Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 August 2018
Time 18.00 to 18.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ ऑगस्ट २०१८ सायंकाळी ६.०० वा.
****
मुख्यमंत्री
सहाय्यता निधीतून गेल्या साडेतीन वर्षात राज्यातल्या ४३ हजार रुग्णांच्या उपचारासाठी
४१२ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून, धर्मादाय रुग्णालयांतून १७ लाख रुग्णांवर
६५० कोटी रुपयांचा वैद्यकीय खर्च झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता वैद्यकीय
निधी कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी दिली आहे. ते आज कोल्हापूर इथं वार्ताहरांशी
बोलत होते. केंद्र सरकारकडून येत्या ऑक्टोबर महिन्यापासून ‘आयुष्मान योजना’ राबवण्यात
येणार असून, त्यासाठी प्रत्येक तालुका रुग्णालयात उपचाराची सुविधा आणि पाच लाख रुपयांचा
निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.
****
प्रलंबित
खटल्यांचा निपटारा योग्य पद्धतीनं करण्यासाठी मध्यस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची
असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती तथा महाराष्ट्र राज्य
विधी सेवा प्राधिकरणाचे प्रमुख नरेश एच.पाटील यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं
आज ‘मध्यस्थी : क्षमता बांधणी, समस्या आणि आव्हानं’ या विषयावरच्या विभागस्तरीय परिषदेत
ते बोलत होते. मध्यस्थी ही चळवळ असून त्यास अधिक गती देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी
केलं.
****
राज्य
शासनानं नेहमी शेतीच्या विकासावर भर दिला असून, शेतकऱ्यांचं उत्पन्न विविध योजनांच्या
माध्यमातून वाढवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव
लोणीकर यांनी म्हटलं आहे. जालना जिल्ह्यातल्या वाटूर इथं आज शेंदरी बोंड अळी व्यवस्थापनाबाबत
आयोजित शेतकरी मेळावा आणि सरपंच परिषदेत ते बोलत होते. जिल्ह्यातील २७ बँकांच्या १७४
शाखांमार्फत ८२ हजार २६ शेतकऱ्यांना ५३४ कोटी ५३ लाख रुपयांचं पीककर्ज वाटप करण्यात
आलं असून, येत्या ३० ऑगस्टपर्यंत पीक कर्जाचं उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना बँकांना
देण्यात आल्याचं लोणीकर यांनी सांगितलं.
****
महिलांना
उद्योग-व्यवसाय सुरु करण्यासाठीची स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं शासन
प्रयत्नशील असल्याचं, राज्याचे उद्योग विकास आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे यांनी म्हटलं
आहे. औरंगाबाद इथं आज एकदिवसीय महिला उद्योगस्वामिनी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी
ते बोलत होते. देशात आणि राज्यात उद्योजकांमध्ये महिलांचं प्रमाण हे फक्त नऊ टक्के
असून, हे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत नेण्याचं उद्दीष्ट महिला धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीतून
ठेवण्यात आलं असल्याचं ते म्हणाले.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आजपासून येत्या आठ सप्टेंबरपर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या
वतीनं ‘नेत्रदान पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे. नागरिकांनी या सामाजिक चळवळीमध्ये सहभाग घेऊन मरणोत्तर नेत्रदानाचा
स्वत:हून संकल्प करावा, असं आवाहन जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ.संतोष काळे यांनी
केलं आहे.
****
केरळ
पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जालना शहरात आज ‘केरळ पूरग्रस्त सहायता समिती जालना’च्या
वतीनं मदत फेरी काढण्यात आली. मामा चौकापासून काढण्यात आलेल्या या मदत फेरीत सर्वपक्षीय
पदाधिकारी, विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभाग घेत मुख्य बाजारपेठेत फिरून निधी संकलित
केला.
****
रायगड
जिल्ह्यात जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यानं विविध नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या
२२ नगरसेवकांचं पद रद्द होण्याची शक्यता आहे. या नगरसेवकांनी आपली जातवैधता प्रमाणपत्रे
वेळेत सादर केलेली नाहीत, अशी माहिती जिल्हा सामान्य प्रशासन विभागातर्फे देण्यात आली.
****
पुण्यात
कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरमध्ये फेरफार करुन ९४ कोटी रुपये काढण्याच्या घटनेनंतर आता
क्लोन एटीएम कार्डच्या माध्यमातून २८ देशांमधून ७८ कोटी रुपयांचा अपहार करण्यात आल्याची
माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. या देशांमध्ये अमेरिका, रशिया, ब्रिटन आणि संयुक्त
अरब अमिरात हे देश आहेत. पुणे सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त ज्योतिप्रिय
सिंह यांनी ही माहिती दिली. याबाबत पुढच्या कारवाईसाठी सायबर सेल या देशांच्या गुन्हे
अन्वेषण संस्थांच्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
संयुक्त
राष्ट्र संघाचे महासचिव अँन्टानिओ गुटेरस यांनी भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान अटल
बिहारी वाजपेयी यांचा आदर्श मुत्सद्दी असा उल्लेख करत गौरव केला आहे. तसंच गुटेरस यांनी
वाजपेयी यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद
साधणार आहेत. या मालिकेचा हा ४७वा भाग असेल.
****
No comments:
Post a Comment