Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 28 August 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ ऑगस्ट २०१८
सकाळी ६.५० मि.
****
Ø
भारतीय जनता पक्षाला सत्तेतून घालवणं हेच विरोधी
आघाडीचं उद्दीष्ट; पंतप्रधानपद हा वादाचा मुद्दा नसल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडून स्पष्ट
Ø मागासवर्गीय उमेदवारांना खुल्या प्रवर्गातल्या समांतर आरक्षणांपासून रोखणारं
परिपत्रक तातडीनं रद्द करण्याचे सामाजिक न्याय मंत्र्यांचे निर्देश
Ø
औरंगाबाद इथल्या रॉक्सी चित्रपटगृहाचे
मालक सलीम कुरेशी यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी इम्रान मेहंदी याच्यासह आठ दोषींना जन्मठेप
Ø धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी काल ठिकठिकाणी
ढोल जागर आंदोलन
आणि
Ø आशियाई क्रीडा स्पर्धेत काल नवव्या
दिवशी भारताला एक सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कांस्यपदकं
****
आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सत्तेतून घालवणं
हेच विरोधी आघाडीचं उद्दीष्ट असून, त्यासाठी पंतप्रधानपद हा वादाचा मुद्दा नसल्याचं
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल मुंबईत राष्ट्रवादी
काँग्रेसच्या बैठकीत बोलत होते.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्याला पंतप्रधानपदाची
महत्त्वाकांक्षा नसल्याचं स्पष्ट केल्याबद्दल पवार यांनी समाधान व्यक्त केलं. जास्त
जागा जिंकणाऱ्या पक्षाकडे पंतप्रधान पद राहील, असं पवार म्हणाले. आपण प्रत्येक राज्यात
जाऊन भाजपासोबत नसलेल्या प्रादेशिक पक्षांना विरोधी आघाडीत आणण्याचा प्रयत्न करणार
असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
मागासवर्गीय उमेदवारांना खुल्या प्रवर्गातल्या समांतर
आरक्षणांच्या पदांपासून रोखणारं, १३ ऑगस्ट २०१४ रोजीचं परिपत्रक तातडीनं रद्द करून,
सुधारित परिपत्रक जारी करण्याचे निर्देश, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार
बडोले यांनी काल दिले. काल मुंबईत या संदर्भातल्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत
होते. या परिपत्रकामुळे गुणवत्ता असूनही समांतर आरक्षणासाठीच्या पदांवर मागसवर्गीय
उमेदवारांची निवड होऊ शकत नव्हती, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, प्रत्येक जिल्ह्याच्या सामाजिक न्याय भवनात
स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक कक्ष निर्माण करण्यात येईल, असं बडोले यांनी म्हटलं आहे.
‘ज्येष्ठ नागरिक धोरणाची सर्व विभागांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असं आवाहन, बडोले
यांनी यावेळी केलं.
****
पूर्णत: जैव इंधनावर उडणाऱ्या प्रवासी विमानाचं चाचणी
उड्डाण यशस्वी ठरलं आहे. उत्तराखंडची राजधानी डेहराडून इथून काल सकाळी उड्डाण केलेलं
विमान दिल्ली विमानतळावर सुखरुपपणे उतरलं. भारतीय पेट्रोलियम संस्थेनं हे जैव इंधन
विकसित केलं असून, ही चाचणी यशस्वी ठरल्यामुळे भारतीय हवाई वाहतुक क्षेत्र तसंच ऊर्जा
क्षेत्रासाठी कालचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे.
****
पंतप्रधान जनआरोग्य योजनेला येत्या २५ सप्टेंबरपासून
प्रारंभ होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार
परिषदेत ही माहिती दिली. आयुष्यमान भारत कार्यक्रमांतर्गत राबवल्या जाणाऱ्या या योजनेसाठी
लाभार्थींना नाव नोंदणीची आवश्यकता नसल्याचं, नड्डा यांनी सांगितलं.
****
निवडणूक आयोगानं
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र - इव्हीएम आणि मतदान पोचपावती- व्हीव्हीपॅट, तसंच निवडणूक सुधारणां संदर्भात काल नवी दिल्लीत सर्वपक्षीय
बैठक घेतली. मतदान प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी सर्व पक्षांचे सल्ले विचारात घेऊन, आवश्यक
सुधारणा केल्या जातील, असं, मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी या बैठकीनंतर
सांगितलं.
****
राज्य शासनानं उस्मानाबाद सह नंदूरबार, गडचिरोली
आणि वाशिम या चार जिल्ह्यांसाठी १२१ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी जाहीर केला आहे. या
चार जिल्ह्यांमधल्या विकास कामांच्या प्रगतीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल
दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
****
औरंगाबाद शहरातले राष्ट्रवादी
काँग्रेसचे माजी नगरसेवक, रॉक्सी चित्रपटगृहाचे
मालक सलीम कुरेशी यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी इम्रान
मेहंदी याच्यासह आठ दोषींना, औरंगाबाद जिल्हा
आणि सत्र
न्यायालयानं काल जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
पाच मार्च २०१२ रोजी कुरेशी यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. तत्कालीन
सहायक पोलिस आयुक्त संदीप भाजीभाकरे यांच्या पथकानं इम्रान मेहंदीला या प्रकरणी अटक
करुन, गुन्हा दाखल केला होता. इम्रान मेहंदी आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या चौकशीतून या
टोळीनं सलीम कुरेशी यांच्यापूर्वी अशा अनेक हत्या केल्याची माहिती समोर आली. काल जिल्हा
आणि सत्र
न्यायाधीश
व्ही. व्ही. पाटील यांनी या
सर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
दरम्यान, इम्रान मेहंदीला पळवून नेण्याचा कट रचण्याच्या
माहितीवरून औरंगाबाद गुन्हेशाखेनं काल एका टोळीला अटक केली. अकरा जणांच्या या टोळीतले
सात जण मध्यप्रदेशातले शार्प शूटर असल्याचं समजतं
****
दहशतवाद विरोधी पथक - एटीएसनं परवा रात्री उशीरा जालना शहरानजिक
एका फार्म हाऊसवर छापा टाकून, आक्षेपार्ह साहित्य जप्त केलं. मात्र या कारवाईसंदर्भात
एटीएसकडून सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
धनगर
समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी काल औरंगाबाद, हिंगोली तसंच उस्मानाबाद इथं ढोल जागर आंदोलन
करण्यात आलं. औरंगाबाद इथं आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन
सादर केलं.
हिंगोली जिल्ह्यात हिंगोजी जिल्हाधिकारी
कार्यालयासह वसमत, कळमनुरी, सेनगाव, औंढा इथं आंदोलन
करून, प्रशासनाला निवेदन देण्यात आलं.
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगरी
ढोल जागर आंदोलन करण्यात आलं.
दरम्यान, धनगर समाजाच्या शिष्टमंडळानं काल मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. समाजाच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक
असल्याचं, आणि त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी
या शिष्टमंडळाला दिलं.
****
इंडोनेशियात सुरू असलेल्या आशियाई
क्रीडा स्पर्धेत काल नवव्या दिवशी भारतानं एक सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कांस्यपदकं
मिळवली. भालाफेक क्रीडा प्रकारात नीरज चोप्रानं भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं.
नीरजनं तिसऱ्या प्रयत्नात ८८ पूर्णांक ६ दशांश मीटरची सर्वोकृष्ट फेक केली.
सुधा सिंग हिनं अडथळ्याच्या तीन किलोमीटर धावण्याच्या
स्पर्धेत तर अडथळ्यांच्या ४०० मीटर शर्यतीत धारूण अय्यासामीनं रौप्य पदक पटकावलं. नीना
वराकिल हिनं ६ पूर्णांक ५१ मीटर लांब उडी मारत रौप्य पदक प्राप्त केलं. तर स्क्वॅशमध्ये
सौरव घोषालनं कांस्यपदकाची कमाई केली.
बॅडमिंटनमध्ये सायना नेहवालला उपांत्य फेरीत चीन तैपेईच्या ताई त्झु यिंगकडून पराभव
स्वीकारावा लागल्यामुळे तिलाही कांस्यपदकावरच समाधान मानावं लागलं. मात्र अशियाई क्रीडा
स्पर्धेत बॅटमिंटनसाठी पदक मिळवणारी ती पहिली भारतीय बॅटमिंटनपटू ठरली. दुसरीकडे पी.
व्ही. सिंधुने जपानच्या अकाले यामागुचीवर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेत
अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली. आज तिचा अंतिम सामना चीन
तैपेईच्या ताई त्झु यिंगसोबत होणार आहे.
या स्पर्धेत, आठ सुवर्ण, तेरा रौप्य आणि २० कांस्यपदकासह
भारत, पदकतालिकेत नवव्या स्थानी आहे.
****
देशातल्या प्रत्येक नागरीकांना शासकीय सेवा ऑनलाईन
उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारनं डिजिटल भारत योजनेअंतर्गत कॉमन सर्व्हीस सेंटर- सीएससी सुरू केले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात सुमारे
दोन हजार सीएससी सुरू आहेत. या केंद्राच्या माध्यमातून युवकांना स्वयंरोजगार मिळाला
आहे. श्रीनिवास उल्लीवार यापैकीच एक, आपल्या अनुभवाविषयी ते म्हणाले…
मी श्रीनिवास
बालीन उल्लीवार. एन ७, सिडको येथे डिजिटल भारत या योजनेअंतर्गत कॉमन सर्व्हीस
सेंटर चालत आहे. त्यात आमच्याकडे ऑनलाईन अर्ज भरूण देण्यात येते. कर्जमाफी योजना, फूड लायसन, जिवन प्रमान पत्र, पिक विमा योजना, मोबाईल
रिचार्ज व पॅन कार्ड काढणे इत्यादी सर्व्हीसेस
देण्यात येते. याद्वारे मला स्वयंरोजगार मिळाला आहे. यासाठी मी डिजिटल भारत योजनेचा आभारी आहे.
****
केरळ पूरग्रस्तांसाठी काल बीड इथं
जनकल्याण समितीच्या वतीनं, मदत फेरी काढण्यात आली. शहराचं ग्रामदैवत असलेल्या कंकालेश्वर
मंदिरात, काल श्रावणी सोमवार निमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांनीही मदतीच्या आवाहनाला
प्रतिसाद दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यात बाबतरा इथं, १४ वर्ष वयाची दोन
मुलं गोदावरी नदी पात्रात बुडाल्याची
घटना काल घडली. आंघोळीसाठी
नदीपात्रात उतरलेली ही मुलं,
पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं बुडाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
*****
***
No comments:
Post a Comment