Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 August 2018
Time 18.00 to 18.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ ऑगस्ट २०१८ सायंकाळी ६.०० वा.
****
येत्या
एक सप्टेंबरला इंडिया पोस्ट पेमेंट बँक- आयपीपीबीचा राष्ट्रीय स्तरावर शुभारंभ होणार
असल्याची माहिती, दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी दिली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या
बैठकीनंतर ते आज वार्ताहरांशी बोलत होते. देशभरात साडेसहाशे ठिकाणी या बँकेच्या शाखा
सुरू होणार असून, येत्या डिसेंबरपर्यंत ही बँक देशातल्या ग्रामीण भागांमध्ये लोकांच्या
घरांपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचवणार असल्याचं सिन्हा यांनी सांगितलं.
****
केंद्रीय
कर्मचाऱ्यांच्या, महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ करण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रीमंडळानं
आज मंजुरी दिली. यामुळे हा भत्ता आता सात टक्क्यावरून नऊ टक्के एवढा झाला आहे. या निर्णयाचा
जवळपास एक कोटी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना लाभ होणार आहे. महागाई
भत्त्यातली ही वाढ या वर्षीच्या एक जुलैपासून लागू होईल.
सागरी
सेवांशी संबंधित अंब्रेला या योजनेला केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं
आज मंजुरी दिली. याअंतर्गत सोळा उप परियोजनांसाठी या समितीनं एक हजार सहाशे तेवीस कोटी
रुपयांचा निधी मंजूर केला. या योजनेद्वारे सुमारे पाच लाख मच्छिमारांना मासळीचं नेमकं
ठिकाण आणि समुद्राच्या स्थितीबद्दल मोबाईल फोनद्वारे माहिती देण्यात येणार असून, यामुळे
वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे.
****
शेतीच्या
आधुनिकीकरणाला उपयुक्त ठरेल अशी, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्याला
राज्य मंत्रीमंडळानं आज मान्यता दिली. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी
केंद्र आणि राज्य सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या योजनांसाठी ही योजना सहाय्यभूत
ठरणार आहे. या योजनेअंतर्गत, कृषी अवजारं आणि यंत्रं खरेदी करण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांसह
बँकांनाही अनुदान देण्यात येणार आहे.
राज्यातल्या
चार पाझर तलावांच्या कामाला या बैठकीत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. यामध्ये औरंगाबाद
जिल्ह्यातल्या एक आणि जळगाव जिल्ह्यातल्या तीन पाझर तलावांचा समावेश आहे.
मुंबईतल्या,
‘बॉम्बे पशुवैद्यकीय महाविद्यालया’चं नाव बदलून ते ‘मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय’
करण्यालाही मंत्रीमंडळानं आज मान्यता दिली.
****
भीमा
कोरेगाव प्रकरणात काल पाच जणांना अटक करतांना मानक प्रक्रियेचं पालन न केल्याच्या कारणावरून
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं महाराष्ट्र सरकार आणि पोलिस महासंचालकांना नोटीस जारी
केली आहे. चार आठवड्यात याबाबतचा अहवाल देण्याचे निर्देश आयोगानं दिले आहेत. काल देशातल्या
अनेक शहरांतून झालेल्या या कारवाईबाबत माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांची स्वत:हून दखल
घेत आयोगानं ही नोटीस जारी केली आहे.
दरम्यान,
नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे पुरावे असल्याच्या आधारावरच भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात
काल विविध राज्यांतून डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असल्याचं
राज्य सरकारनं म्हटलं आहे. या कार्यकर्त्यांना अटक करताना योग्य त्या प्रक्रियांचं
पालन करण्यात आल्याचं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं.
****
नावाजलेल्या
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या खेळाडूंना चमकदार कामगिरी करण्याची
प्रेरणा मिळावी यासाठी येत्या डिसेंबरपासून लातूर ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचं आयोजन
करणार असल्याची माहिती, लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यातल्या विविध विकास कामांच्या उद्घाटन समारंभात ते आज बोलत होते. लातूरच्या
विभागीय क्रीडा संकुलासाठी बत्तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असून, त्यातून जागतिक
दर्जाच्या क्रीडा विषयक सुविधा पुरवणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
नीती
आयोगानं जाहीर केलेल्या, देशभरातल्या एकशे पंधरा मागास जिल्ह्यांच्या यादीतून उस्मानाबाद
जिल्ह्याला बाहेर काढण्यासाठीच्या उपाययोजनांसंदर्भातल्या, उस्मानाबाद जीवन रेखा, या
कार्यशाळेचं आज उस्मानाबाद इथं आयोजन करण्यात आलं होतं. उस्मानाबाद जिल्ह्याचा मानव
विकास निर्देशांक उंचावण्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्यावर भर देणार असल्याचं जिल्हाधिकारी
राधाकृष्ण गमे यांनी यावेळी सांगितलं. जानेवारीत जाहीर झालेल्या या यादीत उस्मानाबादचा
क्रमांक तिसरा होता, मात्र प्रशासनानं नीती आयोगाच्या मानकांनुसार केलेल्या सातत्यपूर्ण
कामांमुळे आज उस्मानाबादचा क्रमांक या यादीत एक्कावन्नावा असल्याचंही गमे यांनी सांगितलं.
****
इंडोनेशियात
सुरू असलेल्या अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या
स्पर्धेत भारताच्या दुती चंदला रौप्य पदक मिळालं. टेबल टेनिस मिश्र दुहेरीत शरत कमल
आणि मणिका बात्रा या जोडीला कांस्यपदक मिळालं. याशिवाय मुष्टीयुद्धात विकास कृष्णन
आणि अमीत पलघल यांनी उपांत्य फेरीत प्रवेश करत प्रत्येकी एक पदक निश्चित केलं आहे.
****
No comments:
Post a Comment