Friday, 24 August 2018

Text - AIR NEWS BULLETIN AURANGABAD 24.08.2018 6.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 August 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ ऑगस्ट २०१ सकाळी .५० मि.

****   

** बौद्ध धर्माशी संबंधित पर्यटनाला चालना देण्यासाठी अधिक विचार करण्याची आवश्यकता राष्ट्रपतींकडून व्यक्त 

** निवडणुकीनंतर सहा महिने मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या नगरसेवकांचं पद रद्द करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश; लातूरच्या आठ तर परभणीच्या एका नगरसेवकाचा समावेश

** डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६०व्या वर्धापनदिनानिमित्त आठ मान्यवरांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

आणि

** अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची काल आणखी एका रौप्य आणि दोन कांस्य पदकांची कमाई

****

बौद्ध धर्माशी संबंधित पर्यटनाला चालना देण्यासाठी देशात अजुनही योग्य व्यवस्था नसून, यासंदर्भात अधिक विचार करण्याची आवश्यकता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली आहे. काल नवी दिल्ली इथं आंतरराष्ट्रीय बौद्ध संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. केंद्र सरकारनं बौद्ध परिक्रमा स्थळांच्या विकासासाठी अनेक उपाययोजना केल्याचं पर्यटन राज्यमंत्री के जे अल्फोन्स यांनी यावेळी सांगितलं.

या संमेलनाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातल्या अजिंठा इथंही आज बौद्ध संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संमेलनात बौद्ध अभ्यागत, भिक्खू आणि बौद्ध राष्ट्रांमधले महावाणिज्य दूत उपस्थित राहणार असून, यावेळी राज्यातल्या बौद्ध आकर्षणांवर प्रकाश टाकणारं सादरीकरण आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

****

विचारवंतांच्या हत्येमध्ये सहभागी आरोपींचे सनातन संस्थेशी असलेले संबंध उघड झाले असून, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिक माहिती द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंगेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. काल नाशिक इथं राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीनं आयोजित, संविधान बचाव यात्रेत ते बोलत होते. देशात संविधान जाळणाऱ्यांवर अद्याप गुन्हा दाखल झाला नाही आणि त्यांचे नागरिकत्व रद्द झाले नाही, या विषयावर जाब विचारला पाहिजे, असंही पाटील यांनी नमूद केलं.

****

निवडणुकीनंतर सहा महिने मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केलेल्या, नगरसेवकांचं पद रद्द होणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं काल यासंदर्भात झालेल्या सुनावणीत हा निर्णय दिला. यानुसार राज्यभरातल्या अनेक नगरसेवकांचं पद रद्द होणार असून यामध्ये कोल्हापूर महापालिकेतल्या २० तर लातूर महापालिकेतल्या आठ नगरसेवकांचा समावेश आहे. वसई - विरार आणि मुंबई महापालिकेतल्या प्रत्येकी पाच तर चंद्रपूर महापालिकेतल्या एका नगरसेवकाचं पद रद्द होणार आहे.

लातूर मनपाच्या या आठ नगरसेवकांमध्ये कॉंग्रेसचे युनूस मोमीन, अय्युब मनियार, डॉ. फर्जाना बागवान, मीना लोखंडे, उर्मिला बरुरे या पाच जणांचा तर भारतीय जनता पक्षाचे अजय दुडीले, भाग्यश्री शेळके, कोमल वायचाळकर या तिघांचा समावेश आहे.

महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम नऊ नुसार, आरक्षित जागेवर निवडून आल्यानंतर विजयी उमेदवारांना सहा महिन्यात जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे.

****

केरळ इथल्या पुरग्रस्तांना मदत म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत १० कोटी रुपये मदतीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काल मुंबईत सुपुर्द करण्यात आला.

दरम्यान, केरळ पूरग्रस्तांसाठी इतर देशांकडून मदत स्वीकारली जाणार नाही असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. मात्र, अनिवासी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मदत स्वीकारली जाईल असं स्पष्ट करत, देशांतंर्गत प्रयत्नांमधून केरळवसियांना मदत करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.

लातूर जिल्ह्यात उदगीर रोटरी क्लबच्या वतीनं शहरातून मदत फेरी काढून एक लाख ३० हजार रुपये मदत निधी जमा केला. अनेकांनी कपड्याच्या स्वरूपात ही मदत दिली. अहमदपूरच्या डॉ. हरिवंशराय बच्चन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चहाच्या विक्रीतून एकावन्न हजार रूपये मदतनिधी जमा केला. उस्मानाबाद जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीनं काढलेल्या मदत फेरीत एक लाख एकवीस हजार रुपये जमा झाले

****

रेल्वे मंत्रालयाच्या मंजूर प्रकल्पांसाठीचं भूसंपादन, नव्याने रेल्वे मार्ग टाकण्याची कामं आणि रेल्वे स्थानकांवरील प्रवासी सोयीसुविधांची कामं तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यातल्या रेल्वेप्रकल्पांच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते.  अहमदनगर-बीड-परळी मार्गांसह इतर मार्गांच्या दु्हेरी तसंच तिहेरीकरणाबाबतही यावेळी चर्चा झाली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी काल औरंगाबादच्या समांतर जलवाहिनीसंदर्भातही दूरदृष्यसंवाद प्रणालीद्वारे आढावा घेतला.

****

माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते गुरुदास कामत यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत चेंबूर इथल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी कामत यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.

****

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचं काल पहाटे दिल्लीत निधन झालं, ते ९५ वर्षांचे होते. पत्रकार, स्तंभलेखक, मानवाधिकार कार्यकर्ता, लेखक अशी ओळख असलेल्या कुलदीप नय्यर यांनी १४ भाषांमधल्या ८० वृत्तपत्रांमध्ये वार्तांकन तसंच स्तंभलेखन केलं. नय्यर यांचे बियाँड द लाईन्स, इंडिया आफ्टर नेहरू, वॉल ॲट वाघा, आदी पुस्तकं प्रसिद्ध आहेत. प्रारंभीच्या काळात त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालयात अधिकारी म्हणून काम केलं होतं.

****

दूरदर्शनचे माजी निर्माते सुधीर पाटणकर यांचं काल सकाळी मुंबईत निधन झालं, ते ६७ वर्षांचे होते. आजचे पाहुणे, कोर्टाची पायरी, युवदर्शन, आमची पंचविशी, साप्ताहिकी, अशा अनेक कार्यक्रमांची निर्मिती पाटणकर यांनी केली होती. तंत्रावर प्रभुत्व असलेली आणि शिस्तप्रिय व्यक्ती म्हणून पाटणकर यांचा लौकिक होता.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

जलयुक्त शिवार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विद्यापीठातल्या संशोधक विद्यार्थ्यांनी संशोधन करणं गरजेचं असल्याचं मत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६०व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. सध्याच्या स्पर्धेच्या युगात मराठवाड्यातला विद्यार्थी टिकण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं गरजेचं असून, विद्यापीठानं त्यादृष्टीनं वाटचाल केली पाहिजे, असं बागडे म्हणाले. विद्यापीठाच्या या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त विविध क्षेत्रातल्या आठ मान्यवरांचा जीवनगौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. डॉ. बिंदेश्वर पाठक, डॉ. प्रताप पवार, राधेश्याम चांडक, डॉ. राजेंद्र शेंडे, प्राचार्य रा. रं. बोराडे, नामदेव कांबळे, भास्करराव पेरे आणि तुकाराम जनपदकर गुरुजी यांना बागडे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं.

****

इंडोनेशिया इथं सुरु असलेल्या अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं काल आणखी एक रौप्य आणि दोन कांस्य पदकाची कमाई केली. नेमबाजीत पुरुषांच्या डबल ट्रॅप प्रकारात शार्दुल विहाननं रौप्य पदक जिंकलं. तर टेनिसमध्ये महिला एकेरीत अंकिता रैनानं चीनच्या खेळाडूचा पराभव करत कांस्य पदक पटकावलं. पुरुष दुहेरीत रोहन बोपन्ना आणि दीविज शरण यांच्या जोडीनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. कबड्डी मध्ये भारतीय महिला संघानं चीनी तैपेईचा २७ - १४ असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. मात्र पुरुष संघाला उपान्त्य फेरीत इराणकडून २७ - १८ असा पराभव पत्कराला लागला आणि कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं.

जलतरणाच्या ५०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत वीरधवल खाडे तर २०० मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत श्रीहरी नटराज अंतिम फेरीत पोहोचले आहेत.

या स्पर्धेत भारत आतापर्यंत चार सुवर्ण, चार रौप्य, आणि दहा कांस्य पदकं अशी एकूण १८ पदकं मिळवून पदक तालिकेत दहाव्या क्रमांकावर आहे.

****

भारतीय महिला संघाची अनुभवी क्रिकेटपटू झुलन गोस्वामीनं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तिने आतापर्यंत ६८ टी-२०, १६८ एकदिवसीय आणि १० कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळानं २००७ मध्ये तिला सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार देऊन गौरवलं होतं. अर्जुन पुरस्कारासह पद्मश्री सन्मानानं तिला गौरवण्यात आलं आहे.

****

डिजिटल भारत योजने अंतर्गत जालना जिल्ह्यात दोन हजार दोनशे कॉमन सर्व्हिस सेंटर अर्थात सीएससी केंद्र सुरू आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांना शासकीय योजनांशी निगडित ऑनलाइन अर्ज करणे, इ-पेमेंट, बिल भरणा करणे अधिक सुलभ झालं आहे. सीएससी केंद्र चालवणाऱ्या शेकडो तरुणांना यामाध्यमातून स्वयंरोजगार मिळाला आहे. जालन्यातले सर्जेराव थोरात यांनी सीएससी केंद्राद्वारे स्वयंरोजगार सुरू केला आहे. डिजीटल भारत विषयी आपला अनुभव सांगतांना थोरात म्हणाले….

नमस्कार मी सर्जेराव थोरात राहणार जालना. प्रधानमंत्री डिजीटल भारत योजने अंतर्गत मागील दीड वर्षांपासून जालना शहरात कॉमन सर्व्हीस सेंटर चालवत आहे.या माध्यमातून शासनाचे विविध योजनांच ऑनलाईन अर्ज भरणे सेंटरच्या माध्यमातून करत आहे. डिजीटल भारत योजनेमुळे माझ्यासारख्या अनेक तरूणांना या माध्यमातून स्वयंरोजगाराचे साधन प्राप्त झाले आहे.त्यामुळे मी शासनाचा आभारी आहे.

****

राज्यातल्या प्राध्यापकांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात येत्या चार सप्टेंबरला मुंबई विद्यापीठात राज्यव्यापी ‘जेल भरो आंदोलन’ करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या अध्यक्ष डॉ.ताप्ती मुखोपाध्याय यांनी दिली आहे. त्या काल औरंगाबाद इथं आयोजित मेळाव्यात बोलत होत्या. यावेळी महासंघाच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली.

****

माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे अस्थिकलश काल राज्यात विविध ठिकाणी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. काल औरंगाबाद तसंच जालना शहरात अंत्यदर्शनानंतर आज परभणी आणि नांदेड इथं अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात येईल, त्यानंतर नांदेड इथं गोदावरी घाटावर या अस्थींचं विसर्जन करण्यात येणार आहे.

//************//






No comments: