Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 29 August 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९
ऑगस्ट २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø
भीमा
कोरेगांव हिंसाचार प्रकरणी पाच जणांना अटक; पुणे पोलिसांची कारवाई
Ø
गगनयान
मोहिमेसाठी इस्रो सज्ज; तीन अंतराळवीर आठवडाभर अंतराळात वास्तव्य करणार
Ø
मराठा
समाजातल्या विद्यार्थ्यांचं ५० टक्के शैक्षणिक शुल्क परत करण्याचे महसूल मंत्र्यांचे
निर्देश
Ø आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर; मराठवाड्यातल्या २१ शिक्षकांचा समावेश
आणि
Ø
आशियाई
क्रीडा स्पर्धेत ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत मनजित सिंगला सुवर्ण पदक
****
भीमा कोरेगांव हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी काल
देशभरात छापे घालून पाच जणांना अटक केली. हैदराबाद इथले डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते
कवी पी.व्ही.राव, मुंबईतले कार्यकर्ते वेरॉन गोन्झालविस आणि अरुण परेरा, छत्तीसगडच्या
कामगार कल्याण कार्यकर्त्या सुधा भारद्वाज, दिल्लीतले नागरी हक्क कार्यकर्ते गौतम नवलाखा
यांचा यामध्ये समावेश आहे. या सर्वांना आज
पुणे न्यायालयात हजर केलं जाणार आहे. इसवी सन १८१८ मध्ये झालेल्या कोरेगाव भीमा लढाईला
२०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त, गेल्या वर्षी ३१ डिसेंबर रोजी पुण्यात आयोजित एल्गार
परिषदेनंतर भीमा कोरेगाव इथं हिंसा उसळली होती.
दरम्यान, या कारवाईबद्दल अनेक विचारवंत
आणि लेखकांनी नाराजी व्यक्त केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
गगनयान या अंतराळ मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन
संस्था-इस्रो सज्ज असल्याचं, इस्रोचे अध्यक्ष के.सिवन यांनी सांगितलं आहे. ते काल नवी
दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. या मोहिमेत तीन अंतराळवीर पाच ते सात दिवस अंतराळात
वास्तव्य करतील असं सिवन यांनी सांगितलं. हे अंतराळ यान पृथ्वीच्या कक्षेपासून ३००
ते ४०० किलोमीटरवर राहील, परतीच्या प्रवासात ते अरबी समुद्रावर किंवा बंगालच्या उपसागरात
अवतरण करेल, ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या सुमारे सहा महिने आधी ही मोहीम राबवली जाण्याची
शक्यता आहे.
****
इंदोर-मनमाड दरम्यान नवीन रेल्वे मार्ग
टाकण्यासाठीच्या करारावर काल नवी दिल्लीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ३६२ किलोमीटर
लांबीच्या या रेल्वे मार्गासाठी जहाजबांधणी मंत्रालयाचं जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट,
रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकार यांच्यात हा करार झाला. या रेल्वे
मार्गामुळे मुंबई आणि पुण्याहून इंदूरपर्यंतचं अंतर १७१ किलोमीटरनं कमी होणार आहे.
****
कुपोषण मुक्तीच्या कार्यक्रमाला गती
देण्याच्या तसंच पालकांमध्ये पोषणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं येत्या १ ते
३० सप्टेंबर या कालावधीत राज्यात ‘राष्ट्रीय पोषण महिना’ उपक्रम राबवण्यात येणार असल्याची
माहिती ग्राम विकास आणि महिला -बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून देशभरात हा उपक्रम राबवण्यात येणार असून ‘सही पोषण,
देश रोशन’ असे घोषवाक्य या मोहिमेसाठी निश्चित करण्यात आलं आहे.
या कालावधीत पोषण आहाराविषयी जनजागृतीसाठी राज्यात
विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
****
फौजदारी गुन्हा दाखल असलेल्या लोकप्रतिनिधींना किवा
व्यक्तींना निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरवण्याची मागणी करणाऱ्या अनेक याचिकांवरचा
निकाल काल सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला. निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारनं या याचिकांवरचा
आपला युक्तीवाद पूर्ण केला आहे. जोपर्यंत व्यक्ती दोषी ठरत नाही, तोपर्यंत ते निरपराध
असून न्यायालय त्याला मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेऊ शकत नाही, ज्यात निवडणूक लढवण्याच्या
हक्काचाही समावेश असल्याचं न्यायालयानं स्पष्ट
केलं.
****
मराठा समाजातल्या
विद्यार्थ्यांचं ५० टक्के शैक्षणिक
शुल्क परत करण्याचे निर्देश महसूल
मंत्री तथा मराठा आरक्षणासंबंधी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत
पाटील यांनी दिले आहेत. मराठा समाजाच्या मागण्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात
राज्य शासनानं नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक काल
पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.
मराठा समाजातल्या आठ लाख रूपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या
पाल्यांना ६०५ अभ्यासक्रमासाठी निम्मं शुल्क भरून प्रवेश देण्यात यावा, असा
निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी
न करणारी महाविद्यालयं, तसंच शैक्षणिक संस्थांविरुद्ध कडक कारवाईच्या सूचना दिल्या असल्याचंही पाटील म्हणाले.
