Thursday, 30 August 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.08.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 August 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० ऑगस्ट २०१ दुपारी १.०० वा.

****



 राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, आज केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयासमोर हजर झाले. चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असलेले लालूप्रसाद यादव प्रकृतीचं कारण देऊन १० एप्रिल २०१८ पासून जामीनावर बाहेर होते. त्यांच्या तात्पुरत्या जामिनाची मुदत संपल्यानं त्यांना आज समर्पण करण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते. यादव यांची रांचीच्या बिरसा मुंडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

****



 इतर क्षेत्रांमधल्या संभाव्य संधी लक्षात घेता २०३० पर्यंत शेतमजुरांची संख्या ३५ टक्के कमी होईल, अशी शक्यता भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक त्रिलोचन महापात्र यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्ली इथं आज कृषी तज्ज्ञांच्या बेठकीत ते बोलत होते. युवकांना कृषी क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी नवीन उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. 

****



 चौथ्या बिमस्टेक शिखर संमेलनात सहभगी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नेपाळची राजधानी काठमांडू इथं पोहोचले. बिमस्टेक शिखर संमेलनाच्या उद्घाटन सत्रात ते आज संबोधित करणार आहेत. नेपाळच्या राष्ट्राध्यक्ष विद्यादेवी भंडारी, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाला सिरीसेना आणि बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची ते या दौऱ्यात भेट घेणार आहेत.

****



औद्योगिक व्यवहारातली वाढ आणि चांगल्या पावसामुळे चालू आर्थिक वर्षात देशाच्या आर्थिक वाढीचा दर सात पूर्णांक चार दशांश टक्के राहिल, असा अंदाज भारतीय रिझर्व्ह बँकेनं वर्तवला आहे.  किरकोळ चलनफुगवट्याचा दर चार टक्क्यांपर्यंत खाली आणणं हे उद्दिष्ट असल्याचं, बँकेनं जारी केलेल्या अहवालात म्हटलं आहे. कृषी उत्पादन चांगलं राहण्याची शक्यता असून, औद्योगिक वाढ मजबूत होत असल्याचंही बँकेनं यात नमूद केलं आहे.

****



 राज्य सरकारनं राज्यातल्या ११५ तहसील मंडळांना कापूस उत्पादक क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे. कापड उद्योगाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. यामुळे कापूस लागवड, पीक वाढ, पुरवठा आणि प्रक्रिया याकडे लक्ष देणं सोपं होईल. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातल्या १८ जिल्ह्यांमधले हे १५१ तालुके असल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. ज्या तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी कापूस उत्पादन होतं, त्याठिकाणी सरकार एक वस्त्रोद्योग केंद्र उभारण्यास प्रोत्साहन देणार आहे.

****



 प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेला येत्या एक सप्टेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त संपूर्ण देशभरात एक ते सात सप्टेंबर दरम्यान मातृ वंदना सप्ताह साजरा करण्यात येत आहे. जालना जिल्ह्यातही हा सप्ताह साजरा करण्यात येणार असून, या कालावधीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी कळवलं आहे.

****



 अजिंठा आणि वेरुळ लेण्या पाहण्यासाठी येणाऱ्या देशविदेशी पर्यटकांसाठी पर्यटन विकास महामंडळ- एमटीडीसीच्या वतीनं येत्या १७ सप्टेंबरपासून, ५ नवीन बसगाड्या सुरु करण्यात येणार आहेत. दळण-वळण आणि तीर्थक्षेत्र विकास संदर्भात औरंगाबाद इथं काल झालेल्या बैठकीनंतर एमटीडीसी चे अधिकारी विजय जाधव यांनी ही माहिती दिली.

****



 इंडोनेशियात सुरू असलेल्या अठराव्या आशियायी क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंना सहा क्रीडाप्रकारांमध्ये सुवर्ण पदकाची संधी आहे. मनजीत सिंग, जिन्सन जॉन्सन, मोनिका चौधरी आणि चित्रा हे धावपटू आज पंधराशे मीटरच्या अंतिम फेरीत धावतील.



 चारशे मीटर रिले शर्यतीत भारताचे पुरुष आणि महिला संघ अंतिम फेरीत सुवर्ण पदकासाठी प्रयत्न करतील.



 हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पुरुष संघाची मलेशियाबरोबर लढत होणार आहे. स्क्वॅशमध्ये महिला संघाची हाँगकाँगशी लढत होईल. टेबल टेनिसमध्ये मनिका बत्रा, मौमा दास, शरथ कमल आणि जी सत्यन यांच्याकडूनही पदकांच्या अपेक्षा आहेत. ज्युडो, कुराश, व्हॉलीबॉल, सेपक टकरो, सायकलिंग आणि डायव्हिंग या प्रकारांमध्येही भारतीय स्पर्धक सहभागी होतील. सध्या भारत पदकतालिकेत ११ सुवर्ण, २० रौप्य आणि २३ कांस्य पदकांसह नवव्या स्थानावर आहे.

****



 भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या पाच कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला चौथा सामना आजपासून साउदम्पटन इथं सुरू होत आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सामना सुरू होईल. भारताचा प्रमुख फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन कमरेच्या दुखापतीतून बरा झाला असून, या कसोटीत खेळण्यासाठी तंदुरुस्त असल्याची माहिती कर्णधार विराट कोहली यानं दिली आहे.

*****

***$F8B7D50A-C9BE-4C04-839F-1D0C7D00C1E5$ 

No comments: