आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२५ ऑगस्ट २०१८ सकाळी ११.०० वाजता.
****
दक्षिण भारतात ओणम हा सण
आज साजरा होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी
ओणम निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. नुकत्याच झालेल्या
पूरपरिस्थितीतून सावरत असलेल्या केरळमधल्या लोकांसाठी ‘ओणम’ पासून
पुन्हा नव्या पर्वाची सुरुवात होईल, असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं
आहे.
****
देशातली पहिली लक्झरी क्रूझ सेवा मुंबई -गोवा दरम्यान
एक ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. केंद्रीय नौवहन मंत्री नितीन गडकरी यांनी
मुंबईतल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट इथं ही माहिती दिली. केंद्र सरकार सुमारे
एक हजार कोटी रुपये खर्चून मुंबई बंदरात क्रूझ टर्मिनल उभारणार असल्याचंही गडकरी
यांनी सांगितलं.
****
जागरूक मतदार, चांगले नेते, तसंच जबाबदारी आणि पारदर्शकता
यांच्याशिवाय कोणतीही लोकशाही व्यवस्था चांगल्या प्रकारे कार्य करू शकत नाही, असं मत
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं आहे. काल नवी दिल्लीत नेता ॲप नावाच्या
एका मोबाईल ॲपचा शुभारंभ करतांना ते बोलत होते. या ॲपमध्ये लोकांनी निवडून दिलेल्या
प्रतिनिधींच्या आणि नेत्यांच्या कामकाजाबाबत आणि त्यांना देण्यात आलेल्या जबाबदारीबाबत
मतदारांना माहिती मिळू शकेल. जेणेकरून मतदारांना या नेत्यांची खरी ओळख करता येईल.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात काल रात्री पुन्हा
भुकंपाचे हादरे बसले. संगमनेर तालुक्यातल्या घारगाव परिसरात भुकंपाचे धक्के जाणवले,
तीन दिवसांपूर्वीही याच गावात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये
भीतीचं वातावरण पसरलं होतं. तहसिलदार साहेबराव सोनवणे आणि गटविकास अधिकारी सुरेश शिंदे
यांनी या गावाला भेट देऊन, ग्रामस्थांनी घाबरून न जाण्याचं आवाहन केलं.
****
अटल सौर कृषी पंप योजनेअंतर्गत मराठवाड्यात सात हजार कृषी
पंप बसवण्यात येणार असून याबाबतचा अहवाल लवकरच राज्यपालांना पाठवण्यात येणार असल्याची
माहिती मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी दिली आहे. मंडळाची काल औरंगाबाद इथं बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.
//***********//
No comments:
Post a Comment