Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 27 August 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ ऑगस्ट २०१८ सकाळी ६.५० मि.
****
· स्थापत्य अभियांत्रिकी, पर्यावरण
पूरक बांधकाम आणि शून्य कचरा संकल्पना या संदर्भात संशोधनाची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त.
· डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी
सचिन अणदुरेच्या सीबीआय कोठडीत ३० ऑगस्टपर्यंत वाढ
· समाजातल्या अनेक प्रश्नांची
सोडवणूक न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून होऊ शकेल हा सर्वसामान्यांचा विश्वास अधिक दृढ
करावा - न्यायमूर्ती नरेश एच.पाटील यांचं आवाहन
आणि
· आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची
काल पाच रौप्य पदकांची कमाई
****
स्थापत्य
अभियांत्रिकी, पर्यावरण पूरक बांधकाम आणि शून्य कचरा संकल्पना या संदर्भात संशोधन होण्याची
गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. काल, आकाशवाणीच्या ‘मन की बात’
या कार्यक्रम मालिकेच्या ४७व्या भागात, येत्या अभियंता दिनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत
होते. स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना म्हणून, वेरुळ इथल्या कैलास लेण्याचा त्यांनी
गौरवपूर्ण उल्लेख केला.
संसदेचं
नुकतंच झालेलं पावसाळी अधिवेशन अत्यंत फलदायी झाल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त
केलं. इतर मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात येत असलेल्या अडथळ्यांवर यावेळी
मात केल्याचं ते म्हणाले. महिलांवरच्या अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी फौजदारी
कायद्यात दुरुस्ती करुन कठोर शिक्षेची तरतूद केल्याचं, पंतप्रधानांनी सांगितलं. मुस्लिम
महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा असल्याचं आश्वासन
त्यांनी दिलं.
केरळ
तसंच देशात इतर ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत जनतेच्या पाठीशी देश खंबीरपणे उभा
असल्याचं, पंतप्रधान म्हणाले. केरळच्या जनतेची जिद्द आणि हिमतीमुळे हे राज्य पुन्हा
पूर्वपदावर येईल, असं सांगतानाच, मदत आणि बचावकार्यात सशस्त्र दलाच्या भूमिकेचं त्यांनी
कौतुक केलं.
जकार्ता
इथं सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकं विजेत्या खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन
केलं. यात महिला खेळाडूंचा उल्लेखनीय सहभाग हा सकारात्मक बदल असल्याचं ते म्हणाले.
आगमी
राष्ट्रीय क्रीडा दिन, तसंच शिक्षक दिनानिमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या.
दिवंगत
पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतींना अभिवादन करत, ते संवेदनशील
कवी, उत्कृष्ट वक्ते आणि सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान होते, असं पंतप्रधानांनी नमूद
केलं.
****
डॉ.नरेंद्र
दाभोलकर हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सचिन अणदुरेच्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण- सीबीआय
कोठडीत, पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयानं येत्या ३० ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. काल
यासंदर्भात झालेल्या सुनावणीत सीबीआयनं, अणदुरेच्या नातेवाईकाकडून जप्त केलेल्या पिस्तुलातून
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांचीही हत्या करण्यात आल्याचा दावा केला. या प्रकरणात
अटक करण्यात आलेला अन्य आरोपी शरद कळसकर आणि अणदुरे यांची एकत्रित चौकशी आवश्यक असल्याचंही
सीबीआयनं न्यायालयाला सांगितलं.
****
अहमदनगर
जिल्ह्यात जामखेड इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांच्या हत्या
प्रकरणी आरोपींना गावठी पिस्तुल पुरवणारा फरार आरोपी, अशोक जाधवला काल, अहमदनगर शहरातूनच
अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी ही माहिती दिली. हा आरोपी बीड
जिल्ह्यातल्या आष्टी इथला रहिवासी आहे.
****
राज्यातल्या
मतदार याद्यांचा ‘विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम’ जाहीर झाला आहे. यानुसार येत्या
एक सप्टेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. या यादीवर येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत
दावे आणि हरकती स्वीकारल्या जातील. चार जानेवारी, २०१९ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
केली जाईल. येत्या एक जानेवारी, २०१९ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांचा या मतदार
यादीत समावेश केला जाईल.
****
समाजातल्या
अनेक प्रश्नांची सोडवणूक न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून होऊ शकेल हा सर्वसामान्यांचा
विश्वास अधिक दृढ करण्याचं आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती
नरेश एच. पाटील यांनी केलं आहे. काल औरंगाबाद इथं, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद
खंडपीठाच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या
३७ वर्षात या कालावधीत औरंगाबाद खंडपीठानं वाखाणण्याजोगं कार्य केलं, असं त्यांनी यावेळी
नमूद केलं. या कार्यक्रमात निवृत्त न्यायमूर्ती बी.एन.देशमुख, न्यायमूर्ती पी.व्ही.हरदास
यांचा सत्कार करण्यात आला.
****
रक्षाबंधन-
राखी पौर्णिमेचा सण काल देशभरात उत्साहात साजरा झाला. मेळघाटातल्या आदिवासी महिलांनी
बांबूपासून बनवलेली राखी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बांधून, हा सण साजरा केला.
उस्मानाबाद
इथं स्काऊट गाईड कार्यालयातल्या मुलींनी जिल्हा कारागृहातल्या कैद्यांना राखी बांधली.
परभणी शहरातल्या बालविद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थिनींनीही नानलपेठ पोलिस ठाण्यातल्या
पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या.
लातूर
इथं माऊली शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या विद्यार्थींनींनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या
जवानांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
औरंगाबाद
इथंही बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांना राखी बांधून महिलांनी राखी पौर्णिमेचा
सण साजरा केला.
****
इंडोनेशिया
इथं सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं काल पाच रौप्य पदकं पटकावली. धावपटू
हिमा दासनं महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत, तर मोहम्मद अनसनं पुरुषांच्या
४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकलं. महिलांच्या १०० मीटर शर्यतीत द्युती
चंदला सुवर्णपदकानं हुकलकावणी दिली, तिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. घोडेस्वारीत
फवाद मिर्झानं एकेरी प्रकारात रौप्य पदक पटकावलं, तर फवाद, जितेंद्र सिंग, आशिष मलिक
आणि राकेश कुमार यांनी सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकलं.
पुरुषांच्या
४०० मीटर अडथळा शर्यतीत संतोष कुमार अंतिम फेरीत दाखल झाला आहे.
बॅडमिंटनमध्ये
सायना नेहवाल आणि पी.व्ही.सिंधूनं उपान्त्य फेरीत प्रवेश करत भारताची आणखी दोन पदकं
निश्चित केली आहेत. तिरंदाजी स्पर्धेतही भारतीय महिला संघानं अंतिम फेरीत धडक मारली
आहे.
या
स्पर्धेत भारत, आतापर्यंत सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि १७ कांस्य पदकांसह एकूण ३३ पदकं
जिंकत, पदक तालिकेत नवव्या स्थानावर आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृवंदन योजनेची अंमलबजावणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये
गरोदर मातांची संस्थात्मक नोंदणी आणि संस्थात्मक प्रसुतीचं प्रमाण वाढलं आहे. अधिक
माहिती देत आहेत आमचे वार्ताहर -
या योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात तीन हजार ५६९ मातांना पाच हजार
रुपयांच्या अनुदानाचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यात ३४ हजार ३८० गरोदर मातांची नोंदणी
झाली होती. गरोदर राहिल्यापासून ते बाळ एक वर्षाचे होऊन त्याचे लसीकरण पूर्ण होईपर्यंत
तीन टप्प्यात हे अनुदान गरोदर मातेच्या बँक खात्यात थेट जमा होते.
मी सीमा तथागत पांढरे. राहणार
आखाडा बाळापूर, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली येथील रहिवासी आहे. मला एक मुलगी आहे.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मातृवंदन योजनेची मी लाभार्थी आहे. मी पहिल्यांदा गरोदर
राहिले तेव्हा मला आमच्या आशाताईने योजनेबद्दल सांगितले. व दवाखान्यात मला अर्ज भरून
घेतला. पहिल्यांदा मला दोन हजार रुपये व बाळंतीण झाल्यावर एक हजार रुपये मिळाले. लसीकरण
पूर्ण झाल्यानंतर मला अजून दोन हजार रुपये मिळणार आहेत. एकूण पाच हजार रुपये मदत मिळणारी
ही योजना लाभदायक आहे. बाळ आणि बाळंतीणीचे आरोग्य राखणारी योजना खेड्यापाड्यातील बायकांसाठी
लाभदायक ठरणारी आहे. याबद्दल ग्रामीण महिलांच्या वतीने मी प्रधानमंत्र्यांची आभारी
आहे.
केंद्र सरकारतर्फे सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मातृवंदन
योजनेमुळे मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी होते आहे. ही योजना ग्रामीण भागातील
महिलांसाठी लाभदायक ठरत आहे. रमेश कदम, आकाशवाणी वार्ताहर, हिंगोली.
****
देशभरात
सध्या ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८’ अंतर्गत स्वच्छतेविषयी नागरिकांच्या प्रतिक्रिया
जाणून घेतल्या जात आहेत. त्याअंतर्गत नांदेड जिल्ह्यातही उद्या, परवा आणि गुरुवारी
३० ऑगस्टला विशेष मोहिमेद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी अशोक काकडे यांनी ही माहिती दिली. या सर्वेक्षणातून जिल्हाभरात स्वच्छ भारत
अभियानात झालेल्या कामांची माहिती घेण्यात येणार आहे.
****
जळगाव
जिल्ह्यात चाळीसगाव इथं वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचं, काल मुंबई उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांच्या हस्ते उद्घाटन झालं. चाळीसगाव
इथं अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालय होण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं ते यावेळी
म्हणाले.
****
पूर्व-भारतात
तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या पूर्व- विदर्भात आज आणि उद्या पावसाचा
जोर वाढेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. नांदेड, हिंगोलीसह मराठवाडा
आणि खानदेशात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
दरम्यान,
नांदेड, परभणी तसंच औरंगाबाद जिल्ह्याच्या काही ठिकाणी काल पाऊस झाल्याचं वृत्त आहे.
****
वर्धा
जिल्ह्यात सेवाग्राम इथं येत्या ३१ ऑगस्टला दोन दिवसीय राज्य ग्रंथालय परिषदेचं आयोजन
करण्यात आलं आहे. महात्मा गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्तानं या परिषदेत गांधींजीचे
विचारविश्व हा चर्चेचा मुख्य विषय असणार आहे.
****
No comments:
Post a Comment