Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 September 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ सप्टेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
देशभरात
उद्यापासून लागू होणारी ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी
मैलाचा दगड ठरेल, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ओडिशामधल्या
तालचेर इथं आज जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते. ‘आयुष्मान भारत’ अंतर्गत असलेल्या
या योजनेत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा मिळणार
आहे. देशात आरोग्य सेवा अधिक चांगली बनवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं पंतप्रधानांनी
नमूद केलं. पंतप्रधान झारखंडमधल्या रांची इथं या योजनेची सुरुवात करणार आहेत. मुंबईत
राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या योजनेचा लोकार्पण सोहळा होणार आहे. तसंच
देशभरात जिल्हास्तरावरही या योजनेची सुरुवात होणार आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधल्या जंजगीरमध्ये तीन हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांच्या
कोनशीलेचं उद्घाटन केलं. यामध्ये बिलासपूर-पथ्रपाली या चौपदरी महामार्गासहीत, बिलासपूर-अन्नुपूर
रेल्वेरुळाच्या विकास कामांचा समावेश आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी एका शेतकरी
मेळाव्यालाही संबोधित केलं.
****
काँग्रेस
अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल लढाऊ विमान खरेदी करारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप
केला आहे. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते. राफेल करारासाठी रिलायन्स
कंपनीला निवडण्यात फ्रान्सचा काहीही संबंध नव्हता, असं फ्रान्सचे माजी राष्ट्रपती हॉलंडे
यांनी स्पष्ट केल्यानंतर गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. रिलायन्स कंपनीला यात
भागीदार करण्यात सरकारचा वैयक्तिक हेतू असल्याचं सांगून गांधी यांनी, या मुद्यावर पंतप्रधानांनी
स्पष्टीकरण द्यावं, तसंच राफेल कराराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी व्हावी, अशी
मागणी केली.
दरम्यान,
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत या आरोपांचं खंडन केलं
आहे. हा करार २०१२ मध्येच झाला होता असंही त्यांनी सांगितलं.
****
केवळ
पुस्तकी शिक्षण न देता यशस्वी माणसं घडवणाऱ्यावर रयत शिक्षण संस्थेचा भर राहणार असल्याचं
संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. सातारा इथं आज रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक
पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात
ते बोलत होते. रयत शिक्षण संस्था ही लवकरच १०० वर्ष पूर्ण करणार असून, त्यानिमित्तानं
अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम संस्थेत राबवले जातील, असं त्यांनी सांगितलं.
****
अनंत
चतुर्दशी अर्थात दहा दिवसांच्या गणपतीचं विसर्जन उद्या होणार आहे. विसर्जनासाठी औरंगाबाद
पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. याशिवाय वरीष्ठ पोलिस अधिकारी सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे
मिरवणुकीवर लक्ष ठेऊन असतील. शहरातल्या मानाच्या संस्थान गणपतीची मिरवणूक राजा बाजार
इथून निघेल, तसंच सिडको-हडको, चिकलठाणा, मुकुंदवाडी, नवीन औरंगाबाद, वाळुज औद्योगिक
वसाहत, दौलताबाद आणि हर्सुल आदी ठिकाणांहून मिरवणुका निघणार आहेत. छावणी परिसरातल्या
गणपतींचं परवा सोमवारी विसर्जन होणार आहे.
दरम्यान,
नांदेड शहरातल्या आठवडी बाजारातून मिरवणूक निघणार असल्यानं उद्या आठवडी बाजार बंद ठेवण्याचे
निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. हा आठवडी बाजार परवा सोमवारी भरवण्यात येणार
आहे.
****
बौध्दिक
संपदा अधिकाराचं जतन करणं ही काळाची गरज असल्याचं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या
लातूर इथल्या उपकेंद्राचे संचालक डॉ.डी.एन.मिश्रा यांनी म्हटलं आहे. दयानंद विज्ञान
महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित ‘बौध्दिक संपदा अधिकार’ या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय
चर्चासत्राचं उद्घाटन मिश्रा यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
****
सरकारनं
खरीप पिकांच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी लातूर काँग्रेसनं केली
आहे. लातूर जिल्ह्यात पावसाअभावी खरीप हंगामातल्या सोयाबीन, तूर, उडीद आणि मूग पिकांचं
नुकसान झालं असून, पिकांचे त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशा मागणीचं निवेदन
जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे.
****
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी,
तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी, उद्या पावसाच्या सरी कोसळतील, असं हवामान
विभागानं म्हटलं आहे.
दरम्यान, उस्मानाबाद शहर आणि परिसरात आज जोरदार पावसानं हजेरी लावली. जवळजवळ महिनाभराच्या
खंडानंतर आज पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी येत्या ३० सप्टेंबरला आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी
संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४८वा भाग असेल.
****
No comments:
Post a Comment