****
केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक
योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या ६ हजार रुपये शिष्यवृत्तीत वाढ करुन ती आता १२ हजार रुपये
इतकी करण्यात आली आहे. ही शिष्यवृत्ती दरवर्षी एकरकमी देण्यात येणार आहे. यासाठी शिष्यवृत्ती
पात्रता परीक्षा आणि बौद्धीक क्षमता परीक्षेत किमान ४० टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
२०१७-१८ या वर्षासाठीचे आदर्श शिक्षक पुरस्कार काल
राज्य सरकारनं जाहीर केले. राज्यातल्या १०८ शिक्षकांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला
आहे. यामध्ये मराठवाड्यातल्या २१ शिक्षकांचा समावेश आहे. प्राथमिक शिक्षकांमध्ये औरंगाबाद
जिल्ह्यातले संजय खाडे, जालना- संतोष मुसळे, बीड -सोमनाथ वाळके, परभणी -नसिरोद्दीन
काझी, हिंगोली -विनायक भोसले, लातूर -संगीता
पवार, नांदेड -छाया बैस आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या रंजना स्वामी यांचा समावेश आहे.
माध्यमिक शिक्षकांमध्ये औरंगाबाद -सुकुमार नवले, जालना - भाऊसाहेब गोरे, बीड- शामसुंदर
घाडगे, परभणी -माधव केंद्रे, हिंगोली -प्रताप देशपांडे, लातूर - शिवलिंग नागापुरे,
नांदेड - डॉ. शेख महोमंद वखीउद्दीन, आणि उस्मानाबादचे कुंडलिक पवार यांचा समावेश आहे.
आदीवासी विभागातून नांदेड जिल्ह्यातल्या शालिनी सेलूकर यांना तर क्रीडा विभागातून औरंगाबादचे
युवराज राठोड यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. स्काउट गाइड विभागात बीड इथले अभिमन्यु
इबिते यांना तर सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार बीड जिल्ह्यातल्या पूनम माने
आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दिपाली सबसगी यांना जाहीर झाला आहे. येत्या ५ सप्टेंबर
रोजी शिक्षक दिनी या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे.
****
इंडोनेशिया इथं सुरु
असलेल्या अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारतानं काल एक सुवर्ण आणि सहा रौप्य
आणि एका कांस्य पदकांची कमाई केली. पुरुषांच्या ८०० मीटर शर्यतीत मनजित सिंगन सुवर्ण
पदक तर जेनसन जॉन्सन यानं रजत पदक पटकावलं.
बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीत पी व्ही सिंधूचा काल अंतिम सामन्यात पराभव झाल्यामुळे तिला
रजत पदकावर समाधान मानावं लागलं आहे. तिरंदाजीमध्ये भारतीय महिला तसंच पुरुष संघांनी
काल रौप्य पदकं जिंकली. ४०० मीटर रिले शर्यत मिश्र गटात भारताला रौप्य पदक मिळालं.
कुस्तीमध्ये मालाप्रभा जाधव हिनं रजत तर पिंकी बल्हारा हिनं कांस्यपदक मिळवलं. या स्पर्धेत
भारताची पदक संख्या ५० झाली असून, नऊ सुवर्ण, १९ रौप्य आणि २२ कांस्य पदकांसह पदक तालिकेत
भारत आठव्या क्रमांकावर आहे.
****
मुंबईतल्या रसायन तंत्रज्ञान संस्था-आयसीटीचं उपकेंद्र
मराठवाड्यात सुरु होणं हा ऐतिहासिक क्षण असल्याचं, संस्थेचे कुलगुरु पद्मश्री जी. डी.
यादव यांनी म्हटलं आहे. जालना इथं कालपासून आयसीटीच्या नियमित तासिकांना सुरुवात झाली,
त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आयसीटीमध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या
संशोधनामुळे मराठवाड्याच्या विकासाला हातभार लागेल, तसंच उद्योगांना कुशल मनुष्यबळ
उपलब्ध होईल, असं ते म्हणाले.
****
प्रत्येक गरीबाला हक्काचं घर मिळावं, या उदात्त हेतुनं
प्रधानमंत्री आवास योजना केंद्र सरकारनं सुरू केली आहे. दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांबरोबरच
अल्प उत्पन्न गटातल्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यासाठी सरकार अनुदान
देतं. औरंगाबाद शहरातल्या नारेगाव भागातले रहिवासी गणेश भालेराव यांना या योजनेचा लाभ
मिळाला, ते म्हणाले…..
माझे नाव गणेश रमेश भालेराव.
औरंगाबाद मध्ये नारेगाव येथील रहिवासी आहे. मी स्वप्नआंगण शेंद्रा एम.आय.डी.सी. मध्ये घर घेतलेल आहे. मी पंतप्रंधान आवास योजनाचा लाभ
घेतला त्यामध्ये मला २ लाख ३८ हजार रूपये मिळाले.
यापुर्वी माझा हफ्ता १९ हजार रूपये होता. पंतप्रधान
आवास योजना मिळाल्याच्या नंतर १५ हजार ८२९
इतका झालेला आहे. या योजना मुळे माझा मंथली हफ्ता कमी झाला आणि त्या मुळे माझ्या आर्थिक
स्थिती मध्येही मदत झाली.
****
मुंबईच्या सुलभी प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा
पंडित वामनराव पाध्ये पुरस्कार परभणी इथले युवा गायक श्रीपाद लिंबेकर यांना जाहीर झाला
आहे. पाच हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. येत्या दोन
सप्टेंबर रोजी पुणे इथं या पुरस्काराचं वितरण होणार आहे.
****
हमी भावा पेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी केल्यास,
व्यापाऱ्याला दंड़ाची आणि कारावासाची शिक्षा करण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात
लातूरमधल्या आडत व्यापाऱ्यांनी काल खरेदी व्यवहार बंद ठेवले. शेतकरी आणि व्यापारी यांच्या
हितासाठी या निर्णयावर फेरविचार करुन तातडीनं तोडगा काढवा अशी मागणी व्यापाऱ्यांनी
केली.
दरम्यान, या निर्णयाच्या
निषेधात काल अहमदनगर इथंही व्यापाऱ्यांनी शेतमाल उतरवून घेतला नसल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment