणि साहित्यातील शेती याविषयावर परिसंवाद तसंच प्रसिध्द गीतकार संदीप खरे यांची प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे.

****



 भारतीय लष्करानं २०१६ मध्ये केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ अर्थात ‘लक्ष्यभेदी कारवाई’ला काल दोन वर्ष पूर्ण झाली. यानिमित्तानं सर्वत्र शौर्य दिन विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. मंत्रालयात माजी सैनिक तसंच वीरपत्नींचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.



 औरंगाबादच्या जिल्हा सैनिक कार्यालयाच्या वतीनं जिल्ह्यातल्या माजी सैनिक, वीरपत्नी आणि कुटुंबियांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भारतीय सैन्यामुळेच खऱ्या अर्थानं लोकशाहीचा लाभ देशातले नागरिक घेत असल्याचं निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी  यावेळी सांगितलं. 

****



 ज्येष्ठ संवादिनीवादक पंडित तुळशीदास बोरकर यांचं काल मुंबईत अल्पशा आजारानं निधन झालं, ते ८३ वर्षांचे होते. १९५० ते १९८० च्या दशकात बोरकरांनी संगीत नाटकांमधून ऑर्गनवर साथसंगत केली होती. संगीत क्षेत्रातल्या योगदानासाठी त्यांना पद्मश्री, आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.

****



 औरंगाबाद शहरात उद्भवलेल्या कचरा प्रश्नामुळे शहर विकासाचे प्रश्न मागे पडले असल्याचं मत महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं काल ‘शहरातील घनकचरा समस्या आणि व्यवस्थापन’ या विषयावर आयोजित एक दिवसीय आंतरविद्याशाखीय चर्चासत्रात ते बोलत होते. कचराप्रश्न अंतिम टप्प्यात असून तो लवकरात लवकर सुटण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा असल्याचंही महापौर यावेळी म्हणाले. निवृत्त सनदी अधिकारी कृष्णा भोगे या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी होते.

*****

***

No comments: