Friday, 31 August 2018

AIR NEWS BULLETIN, AURNAGABAD 31.08.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 August 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ ऑगस्ट २०१ सकाळी .५० मि.

****

§  लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची विधी आयोगाची शिफारस.

§  नोटबंदी हा मोठा आर्थिक घोटाळा, काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचा आरोप.

§  अनुसुचित जाती -जमातीच्या उमेदवाराची जात दुसऱ्या राज्यामध्ये अधिसूचित नसेल, तर आरक्षणाचा दावा करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय.

§  आशियाई क्रीडा स्पर्धेत काल, भारताला दोन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदकं.

आणि

§  क्रिकेटमध्ये पहिल्या डावात इंग्लंडला सर्वबाद २४६ धावांवर रोखत,भारताच्या बिनबाद १९ धावा.

****



 देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घ्याव्यात अशी शिफारस विधी आयोगानं केंद्र सरकारला केली आहे. याबाबतचा मसुदा अहवाल आयोगानं काल केंद्र सरकारला सादर केला. दोन्ही निवडणुका एकत्र घेतल्या तर, देश सातत्यानं केवळ निवडणुकांतच गुंतून असल्याची स्थिती बदलता येईल, जनतेच्या पैशांची बचत होईल, तसंच व्यवस्थापकीय आणि सुरक्षा यंत्रणांचा ताणही कमी होईल असं आयोगानं म्हटलं आहे. राज्यघटनेच्या सध्याच्या चौकटीत देशात एकत्रित निवडणुका घेणं शक्य नाही, त्यामुळेच एकत्रित निवडणुका घेता याव्यात यासाठी राज्यघटना आणि निवडणूक कायद्यात बदल करावा अशी शिफारसही आयोगानं केली आहे.

****



 नोटबंदी हा देशातला मोठा आर्थिक घोटाळा होता, नोटबंदीनं देशातल्या सामान्य जनतेचा पैसा मोजक्या भांडवलदारांकडे वळवला असा आरोप काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. ते काल नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते. देशाच्या विकासदरातली घट आणि बेरोजगारी यांसारख्या असंख्य समस्यांना कारणीभूत ठरलेला, नोटबंदीसारखा घातक निर्णय का घेतला होता याचं उत्तर, पंतप्रधानांनी देशाला द्यावं. अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. नोटबंदी ही चूक नव्हती, तर देशाच्या जनतेवर ठरवून केलेला हल्ला होता, असा कठोर शाब्दीक हल्लाही गांधी यांनी यावेळी केला.



 दरम्यान, नोटबंदीमध्ये बहुतांश चलन बँकेत जमा झाल्यानं, नोटबंदी अयशस्वी झाल्याचा दावा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फेटाळला आहे. त्यांनी फेसबुकवर म्हटलं आहे की, न जमा झालेली रक्कम हे नोटबंदीचं उद्दिष्ट नव्हतं, तर कर न भरणाऱ्या समाजाकडून करभरणा करुन घेणं, हे उद्दिष्ट होतं. अर्थव्यवस्थेचं सुसुत्रीकरण आणि काळा पैसा रोखणं आवश्यक होतं, असंही जेटली यांनी म्हटलं आहे. टीकेला उत्तर देताना त्यांनी हे मत व्यक्त केलं.

****



 अनुसुचित जाती-जमातीच्या उमेदवाराची जात दुसऱ्या राज्यामध्ये अनुसुचित जाती-जमाती प्रवर्गात मोडत नसेल तर अशा उमेदवाराला त्या संबंधीत राज्यात सरकारी नोकरीत आरक्षणाच्या लाभासाठी दावा करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल काल सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यांच्या घटनापीठानं दिला. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात काही याचिका दाखल झाल्या होत्या. अनुसुचित जाती-जमाती प्रवर्गातली एखादी व्यक्ती अन्य राज्यात काही कारणांमुळे स्थलांतरीत झालेली असेल, आणि त्या राज्यात त्या व्यक्तीची जात ही अनुसुचित जाती-जमाती प्रवर्गात अधिसूचित नसेल तर त्याला त्या प्रवर्गाचे लाभ मिळणार नाहीत असं घटनापीठानं स्पष्ट केलं आहे. मात्र, दिल्लीमध्ये केंद्र सरकारचं आरक्षणविषयक धोरण लागू राहील, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं.

****



 देशातल्या बंदरांचं खाजगीकरण करणार नाही आणि ती सरकारच्याच अधिकारात राहतील, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ते काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. जवाहरलाल नेहरू बंदराच्या विशेष आर्थिक क्षेत्रामुळे पुढल्या काही वर्षात सुमारे दीड लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असं त्यांनी सांगितलं. सागरमाला कार्यक्रमांतर्गत तीन लाख कार्यारंभ आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत आणि त्या अंतर्गत १६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे, अशी माहिती त्यांनी दिली. इंडियन मर्चंट्स चेंबर तर्फे आयोजित कार्यक्रमात गडकरी यांनी गंगा नदी पुनरुज्जीवनीकरणा बाबत माहिती दिली. पुनर्नवीकरणाच्या माध्यमातून कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले.

****



 राज्य सरकारनं राज्यातल्या ११५ तहसील मंडळांना कापूस उत्पादक क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे. कापड उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे. यामुळे कापूस लागवड, पीक वाढ, पुरवठा आणि प्रक्रिया याकडे लक्ष देणं सोपं होईल. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातल्या १८ जिल्ह्यांमधले हे ११५ तालुके आहेत. ज्या तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी कापूस उत्पादन होतं, त्याठिकाणी सरकार एक वस्त्रोद्योग केंद्र उभारायला प्रोत्साहन देणार आहे.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 औरंगाबाद जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीनं मराठा, मुस्लिम, धनगर आणि कोळी समाजाच्या आरक्षणासाठी आता आमरण उपोषण सुरू केलं आहे. कॉग्रेसनं गेल्या दोन ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषणाला सुरूवात केली होती. आता हे उपोषण कालपासून आमरण उपोषणात परिवर्तित केल्याची माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली. सरकारकडून लेखी आश्वासन दिल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी आमदार सुभाष झांबड, माजी आमदार कल्याण काळे, काँग्रेस शहराध्यक्ष नामदेव पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

****



 लातूर जिल्ह्यात शिरुर अनंतपाळ, देवणी आणि उदगीर इथं तालुकास्तरीय जलसंधारण कामांची माहिती देणाऱ्या कार्यशाळांचं जलयुक्त शिवार अभियान  आणि भारतीय जैन संघटना यांनी काल आयोजन  केलं होतं. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी या कार्यशाळांना मार्गदर्शन केलं.



 जून,२०१९ पर्यंत जिल्ह्यात जलसंधारंणाची कामं शंभर टक्के पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असून यासाठी भारतीय जैन संघटनेकडून शंभर पोकलेन आणि जेसीबी यंत्र दिली जाणार आहेत.

****



 इंडोनेशिया सुरु असलेल्या अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारतानं दोन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदक मिळवली. पंधराशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत जिनसन जॉन्सननं तर महिलांच्या चार बाय चारशे मीटर रिले स्पर्धेत महिलांनी सुवर्णपदक पटकावलं. तर पुरुषांच्या चार बाय चारशे मीटर रिले स्पर्धेत पुरुषांनी रौप्य पदक मिळवलं. महिलांच्या १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत चित्रा उन्नीकृष्णनला आणि  थाळी फेकमध्ये सीमा पुनियाला कांस्यपदक मिळालं. पुरुष हॉकीमध्ये उपांत्य फेरीत भारताचा मलेशियाकडून सडन डेथमध्ये ७-६ असा धक्कादायक पराभव झाला. तत्पूर्वी दोन्ही संघानी प्रत्येकी दोन गोल केल्यामुळे सामना बरोबरीत सुटला होता. भारतीय महिला हॉकी संघाचा सुवर्ण पदकासाठीचा सामना आज जपान विरुद्ध होणार आहे.

****



 भारत-इंग्लंड यांच्यात कालपासून सुरु झालेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात, प्रथम फलंदाजी करणाऱ्या यजमान इंग्लंडला भारतानं २४६ धावांवर रोखलं. त्यानंतर दिवसअखेर भारतानं बिनबाद १९ धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या इंग्लंडची भारतीय गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी करत सहा बाद ८६ अशी स्थिती केली होती. मात्र, तळाच्या फलंदाजांनी उत्तम फलंदाजी करत इंग्लंडचा डाव सावरला.

****



 जालना जिल्ह्यात अकोलादेव इथल्या जीवरेखा धरणावर शेतकरी स्वाभिमानी संघटनेच्यावतीनं काल जलसमाधी आंदोलन करण्यात आलं. कपाशीवरील बोंडअळीचे सरसकट पंचनामे करावेत या मागणीसाठी हे आंदोलन होतं.

****



 प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत ५२ हजार, ६९१ जणांना गॅस जोडणी देण्यात आली आहे. या योजनेमुळे आदिवासी बहुल भागातल्या महिलांचं जीवन सुकर झालं असून कमी वेळात स्वयंपाक होत असल्यानं, महिला समाधान व्यक्त करत आहेत. या योजनेबद्दल जिल्ह्यातल्या लोय गावातल्या लाभार्थी रंजना वळवी म्हणाल्या –



आम्हाला फायदा असा झाला की, आम्ही शेतात कामाला जायचो रोज. त्यामुळे तिथुन यायचो आणि पावसाचा दिवस पण रायचा. ते लाकड पण सर्व ओले होऊन जायचे. मग स्वयंपाक करायला जेवण बनवायला आम्हाला फार त्रास व्हायचा धुरा मुळे. आम्हाला फायदा असा झाला आहे की, सिंलेनडर भेटले आहे ना. दोन तासाचं काम असं पाच, दहा मिनिटात होऊन जातं. शासनाने जे आम्हाला गॅस सिंलेनडर दिलं आहे ना ते आमच्या महिला करीता फार हे सुखाचं काम करून दिलं आहे.



****



 अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरेच्या सीबीआय कोठडीत उद्यापर्यंत वाढ करण्यात आली आहे. शरद कळसकर आणि अंदुरे यांची या प्रकरणात समोरासमोर चौकशी करावयाची असल्यामुळे त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयनं केली होती.

****



 शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावापेक्षा कमी दरानं खरेदी केल्यास गुन्हे दाखल करण्याच्या शासनाच्या निर्णयाच्या विरोधात हिंगोली जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी बेमुदत खरेदी बंद केली आहे. यामुळे मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यवहार ठप्प आहेत.

****



 अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, हिंगोली जिल्हा शाखेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ संपादक उत्तमराव दगडू यांना जाहीर झाला आहे. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार तोष्णीवाल यांनी काल या पुरस्कारांची घोषणा केली. याशिवाय साहित्य क्षेत्रासाठी  कवयित्री प्राध्यापक संध्या रंगारी, सिंचन क्षेत्रासाठी आमदार तानाजी मुटकुळे, धर्मदाय आयुक्त रवींद्र घायतिडक, पत्रकार राकेश भट, प्रभाकर स्वामी, छायाचित्रकार कृष्णा देवणे यांना दर्पण पुरस्कार जाहीर झाले आहेत.

*****

***

No comments: