Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 August 2018
Time 18.00 to 18.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ ऑगस्ट २०१८ सायंकाळी ६.०० वा.
****
देशभरातली सर्व विद्यापीठं आणि उच्च शिक्षण संस्थांनी आपापल्या परिसरात जंक
फूड म्हणजे जास्त कॅलरी आणि कमी पौष्टीकता असणाऱ्या पदार्थांवर बंदी घालण्याचे निर्देश
विद्यापीठ अनुदान आयोग-युजीसीनं दिले आहेत. महाविद्यालयांमध्ये जंक फूडवर बंदी घातल्यामुळे
निरोगी अन्नासाठी नवीन मानकं तयार होतील, तसंच विद्यार्थ्यांना होणारे आजार टाळण्यास
मदत होईलं, असं युजीसीनं म्हटलं आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या निर्देशानुसार
युजीसीनं अशा आशयाचं पत्र जारी केलं आहे.
****
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या निधनानं
काँग्रेस पक्षाचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालं असल्याची भावना मुंबई काँग्रेसचे
अध्यक्ष संजय निरुपम यांनी व्यक्त केली आहे. तळागाळातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी
नाळ जोडणारा नेता आपण गमावला अशा शब्दात निरुपम यांनी कामत यांना श्रद्धांजली अर्पण
केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक
चव्हाण, विधानसभेतले विरोधी
पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार
यांनीही कामत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. गुरुदास कामत यांचं आज
सकाळी दिल्लीत निधन झालं, ते ६३ वर्षांचे होते.
****
जैन इंटरनॅशनल संघटनेच्या
वतीनं केरळ इथल्या पुरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू आणि साहित्य असलेले पाच ट्रक
आज मुंबईतून रवाना झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ट्रकला हिरवा झेंडा
दाखवला. या मदत साहित्यात केरळवासीयांसाठी बेडशीट, भांडी, औषधी आदी जीवनावश्यक वस्तूंचा
समावेश आहे.
****
माजी पंतप्रधान अटलबिहारी
वाजपेयी यांचा अस्थिकलश
अंतिम दर्शनासाठी उद्या औरंगाबाद शहरातल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. सकाळी आठ वाजेपासून अकरा वाजेपर्यंत या अस्थिकलशाचं नागरिकांना दर्शन घेता येईल. त्यानंतर हा अस्थिकलश
दुपारी जालना इथं तर
येत्या शुक्रवारी परभणी तसंच नांदेड शहरामध्ये
दर्शनासाठी ठेवण्यात येईल. नांदेड इथं गोदावरी नदीच्या घाटावर या अस्थींचं विसर्जन करण्यात
येणार आहे.
****
औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाचा उद्या ६० वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. या हिरक महोत्सवी
वर्षानिमित्त विविध क्षेत्रातल्या आठ मान्यवरांचा जीवनगौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात येणार असल्याची
माहिती कुलगुरू डॉ.बी.ए.चोपडे यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली. डॉ.बिंदेश्वर पाठक, डॉ.प्रताप पवार, राधेश्याम चांडक, डॉ.राजेंद्र शेंडे, प्राचार्य रा.रं.बोराडे, नामदेव कांबळे, भास्करराव पेरे आणि तुकाराम
जनपदकर गुरुजी यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. या
कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, कुलगुरू डॉ.बी.ए.चोपडे आणि प्र-कुलगुरू डॉ.अशोक तेजनकर
यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी ६५ सुवर्णपदक विजेत्या
विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर
इथं आज धार्मिक स्थळाच्या विटंबनेच्या घटनेवरुन काही काळ तणाव निर्माण झाला होता. या
घटनेतल्या आरोपींचा लवकरात लवकर शोध घेतला जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर
हा तणाव निवळल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्यात आजही अनेक भागात पाऊस
झाला. औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. जायकवाडी धरणाची
पाणी पातळी ३६ टक्क्यांवर गेली आहे. सध्या धरणात २२ हजार पन्नास घनफुट प्रतिसेकंद वेगानं
पाण्याची आवक सुरु आहे.
ठाणे जिल्ह्यातही पावसाची
संततधार सुरु असल्यामुळे भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडले असून, पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
भातसा परिसरात एक जूनपासून आत्तापर्यंत एक हजार आठशे सदुसष्ठ मिलीमीटर पाऊस झाला. बारवी धरण आणि मोडकसागर
धरण १०० टक्के, तर तानसा धारण ९९ टक्के
भरलं आहे.
नाशिक जिल्ह्यात गेल्या
आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे १०५ टक्के खरिपाची पेरणी झाली आहे. आठ तालुक्यांमधे ५० टक्क्यापेक्षा कमी
पाऊस झाल्यानं पेरण्या खोळंबल्या होत्या. आतापर्यंत
झालेल्या पेरण्यांमध्ये ४ लाख २७ हजार ९९२ हेक्टर क्षेत्रावर तृणधान्याची
लागवड केली आहे.
****
इंडोनेशिया इथं सुरु असलेल्या
अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आज आणखी एक सुवर्ण पदक पटकावलं. नेमबाजीत
महिलांच्या २५ मीटर पिस्टल प्रकारात महाराष्ट्राच्या राही सरनोबतनं हे सुवर्ण पदक जिंकलं.
आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. राहीच्या
या यशाबद्दल तिला राज्य सरकारतर्फे ५० लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.
पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं हॉंगकाँगचा २६ - शून्य असा पराभव केला. भारतानं
या स्पर्धेत आतापर्यंत चार सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कांस्य पदक मिळवून पदक तालिकेत
सहावं स्थान मिळवलं आहे.
****
भारत आणि इंग्लंड यांच्यात
नॉटिंगहम इथं झालेला तिसरा कसोटी क्रिकेट सामना भारतानं २०३ धावांनी जिंकला आहे. भारतानं
आपला दुसरा डाव ३५२ धावांवर घोषित करुन इंग्लंडसमोर ५२० धावांचं लक्ष्य ठेवलं होतं.
या धावांचा पाठलाग करताना इग्लंडचा संघ ३१७ धावांमध्ये सर्वबाद झाला. जसप्रित बुमराहनं
पाच, इशांत शर्मानं दोन, तर रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्यानं प्रत्येकी
एक बळी घेतला.
****
No comments:
Post a Comment