Sunday, 26 August 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 26.08.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 August 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ ऑगस्ट २०१ दुपारी १.०० वा.

****

लोकशाही सुदृढ आणि बळकट करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करण्याची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात ते आज देशवासीयांशी संवाद साधत होते. या मालिकेचा आज ४७ वा भाग प्रसारित झाला.

माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचं स्मरण पंतप्रधानांनी या कार्यक्रमात केलं. वाजपेयींनी पाहिलेलं समृद्ध आणि विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार करून त्यांनी संपूर्ण देशवासीयांच्या वतीनं वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

संसदेचं यंदाचं पावसाळी अधिवेशन सामाजिक न्याय आणि युवकांच्या कल्याणाचं सत्र म्हणून कायम स्मरणात राहील, असं ते म्हणाले.

केरळ राज्यात आलेल्या महापुराचा उल्लेख करत पंतप्रधानांनी, संपूर्ण देश केरळवासीयांसोबत असल्याचं आश्वासन दिलं. केरळ लवकरच संकटातून सावरेल आणि नव्या जोमानं उभा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तिन्ही सैन्यदलाच्या जवानांनी बचाव आणि मदतीच्या कार्यात महत्वपूर्ण भूमिका बजावल्याचं त्यांनी नमूद केलं.

आगामी अभियांत्रिकी दिनाचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी वेरुळच्या कैलास लेणीचा दाखला दिला. या मंदिरात आपल्याला स्थापत्य आणि अभियांत्रिकीचा उत्तम नमुना पहायला मिळतो, असं ते म्हणाले.

आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंचं पंतप्रधानांनी अभिनंदन केलं आहे. वुशू आणि रोईंग यासारख्या क्रीडाप्रकारांमध्ये भारतीयांनी दाखवलेलं कौशल्य फक्त पदक मिळवण्यापुरतं नाही, तर भारतीय क्रीडापटूंची स्वप्नं नवीन प्रमाण सिद्ध करणारी ठरली असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

आज साजरा होत असलेला संस्कृत दिन, राखी पोर्णिमा, आगामी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण, क्रीडा दिन, आणि शिक्षक दिनाच्या पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

****

भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ - आयआरसीटीसी उपहारगृह वाटप प्रकरणी झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी यांच्याविरोधात आरोपांची दखल घेण्यासाठी पुरेसे पुरावे आपल्याकडे असल्याचं सक्तवसुली संचालनालयानं दिल्ली न्यायालयाला सांगितलं आहे. विशेष न्यायमूर्ती अरविंद कुमार यांनी याबाबतची सुनावणी ११ सप्टेंबरपर्यंत राखून ठेवली आहे. पुरी आणि रांची इथल्या रेल्वेच्या दोन हॉटेलांच्या भाडेपट्टीला त्यांनी स्वतःच्या पदांचा गैरवापर करुन मंजुरी दिल्याचं विशेष सरकारी वकील अतुल त्रिपाठी यांनी न्यायालयाला सांगितलं.

****

जम्मू आणि काश्मिरमधल्या वार्षिक अमरनाथ यात्रेची आज सांगता होत आहे. यावर्षी दोन लाख ८४ हजारांहून आधिक यात्रेकरुंनी कालपर्यंत शिवलिंगाचं दर्शन घेतलं.

****

संस्कृत दिवस आज साजरा होत आहे. यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीतल्या लाल बहादूर राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठात विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. जगातली प्राचीन भाषा म्हणून संस्कृत परिचित असून, भारताच्या सांस्कृतिक इतिहासातही या भाषेचं फार महत्व आहे.

****

शेती प्रधान युगाकडून सुरू झालेली देशाची वाटचाल आता ज्ञान प्रधान युगाकडे होत असून, यामध्ये मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत असल्याचं, भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी म्हटलं आहे. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या ११८ व्या जयंती दिनी, अहमदनगर जिल्ह्यातल्या लोणी इथं काल आयोजित राज्यस्तरीय साहित्य, कलागौरव आणि प्रबोधन पुरस्कारांच्या वितरण प्रसंगी ते बोलत होते. यंदाचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य सेवा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांना, उत्कृष्ट साहित्य पुरस्कार साहित्यिक बाबाराव मुसळे यांना, विशेष साहित्य गौरव पुरस्कार महेश लोंढे यांना, अहमदनगर जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार हेरंब कुलकर्णी, तर डॉ. विखे पाटील पत्रकार लेखक पुरस्कार डॉ. बाळ बोठे यांना प्रदान करण्यात आला. अभिनेते मिलिंद शिंदे यांना कलागौरव पुरस्कारानं, तर श्यामसुंदर महाराज सोन्नर यांना समाजप्रबोधन पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

****

हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातल्या कुरुंदा भागात टोकाईगड जवळ गुप्तधनाच्या लालसेनं खोदकाम करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली असून, काही साहित्य जप्त केलं आहे.

****

इंडोनेशिया इथं सुरु असलेल्या अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारतानं घोडेस्वारीत दोन रौप्य पदकं पटकावली. सहा भारतीय ॲथलिट्स आज सुवर्ण पदकासाठी खेळणार आहेत.

//***********//


No comments: