Thursday, 23 August 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.08.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 August 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ ऑगस्ट २०१ दुपारी १.०० वा.

****



 प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत गुजरातमध्ये वलसाड जिल्ह्यात जुजवा गावात लाभार्थ्यांच्या सामुहिक ई- गृहप्रवेश कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले आहेत. या योजनेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला.



 दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना, मुख्यमंत्री ग्रामोदय योजना आणि  राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानासह विविध विकास योजनेतलल्या लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते रोजगार नियुक्ती पत्र, प्रमाणपत्र तसंच महिला बॅँक प्रतिनिधींना नियुक्ती पत्र आणि लघु एटीएमचं वितरण करण्यात आलं.

****



 नातन संस्थेवर बंदी संदर्भात महाराष्ट्र सरकारकडून कोणत्याही प्रस्तावाबाबत पूर्ण माहिती नसल्याचं, केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर यांनी म्हटलं आहे. या संस्थेच्या कार्यकर्त्यांचं नाच डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्यासह इतर विचारवंतांच्या हत्या प्रकरणात समोर येत असल्याच्या कारणावरून काँग्रेस पक्षाकडून या संस्थेवर बंदीची मागणी करण्यात येत आहे, याबाबत महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी, सनातन संस्थेवर बंदीसंदर्भात राज्य सरकारनं, यापूर्वीच केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवल्याचं सांगितलं होतं. त्यावर बोलताना अहीर यांनी ही बाब स्पष्ट केली. हा राज्य सरकाचा अंतर्गत मुद्दा असून, त्यावर त्यांनी निर्णय घ्यावा. याबाबत केंद्राकडे प्रस्ताव आल्याशिवाय केंद्र शासनाला कारवाई करता येणार नाही, असंही अहीर यांनी स्पष्ट केलं. 

****



 केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी आज अर्थ मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. राष्ट्रपती भवनानं जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली. मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी जेटली यांनी तीन महिन्यांची सुटी घेतली होती. या काळात अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सांभाळला.

****



 राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज नवी दिल्ली इथं आंतरराष्ट्रीय बौद्ध संमेलनाचं उद्घाटन करणार आहेत. भारताच्या बौद्ध संस्कृतिची ओळख करुन देणं, आणि बौद्ध धर्माशी संबंधित पर्यटन स्थळांचा विकास करणं, हा या संमेलनाचा उद्देश आहे. आसियान देशांचे मंत्रिस्तरीय शिष्टमंडळं, तसंच अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रांस आणि रशियासह २९ देशांचे शिष्टमंडळही या संमेलनात सहभागी होणार आहेत. या संमेलनांतर्गत उद्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या अजिंठा इथं कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून, हे संमेलन येत्या रविवारी २६ तारखेपर्यंत चालणार आहे. 

****



 मुंबईचा सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉ आणि आंध्र प्रदेशाचा फलंदाज जी हनुमान बिहारी यांना भारतीय कसोटी क्रिकेट संघात स्थान मिळालं आहे. पृथ्वी आणि हनुमान बिहारीनं यावर्षीच झालेल्या १९ वर्षाखालच्या विश्व चषक स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. हे दोघं मुरली विजय आणि कुलदीप यादव यांची जागा घेतील. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेत उर्वरित दोन सामन्यांसाठी भारताचा संघ जाहीर झाला, त्यात या दोघांचा समावेश आहे. चौथा कसोटी सामना येत्या ३० तारखेला साऊदम्प्टन इथं, तर पाचवा आणि अंतिम सामना सात सप्टेंबरपासून लंडनच्या ओव्हल मैदानात सुरु होईल.

****



 अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत, टेनिसपटू अंकिता रैना हिनं कांस्य पदक पटकावलं. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत चीनी टेनिसपटून अंकिताला ४-६, ६-७ असं पराभूत केलं. आज नेमबाजीत महिलांच्या डबल ट्रॅप प्रकारात वर्षा वर्मन आणि श्रेयसी सिंह सुवर्ण पदकासाठी खेळणार आहेत. कबड्डी मध्ये आज भारतीय महिला आणि पुरुष संघाचा उपान्त्य फेरीचा सामना होणार आहे. याशिवाय जलतरण, व्हॉलिबॉल, बास्केट बॉल, जिम्नॅस्टिक, नौकानयन या स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत, भारतानं या स्पर्धेत आतापर्यंत चार सुवर्ण, तीन रौप्य आणि आठ कांस्य पदकं मिळवत पदक तालिकेत सातवं स्थान मिळवलं आहे.

****



 केरळ पुरग्रस्तांसाठी इतर देशांकडून मदत स्वीकारली जाणार नाही, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. मात्र अनिवासी भारतीय, आंतरराष्ट्रीय संस्था इत्यादींकडून येणारा मदतनिधी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या मदतनिधीत स्वीकारला जाईल, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितलं. मदत आणि पुनर्वसन कार्यासाठी जी जी मदत आवश्यक आहे, ती देशांतर्गत प्रयत्नांमधून पूर्ण करण्यासाठी सध्याच्या धोरणानुसार सरकार वचनबद्ध आहे, असं ते म्हणाले. इतर देशांनी देऊ केलेल्या मदतीबद्दल सरकारनं आभार व्यक्त केले आहेत असंही त्यांनी सांगितलं.

****



 जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातल्या बाबरनाड जंगल परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात लष्कराचा एक जवान जखमी झाला. काल रात्रीच्या सुमारास हा हल्ला झाला.

*****

***

No comments: