Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 August 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ दुपारी १.०० वा.
****
चौथ्या बिमस्टेक परिषदेचा काठमांडू
घोषणापत्राला मंजुरी देऊन आज समारोप करण्यात आला. बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार,
नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड या सर्व सदस्य देशांनी या काठमांडू घोषणापत्राला मंजुरी
दिली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्यानमारचे राष्ट्रपती
विन मिंट यांची भेट घेऊन दोन्ही देशांमधील संबंध अधिक बळकट करण्याबाबत चर्चा केली.
बिमस्टेक संमेलनादरम्यान या दोन नेत्यांमध्ये ही बैठक झाली. विकास, उर्जा आणि व्दिपक्षीय
सहकार्याच्या अन्य मुद्दांवर या भेटीदरम्यान चर्चा झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं
म्हटलं आहे.
*****
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात
बँका सुरू राहातील आणि नियमित कामकाज सुरू राहील, अशी माहिती अर्थ मंत्रालयानं दिली
आहे. समाज माध्यमांमध्ये सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बँका सहा दिवस बंद
रहातील, अशी अफवा पसरली होती. त्या पार्श्र्वभूमीवर अर्थ मंत्रालयानं ही माहिती दिली
आहे. केवळ दोन सप्टेंबर- रविवार आणि शनिवार - आठ सप्टेंबर रोजी बँकांना सुटी राहील.
ज्या राज्यांत तीन सप्टेंबर रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे, तिथंच केवळ बँका बंद
राहतील, असंही अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती केंद्र, हे सुक्ष्म-लघु
आणि मध्यम उद्योग क्षेत्रातली एक लोकचळवळ बनलं आहे, असं पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र
प्रधान यांनी म्हटलं आहे. ते काल भुवनेश्वर इथं अनुसूचित जाती-जमाती मेळावा आणि प्रदर्शनात
बोलत होते. अनुसूचित जाती-जमातींमधे उद्योजकांचा विकास घडवणारं हे महत्वाचं पाऊल ठरलं
असून, उद्योजक आता शेकडो तरुणांना रोजगार पुरवू शकतात, असं प्रधान यावेळी म्हणाले.
****
देशातले एक लाख ३५ हजार बंदर आणि
गोदी कामगार आणि निवृत्तीवेतनधारकांना लाभदायक ठरणारा नवा वेतन करार नौवहन मंत्रालयानं
केला आहे. काल मुंबईमध्ये नौवहन मंत्रालय,
बंदर अधिकारी आणि कामगार संघटना यांच्यात हा करार झाला. या नव्या करारामुळे कामगार
आणि निवृत्ती वेतनधारकांना १० पूर्णांक सहा दशांश टक्के वेतनवाढ मिळेल. जानेवारी
2017 पासून येत्या पाच वर्षांसाठी या कराराचा
लाभ मिळेल.
****
राज्य सरकारनं राज्यातल्या ११५ तहसील मंडळांना कापूस
उत्पादक क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे. कापड उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारनं हा
निर्णय घेतला आहे. यामुळे कापूस लागवड, पीक वाढ, पुरवठा आणि प्रक्रिया याकडे लक्ष देणं
सोपं होणार आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातल्या १८ जिल्ह्यांमधले हे ११५ तालुके आहेत. ज्या तालुक्यांमध्ये
५० टक्क्यांपेक्षा कमी कापूस उत्पादन होतं, त्याठिकाणी सरकार एक वस्त्रोद्योग केंद्र
उभारायला प्रोत्साहन देणार आहे.
****
लातूर जिल्ह्यात देवणी तालुक्यातल्या कवठाळा गावचे
तलाठी राजू कांबळे आणि कोतवाल सुभाष हणमते यांना आठ हजारांची लाच घेतांना काल लाचलुचपत
प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं. तक्रारदाराकडून मयत वडीलांच्या नावावर असलेल्या
शेतीचा वारसा हक्क आईच्या नावे फेर करून देण्यासाठी कांबळे यांनं ही लाच मागितली होती.
****
नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर
दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव मागे घेण्यात येईल असं नाशिकच्या महापौर रंजना भानसी
यांनी आज स्पष्ट केलं. मुंढे यांच्यावर सत्तारूढ भारतीय जनता पक्षानं अविश्वास ठराव
दाखल केला असून शनिवारी विशेष महासभा होणार आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेवरून आता हा ठराव मागे घेण्यात येईल असं त्यांनी
यावेळी सांगितलं. दरम्यान, नाशिक मधील विविध नागरी संघटना आणि काही राजकीय पक्षांनी
आज सकाळी मुंढे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला.
****
इंडोनेशियात जकार्ता इथं सुरु असलेल्या आशियाई क्रीडा
स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाचा अंतिम सामना आज जपान विरूध्द होणार आहे. वीस वर्षांनंतर भारतीय
महिला हॉकी संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे. कांस्य पदकासाठी भारतीय पुरूष
हॉकी संघाचा सामना उद्या शनिवारी पाकिस्तान
विरूध्द होणार आहे. स्कवॉश मध्ये महिला आणि पुरूष संघ उपांत्य फेरीचे सामने खेळणार
आहेत. टेबल टेनिस मध्ये मनिका बत्रा, अचंत शरत कमल आणि जी साथियान उप उपांत्य पूर्व
फेरीत लढत देतील. तर जुडो, ब्रिज, साईक्लिंग आणि सेलिंगच्या सामन्यातही भारतीय संघ
खेळणार आहे. पदक तालिकेत भारत १३ सुवर्ण, २१ रौप्य आणि २५ कांस्य पदकासह ५९ पदक घेवून
आठव्या क्रमांकावर आहे.
*****
***
No comments:
Post a Comment