आकाशवाणी,
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२९ ऑगस्ट २०१८
सकाळी ११.०० वाजता.
****
भारताचे महान
हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा आज जन्मदिवस, हा दिवस देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून
साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्यानचंद यांना आदरांजली अर्पण केली
असून, क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी देशवासियांना या दिनाच्या शुभेच्छा
दिल्या आहेत.
****
जम्मू काश्मीरमध्ये
हिजबूल मुजाहिदीनच्या दोन अतिरेक्यांना आज सकाळी सुरक्षा दलांनी ठार केलं. अनंतनाग
जिल्ह्यातल्या मुनिवार्ड खेड्यात सुरक्षा दलांनी आज सकाळी राबवलेल्या शोध मोहीमेदरम्यान
अतिरेक्यांनी गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलानं ही कारवाई केली.
****
तेलुगु देशम
पक्षाचे पोलिट ब्युरो सदस्य आणि विभाजना पूर्वीच्या आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री
एन.टी रामाराव यांचे पुत्र नंदमुरी हरिकृष्ण यांचं आज सकाळी एका अपघातात निधन झालं.
ते बासष्ट वर्षांचे होते. तेलंगणात नलगोंडा जिल्ह्यात आज पहाटे हा अपघात झाला.
****
काँग्रेस
पक्षाचे अध्यक्ष खासदार राहुल गांधी हेच देशाचे पंतप्रधान बनतील, हे सुनिश्चित करण्यासाठी
काँग्रेस पक्ष प्रयत्न करेल, असं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी महासचिव मल्लिकार्जुन
खरगे, यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष
खासदार शरद पवार यांनी, ज्या पक्षाचे जास्त खासदार असतील, त्या पक्षाचा पंतप्रधान असेल,
असं वक्तव्य नुकतंच केल्याच्या पार्श्वभूमीवर खरगे बोलत होते. भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी समविचारी
पक्षांनी अहंकार बाजूला ठेवून एकत्र यावं, असंही खरगे म्हणाले.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या फेरपरीक्षेचा
निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. मंडळाच्या
संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होणार असल्याचं मंडळाच्यावतीनं सांगण्यात आलं आहे.
****
इंदोर-मनमाड दरम्यान नवीन रेल्वे मार्ग टाकण्यासाठीच्या करारावर काल नवी दिल्लीत
स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या रेल्वे मार्गामुळे मुंबई आणि पुण्याहून इंदूरपर्यंतचं
अंतर १७१ किलोमीटरनं कमी होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment