Saturday, 25 August 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 25.08.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 August 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ ऑगस्ट २०१ दुपारी १.०० वा.

****

प्रवासी भारतीय दिनानिमित्त आयोजित केलेल्या सौर उर्जेवरील सत्रात सहभागी सदस्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली. परवडणाऱ्या सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी विदेशातल्या भारतीयांची भूमिका या सत्रात सहभागी झालेले नामवंत, तज्ञ, संशोधक, उद्योजक यांनी या भेटीदरम्यान चर्चासत्रातून पुढे आलेल्या मुख्य निष्कर्षांबाबत पंतप्रधानांना एक सादरीकरण केलं. यामध्ये सौर उर्जेची उपयुक्तता, ऑफ ग्रीड आणि मायक्रोवीड उपाययोजना, सौर साठवण, अद्ययावत सौर तंत्रज्ञान तसंच सौर उर्जेच्या वाढत्या वापरासाठी लागणारी आर्थिक गुंतवणूक यांचा समावेश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित मंत्रालयांना या निष्कर्षांचा आपल्या धोरणांमध्ये समावेश करण्याचे निर्देश यावेळी दिले.

****

दहा हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या मुंबई-दिल्ली या द्रुतगतीमार्गाच्या कामाची डिसेंबरमध्ये सुरुवात करण्यात येणार असल्याचं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. या मार्गादरम्यान हरियाणातले मेवाट आणि गुजरातमधले दाहोड या देशातले दोन सर्वात मागास शहरांना जोडण्यात येणार असल्याचं गडकरी म्हणाले. या मार्गामुळे देशातल्या दोन महानगरांमधील प्रवासाची वेळ अर्ध्यानं कमी होईल, असंही त्यांनी सांगितलं.

*****

निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी निवडणूक आयोगानं येत्या सोमवारी नवी दिल्लीमध्ये सर्व मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे. आयोग टप्प्याटप्प्यानं सर्व मान्यता प्राप्त पक्षांशी निवडणूक सुधारणांबाबत चर्चा करत असून त्याबाबत त्यांचं मत जाणून घेत आहे. या सुधारणांमध्ये अचूक निवडणूक याद्या तयार करणे आणि त्याबाबतची पारदर्शकता हे महत्वाचे मुद्दे आहेत. आगामी सार्वत्रिक आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही पावलं उचलली जात आहेत.

****

गेल्या तीन वर्षात देशातल्या नक्षलवादी कारवाया ४० टक्क्यांनी घटल्या आहेत. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महासंचालक आर आर भटनागर यांनी काल जम्मू इथं पत्रकारांना ही माहिती दिली. सीआरपीएफला नक्षलवादाशी सामना करण्यात मोठं यश मिळालं असून, त्यांचा प्रभाव असलेल्या भागात नक्षलवादी कारवायात लक्षणीय घट झाल्याचं ते म्हणाले. जम्मू-कश्मीर पोलिसांशीही सीआरपीएफचा उत्तम समन्वय असून, या राज्यात राबविलेल्या दहशतवादीविरोधी संयुक्त अभियानात सध्या १४२ दहशतवादी मारले गेल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या आणखी २०० ते २५० दहशतवादी राज्यात सक्रीय असल्याचं ते म्हणाले.

****

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं पूरग्रस्त केरळमधल्या गावातल्या आरोग्य, स्वच्छता आणि  पोषणविषयक समितींना १८ कोटी ७१ लाख रुपयाचं अतिरिक्त अनुदान दिलं आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत हे अनुदान दिलं जात आहे. राज्य सरकारनं केलेल्या विनंतीनुसार हे अतिरिक्त अनुदान दिल्याचं मंत्रालयानं ट्विट संदेशात म्हटलं आहे.

****

जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात काल रात्री झालेल्या भू - सुरुंग स्फोटात एक जवान शहिद झाला. सुरक्षा बलाचे जवान गस्तीवर असताना हा स्फोट झाला.

****

जम्मू काश्मीरमधल्या अमरनाथ यात्रेची उद्या सांगता होत आहे. आज पहलगाम आणि बालटाल इथून १६० हून अधिक भाविकांचा जत्था अमरनाथ गुहेसाठी रवाना झाला. उद्या श्रावण पोर्णिमेनिमित्त यात्रेची शेवटची पुजा होणार आहे.

****

प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे पुढील महिन्यापासून फ्लेक्सी फेअर योजनेत बदल करणार आहे. मंत्रालय कमी गर्दीच्या वेळी ३० टक्क्यांहून कमी आरक्षण झालेल्या काही रेल्वे गाड्यांमध्ये ही योजना बंद करण्याचा विचार करत आहे. तर वास्तविक दरांपेक्षा अधिक दरानं असं आसन विकण्याच्या हमसफर गाड्यांसाठीच्या योजनेत काही बदल विचाराधीन आहेत, अशी माहिती रेल्वेनं दिली आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातले शिक्षक विक्रम अडसूळ यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या पाच सप्टेंबरला शिक्षक दिनी दिला जाणारा शिक्षक पुरस्कार यंदा राज्यातून अडसूळ यांनाच जाहीर झाला आहे. बंडगरवस्ती या अत्यंत दुर्गम भागातल्या जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले अडसूळ हे तंत्रस्नेही शिक्षक म्हणून परिचित आहेत.

****

इंडोनेशिया इथं सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये नेमबाजीत महिलांच्या रिकर्व प्रकारात भारतीय संघानं मंगोलियाचा पराभव करत उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.  

धावपटू हीमा दास आज महिलांच्या ४०० मीटर स्पर्धेत निर्मल शेओरन बरोबर तर दूती चंद १०० मीटरच्या अंतिम फेरीत धावणार आहे. संजीवनी जाधव आणि सुप्रिया लोगनाथन महिलांच्या एक हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धावतील. पदक तालिकेत सहा सुवर्ण, पाच रौप्य आणि १४ कांस्य पदक जिंकून भारत आठव्या स्थानावर आहे.

//***********//



                       




No comments: