Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 September 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ सप्टेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
आयुष्मान
भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही मानवतेची खूप मोठी सेवा म्हणून भविष्यात ओळखली
जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. झारखंडमधल्या रांची इथं आज या
योजनेचा प्रारंभ केल्यानंतर ते बोलत होते. देशातल्या १० कोटी कुटुंबांना या योजनेचा
लाभ मिळणार असून, यात तेराशे गंभीर आजारांवर सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार
होतील. यावेळी उपस्थित केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनी, या योजनेचं देशातच
नाही तर जगभरात कौतुक होत असल्याचं म्हटलं आहे.
****
मुंबईत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी या प्रधानमंत्री
जन आरोग्य योजना योजनेची सुरुवात केली. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, सर्वसामान्य
माणसाला स्वातंत्र्योत्तर काळात खऱ्या अर्थानं अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासोबत शिक्षण,
आरोग्य आणि रोजगार याचीही सरकारनं हमी दिली असल्याची भावना व्यक्त केली. आज सर्वसामान्य
माणसासाठी आरोग्याचा खर्च हा सर्वात मोठा खर्च आहे, वातावरणातल्या बदलांमुळे रोगराईचाही
प्रादुर्भाव दिसतो, हे लक्षात घेऊनच सरकारनं ही योजना तयार केल्याचं त्यांनी सांगितलं.
या योजनेची सुरुवात म्हणजे ऐतिहासिक क्षण असल्याचं राज्यपालांनी म्हटलं. या योजनेत
देण्यात येणारी आरोग्य सेवा सर्वसामान्यांसाठी परवडणारी असेल, असंही त्यांनी सांगितलं.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी राज्यातल्या १६ लाभार्थ्यांना ई-कार्डचं वाटप करण्यात
आले.
****
औरंगाबाद
इथं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला सुरुवात
करण्यात आली. खासदार चंद्रकांत खैरे, विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी
उदय चौधरी, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, महापौर नंदकुमार घोडेले
यावेळी उपस्थित होते. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात १० लाभार्थ्यांना आरोग्य कार्डचं
वाटप करण्यात आलं. औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागातले एक लाख ४७ हजार कुटुंबं, तर
शहरी भागातल्या ९५ हजार कुटुंबांना या योजनेत समाविष्ट करण्यात आलं आहे.
लातूर
इथं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते योजनेला सुरुवात झाली असून, जिल्ह्यातल्या
दोन लाख कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे.
जालना
इथं पालकमंत्री बबनराव लोणीकर आणि खासदार रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री
जन आरोग्य योजना सुरु करण्यात आली.
****
राज्यात
सर्वत्र गणपती विसर्जन उत्साहात सुरु आहे. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात
आला आहे. औरंगाबाद शहराचं ग्रामदैवत संस्थान गणपतीपासून गणेश विसर्जन मिरवणुकीला सकाळी
अकरा वाजता प्रारंभ झाला. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे
यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात, पारंपरिक चाळीसगाव बँडच्या
ठेक्यावर ही मिरवणूक सुरू झाली असून, यंदा ढोल पथकात महिला वादकांची संख्या मोठी आहे.
विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपापली पथकं शिस्तीत या मिरवणुकीत सामील केली आहेत.
रात्री बारा वाजेपर्यंत ही मिरवणूक चालेल. जिल्हा परिषदेच्या मैदानावर विसर्जन सोहळा
सुरू आहे.
बीड
जिल्ह्यात पावसाअभावी कोणत्याही प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा नसल्यानं त्याठिकाणी विसर्जन
न करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कृत्रिम विहीरी तयार करुन
विसर्जन करण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
जालना
शहरात सकाळपासून मोती तलावावर गणेश विसर्जन सुरू आहे. घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन
करण्यासाठी नगरपालिकेनं कृत्रिम हौदाचं नियोजन केलं आहे. मामा चौकातून मान्यवरांच्या
उपस्थितीत मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.
नांदेड
इथं गोदावरी आणि आसना नदीवर विविध ठिकाणी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी
पाच वाजेपर्यंत २०० सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींचं विसर्जन करण्यात आल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
पुण्यात
अजूनही डीजेचा तिढा कायम आहे. जोपर्यंत डीजेला परवानगी देण्यात येत नाही तोपर्यंत गणपती
विसर्जन करणार नाही, असा पवित्रा पुण्यातल्या १२५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला
आहे.
****
बुलडाणा
जिल्ह्यात मेहकर-जालना रस्त्यावर चारचाकी आणि खासगी बसमध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात
पाच जण ठार, तर आठ जण गंभीर जखमी झाले. आज पहाटे हा अपघात झाला. चारचाकीमध्ये गणपती
विसर्जनासाठी जाणारं बँड पथक होतं. जखमींना रिसोडच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात
आलं आहे.
****
आशिया
कप क्रिकेट स्पर्धेत सुपर फोरमध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यान सामना सुरु असून, शेवटचं
वृत्त हाती आलं तेव्हा पाकिस्तानच्या आठ षटकात एक बाद २५ धावा झाल्या होत्या. यजुवेंद्र
चहलनं हा बळी घेतला. पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
****
No comments:
Post a Comment