Thursday, 30 August 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.08.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३० ऑगस्ट २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 नोटबंदीचं उद्दीष्ट मोठ्या प्रमाणावर पूर्ण झालं असून, देशाच्या कोणत्याही भागात रकमेचा तुटवडा नाही, असं सरकारनं म्हटलं आहे. आर्थिक व्यवहार सचिव एस पी गर्ग यांनी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. काळा पैसा तसंच दहशतवादी कारवायांना होणारा वित्तपुरवठा, यांना आळा घालणं; डिजिटल व्यवहारांना चालना देणं, आणि चलनात आलेल्या बनावट नोटा  हद्दपार करणं, ही नोटबंदीची उद्दीष्टं होती, आणि ती मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं.

     

 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी चलनात असलेल्या 500 आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याची घोषणा केली होती. त्यानंतर, गेल्या 20 महिन्यात मोठ्या रकमेच्या बनावट नोटा बाजारात आलेल्या नाहीत, असं गर्ग यांनी सांगितलं.

****



 राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा - एनआयए नं हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा प्रमुख सय्यद सलाउद्दीन याच्या मुलाला श्रीनगर इथून अटक केली, एनआयएच्या प्रवक्त्यानं पीटीआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली.

       

 दरम्यान, बांदिपुरा जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली, यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला उत्तर देताना, एक दहशतवादी मारला गेला. शोधमोहीम अजूनही सुरू आहे.

****



 हमी भावा पेक्षा कमी भावानं शेतकऱ्यांकडून शेती माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याला दंड आणि कारावासाची शिक्षा करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात लातूरमधल्या आडत व्यापाऱ्यांनी काल सलग दुसऱ्या दिवशी खरेदी व्यवहार बंद ठेवले. राज्य सरकारनं शेतकरी आणि व्यापारी यांच्या हितासाठी तातडीनं नव्या निर्णयाचा फेरविचार करुन तोडगा काढावा, सरकार जोपर्यंत भूमिका स्पष्ट करत नाही, तोपर्यंत व्यापाऱ्यांचा बंद सुरु राहील असं बाजार समितीचे सभापती ललित शहा यांनी सांगितलं.

****



 हिंगोली शहर पोलिसांनी काल रॉकेलचा सुमारे दीड हजार लीटर अवैध साठा जप्त केला. शहरालगत गारमाळ परिसरातल्या एका घरावर छापा घालून ही कारवाई करण्यात आली.

*****

***

No comments: