Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 August 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ ऑगस्ट २०१८ दुपारी १.०० वा.
****
इंडोनेशिया इथं सुरु असलेल्या अठराव्या आशियाई क्रीडा
स्पर्धेत भारतानं आज आणखी एक सुवर्ण आणि कांस्य पदक पटकावलं. टेनिस मध्ये पुरुष दुहेरीत
रोहन बोपन्ना आणि दीविज शरण यांच्या जोडीनं कझाकिस्तानच्या जोडीचा सहा - तीन, सहा
- चार असा पराभव करत भारताला सहावं सुवर्ण पदक मिळवून दिलं. नेमबाजीत महिलांच्या १०
मीटर एयर पिस्टल प्रकारात हिना सिद्धुनं कांस्य पदक जिंकलं.
आज सकाळी नौकानयन मध्ये दत्तु भोकनळ, स्वर्णसिंह, ओम प्रकाश
आणि सुखमित सिंह यांच्या संघानं सुवर्ण पदक जिंकलं, तर दुष्यंत चौधरीनं पुरुषांच्या
लाईटवेट सिंगल स्कल्स प्रकारात तर रोहित कुमार - भगवान सिंह जोडीनंही लाईटवेट डबल स्कल्स
प्रकारात कांस्यपदक पटकावलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रीडा मंत्री कर्नल राज्यवर्धन
सिंह राठोड यांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.
या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत सहा सुवर्ण, चार रौप्य
आणि १३ कांस्य पदकांसह एकूण २३ पदकं जिंकत पदक तालिकेत नववं स्थान मिळवलं आहे.
****
आयुष्मान भारत ही महत्त्वाकांक्षी
आरोग्य विमा योजना कंपन्यांसाठी सकारात्मक पाऊल असून, यामुळे
प्रीमिअम वाढण्यास मदत होईल, असं मूडीज या आंतरराष्ट्रीय मानांकन संस्थेनं म्हटलं आहे. १० कोटी
गरीब कुटुंबांना या योजनेअंतर्गत समावून घेतलं जाणार असून, उपचारासाठी
दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत विमा छत्र मिळणार आहे. साधारण
विमा हप्त्यात आरोग्य विम्याचा वाटा सुमारे २३ टक्के
असल्याचं, या संस्थेच्या मुंबईत काल प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटलं आहे. २०११ - १२ ते २०१६ - १७ दरम्यान, आरोग्य विम्याच्या हप्त्यात वार्षिक १८ टक्के
वाढ झाली आहे.
****
आधार पत्राची आवश्यकता असलेल्या प्रत्येक प्रमाणीकरणासाठी
चेहऱ्याची ओळख पटवणं अनिवार्य करण्याची घोषणा, भारतीय
विशिष्ट ओळख प्राधिकरणानं केली आहे. साधारणतः प्रमाणीकरण प्रक्रियेअंतर्गत कोणत्याही व्यक्तीची
ओळख, बोटांचे ठसे किंवा डोळ्यांच्या बाहुल्या तपासून पटवली जाते. त्यात
आता चेहऱ्याची ओळख पटवण्याचा अतिरिक्त उपाय समाविष्ट होणार आहे. अतिरिक्त
सुरक्षा कवच म्हणून याचा वापर करत असल्याचं प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे. वार्धक्यामुळे
किंवा शारीरिक कष्टाच्या कामांमुळे ज्यांचे बोटांचे ठसे स्पष्ट नसतील, त्यांचीही
ओळख पटवणं या उपायामुळे शक्य होणार आहे. प्रथम सिम कार्ड देण्यासाठी, आणि
मग टप्प्याटप्प्यानं इतरत्रही हा
नियम लागू केला जाईल.
****
जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा बलाचे
जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. आज सकाळी कोकरनाग
परिसरात जवानांनी शोधमोहीम सुरु केल्यानंतर ही चकमक झाली. मृत दहशतवाद्याकडून काही
हत्यारं जप्त करण्यात आली.
****
ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनानं मराठी चित्रपट,
नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांना व्यापून टाकणारा एक गुणी आणि अष्टपैलू अभिनेता
आपण गमावला, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांना श्रद्धांजली
वाहिली आहे. तर चव्हाण यांच्या निधनानं चित्रपट आणि नाटक क्षेत्राची मोठी हानी झाली
असल्याची भावना सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली आहे. विजय चव्हाण
यांचं आज मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं, ते ६३ वर्षांचे होते.
****
केरळ पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी महाराष्ट्रातले नागरिक आणि संस्था मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. इच्छुकांनी आपलं
आर्थिक सहाय्य, राज्य शासनाच्या महाराष्ट्र बँकेतल्या खात्यावर, चीफ
मिनिस्टर केरला फ्लड रिलिफ फंड या नावानं धनादेश किंवा डिमान्ड ड्राफ्टच्या स्वरुपात
करावं, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी केलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या ओझर इथं, केंद्र शासनाच्या संरक्षण
खात्याच्या अखत्यारीत असलेल्या हिंदुस्थान एरोनोटिक्स लिमिटेडच्या शाखेतल्या कर्मचारी
संघटनेनं आज एकदिवसीय संप पुकारला आहे. या संपात कारखान्यातले तीन हजार कामगार सहभागी
झाले आहेत. नवीन वेतन करार पाच वर्षांचा करावा अशी संघटनेची मागणी असून, व्यवस्थापन
मात्र १० वर्षांसाठी करार करावा असा आग्रह धरत आहे. कामगारांनी आपल्या मागणीसाठी आज
सकाळी कंपनीसमोर निदर्शनं केली.
****
लातूर जिल्हा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी जिल्ह्याच्या
प्रत्येक गावात केल्या जाणाऱ्या जलयुक्त शिवारशी संबंधित कामांचं नियोजन करावे असं
आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं आहे. मृद आणि जलसंधारण
विभाग तसंच भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित जलयुक्त शिवार अभियान
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते काल लातूर इथं बोलत होते.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २६ ऑगस्टला आकाशवाणीवरच्या
मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४७वा भाग
असेल.
//**********//
No comments:
Post a Comment