Thursday, 27 September 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 27.09.2018....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 September 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ सप्टेंबर २०१८ सायंकाळी ६.००

****

मस्जिद इस्लामचा अविभाज्य घटक आहे की नाही हा मुद्दा संविधान पीठाकडे सोपवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठानं दोनास एक असा हा निकाल दिला. अयोध्या जमीन वादाच्या वेळी हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. दिवाणी वादाचा खटला पुराव्यांच्या आधारे असला पाहिजे, तसंच मागच्या निर्णयाचा यात कोणताही संदर्भ नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. यावर निर्णय सुनावताना न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी, १९९४ ला दिलेला निर्णय कोणत्या आधारावर दिला होता, हे पाहणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर यांनी दोन्ही न्यायमूर्तींपेक्षा वेगळा निर्णय दिला असून, मस्जिद इस्लामचा अविभाज्य भाग असून, यावर निर्णय धार्मिक बाबींचा विचार करुन झाला पाहिजे, असं म्हटलं आहे. अयोध्या जमीन वादवविवाद प्रकरणाची सुनावणी नव्यानं येत्या २९ ऑक्टोबरपासून सुरु होणार असल्याचं न्यायालयानं सांगितलं.      

****

निवडणुकांमध्ये पैशाचा आणि समाज माध्यमांचा दुरुपयोग रोखणं हे आव्हान आपण सर्वांनी पेलायचं आहे, असं राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई महानगरपालिका इथल्या ज्ञान केंद्र सभागृहात आज आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आयोगासाठी समान आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं. विशेषत: उच्च मध्यमवर्गीय, श्रीमंत आणि अधिक शिकलेल्या मंडळींचा मतदानासाठी अनुत्साह ही चिंतेची बाब असून, मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे, असं ते म्हणाले.

****

महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात अग्रेसर असून, भविष्यात हे स्थान कायम ठेवण्यासाठी उत्पादन क्षेत्राला शासन प्रोत्साहन देत असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं आहे. मुंबई इथं आज ‘प्लॅन्ट लिडरशिप समिट’ या विषयावरील दोन दिवसीय परिषदेत ते बोलत होते. उत्पादन क्षेत्राच्या वाढीसाठी राज्य शासन सुविधा उपलब्ध करून देत असून, विविध कंपन्यांनी राज्यात आपली गुंतवणूक वाढवावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितल्या राज्य महामार्ग, राज्य मार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांवरच्या खड्ड्यांच्या तक्रारींसाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा पी डब्ल्यू डी डॉट कॉम या संकेतस्थळावर तक्रार प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांनी खड्डे असलेल्या रस्त्यांची माहिती, फोटो या संकेतस्थळावर अपलोड करावेत, जेणेकरून त्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात येईल, असं आवाहन विभागानं केलं आहे.

****

केंद्र सरकारच्या अंजता आणि ऐलारा फेज तीनचं काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. औरंगाबाद इथं आज जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन विभागाच्या वतीनं आयोजित हस्तकला प्रदर्शन आणि सांस्कृतिक मेळाव्यात ते बोलत होते. औरंगाबाद इथं गेल्या १६ सप्टेंबरपासून आजपर्यंत ‘पर्यटन पर्व’ विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

****

रक्तदानाबाबत जनजागृती होण्यासाठी येत्या एक ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘ऐच्छिक रक्तदान दिना’निमित्त औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय - घाटीच्या विभागीय रक्तपेढीच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच संपूर्ण ऑक्टोबर महिना स्वेच्छा रक्तदान महिना म्हणून साजरा करण्यात येणार आहे. प्राध्यापक राजन बिंदु यांनी आज औरंगाबाद इथं ही माहिती दिली. यावर्षी १५ हजार १४६ रक्ताचे युनिटस्‌ जमा करण्यात आले असून ऐच्छिक रक्तदानाचं प्रमाण ९४ पूर्णांक आठ टक्के असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

पंडित दिनदयाळ अन्त्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत परभणी महापालिकेच्या वतीनं आज आयोजित करण्यात आलेल्या रॅलीला महापौर मीना वरपूडकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी स्वच्छता अभियानाचीही सुरुवात करण्यात आली. 

****

परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावं या मागणीसाठी भारतीय स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेसमोर शेतकऱ्यांनी आजपासून बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. या संदर्भात २४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांना निवेदनही देण्यात आलं असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.

****

बीड तालुक्याच्या वांगी इथल्या जिल्हा परिषद शाळेतल्या मुलांना आज दुपारी मध्यान्ह भोजनानंतर उलट्यांचा त्रास सुरु झाला. ७५ विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी सांगितलं.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...