Sunday, 26 August 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 26.08.2018 - Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 August 2018

Time 18.00 to 18.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ ऑगस्ट २०१ सायंकाळी ६.०० वा.

****

कोणताही नागरी समाज महिलांवर अन्याय सहन करु शकत नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात ते आज देशवासीयांशी संवाद साधत होते. या मालिकेचा आज ४७वा भाग प्रसारित झाला. बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी आढळणाऱ्यांना किमान दहा वर्षांची, तर १२ वर्षांखालच्या मुलींवर शारीरिक अत्याचार करणाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. मुस्लिम महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा असल्याचं आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिलं.

****

तामिळनाडूमधल्या द्रविड मुनेत्र कळघम-डीएमके पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष एम.के.स्टॅलिन यांनी आज पक्षाच्या अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज भरला. पक्षाचे मुख्य सचिव आणि विधानसभेतले विरोधी पक्षाचे उपनेते दुरई मुरुगन यांनी पक्षाच्या कोषाध्यक्ष पदासाठी अर्ज भरला. या दोघांनाही पक्षातून समर्थन असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

कुपोषणाच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी, तसंच विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारनं द्विस्तरीय मॉडेल तयार केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. या मॉडेलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची स्थापना केली जाणार असून, मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली विविध खात्यांच्या योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात नियंत्रण ठेवलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

****

मुंबईतल्या परळ इथल्या क्रिस्टल टॉवरमध्ये बिल्डरच्या बेजबाबदारपणामुळे आग लागून जीवित आणि वित्त हानी झाली, या इमारतीला अधिवास प्रमाणपत्र नसल्यामुळे असे प्रसंग घडतात, असं मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी म्हटलं आहे. अशा घटनांना पालिकेतले संबंधित विभागाचे भ्रष्ट अधिकारी, तसंच आयुक्तही जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांना निलंबित करावं, अशी मागणीही त्यांनी केली.

****

जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव इथल्या वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचं उद्घाटन आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा न्यायिक जिल्हा जळगावचे पालक न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांच्या हस्ते झालं. चाळीसगाव इथं अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालय होण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं ते यावेळी म्हणाले.

****

देशभरात सध्या ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८’ अंतर्गत स्वच्छतेविषयी नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या जात आहेत. त्याअंतर्गत नांदेड जिल्ह्यातही २८, २९ आणि ३० ऑगस्टला विशेष मोहिमेद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी ही माहिती दिली. या सर्वेक्षणातून जिल्हाभरात स्वच्छ भारत अभियानात झालेल्या कामांची माहिती घेण्यात येणार आहे.

****

औरंगाबाद महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातला पांढरा वाघ सचिन सध्या अत्यवस्थ आहे. दोन दिवसांपासून त्यानं अन्नपाणी घेतलं नव्हतं, मात्र आज त्यानं थोड्या प्रमाणात अन्न खाल्यानं त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. प्राणिसंग्रहालयात सध्या नऊ वाघ आहेत. सचिन या वाघावर खडकेश्वर इथल्या पशू चिकित्सालयाचे सहायक आयुक्त डॉ.जी.एन.पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत.

****

उस्मानाबाद इथल्या स्काऊट गाईड कार्यालयात गाईडच्या मुलींनी जिल्हा कारागृहातल्या कैद्यांना राखी बांधून राखी पोर्णिमेचा सण साजरा केला. परभणी शहरातल्या बालविद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थिनींनीही नानलपेठ पोलिस ठाण्यातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या.

****

इंडोनेशिया इथं सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आज चार रौप्य पदकं पटकावली. ॲथलीट  हिमा दासनं महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत, तर मोहम्मद अनसनं पुरुषांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकलं. घोडेस्वारीत फवाद मिर्झानं एकेरी प्रकारात, तर फवाद, जितेंद्र सिंग, आशिष मलिक आणि राकेश कुमार यांनी सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकलं.

बॅडमिंटनमध्ये सायना नेहवाल आणि पी.व्ही.सिंधूनं उपान्त्य फेरीत प्रवेश करत भारताला आणखी दोन पदकं निश्चित केली आहेत. आज झालेल्या उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यात सायनानं थायलंडच्या रतनाचोक इंतनोन हिचा २१ - १८, २१ - १६ असा पराभव केला, तर सिंधूनं नितचॅनोन जिंदपॉट हिचा २१ - ११, १६- २१, २१ - १४ असा पराभव केला. 

धनुर्विद्येमध्ये भारतीय महिला संघानं चिनी तैपेईचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.

या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि १७ कांस्य पदकांसह एकूण ३३ पदकं जिंकत, पदक तालिकेत नववं स्थान मिळवलं आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...