Monday, 27 August 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 27.08.2018 - Headline Bulletin


आकाशवाणी, औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२७ ऑगस्ट २०१८ सकाळी ११.०० वाजता.

****

निवडणूक सुधारणासंदर्भात चर्चेसाठी निवडणूक आयोगानं आज नवी दिल्लीत राष्ट्रीय तसंच प्रादेशिक राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे. मतदार याद्यांच्या विश्वासार्हतेवरही या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे. आगामी लोकसभा तसंच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांची दुरुस्ती तसंच इतर सुधारणांसंदर्भात आयोगानं, राजकीय पक्षांकडून सूचना मागवल्या आहेत.

****

राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडी-एनडीए सरकारच्या कार्यकाळात गेल्या चार वर्षांत, देशाच्या अर्थव्यवस्थेचा कायापालट झाल्याचं, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालात ही बाब नमूद असल्याचं, जेटली यांनी म्हटलं आहे. या कार्यकाळात अर्थव्यवस्थेत सुधारणा केल्यामुळे, ती अधिक पारदर्शक झाल्याचं जेटली यांनी नमूद केलं.

****

कुपोषण निर्मूलन, तसंच विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारनं द्विस्तरीय मॉडेल तयार केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. याअंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची स्थापना केली जाणार आहे. मुख्य सचिवांच्या नेतृत्वात ही समिती, योजनांच्या अंमलबजावणीवर नियंत्रण ठेवणार आहे. 

****

१८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज ॲथलेटिक्समध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा, बॅटमिटन स्पर्धेत पी व्ही सिंधू आणि सायना नेहवाल, तर मुष्टीयुद्ध स्पर्धेत विकास कृष्णन आणि अमित फंगल मैदानात उतरणार आहेत. महिला हॉकी, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, तसंच स्क्वॅशचे सामने आज होणार असून, भारोत्तोलन आणि घोडेस्वारीतही भारतीय क्रीडापटूंकडून आज उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. या स्पर्धेत भारत, आतापर्यंत सात सुवर्ण, दहा रौप्य आणि १९ कांस्य पदकांसह पदक तालिकेत नवव्या स्थानावर आहे.

****

No comments: