Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 26 August 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६
ऑगस्ट २०१८ सकाळी ६.५० मि.
****
·
संरक्षण दलांसाठी ४६ हजार कोटी रुपये किमतीच्या खरेदी
प्रस्तावाला संरक्षण अधिग्रहण मंडळाची मान्यता
·
रेल्वेच्या परिवर्तीय भाडे योजनेत बदल करण्याचा रेल्वे
मंडळांचा निर्णय
·
नालासोपारा स्फोटकप्रकरणी, आणखी एक जण ताब्यात
·
अधिक व्याजदराचं आमिष दाखवून ग्राहकांना कोट्यवधी
रूपयांना गंडा घालणाऱ्या शुभ कल्याण मल्टीस्टेटचा संचालक दिलीप आपेटला अटक
आणि
·
इंडोनेशियातल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत गोळाफेक
स्पर्धेत तेजिंदरपाल सिंगला सुवर्णपदक तर राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत
·
महिला एकेरीत नेहा पंडित
अजिंक्य
****
संरक्षण दलांसाठी ४६ हजार
कोटी रुपये किमतीच्या खरेदी प्रस्तावाला काल संरक्षण अधिग्रहण मंडळानं मान्यता दिली.
नौदलासाठी मालवाहतूक करणारी १११ हेलिकॉप्टर्स, सुमारे २१ हजार कोटी रुपयांना खरेदी
करण्यात येणार आहेत. तसंच पूर्णपणे स्वदेश निर्मित अत्याधुनिक दीडशे तोफांची खरेदी
सुमारे तीन हजार तीनशे पासष्ट कोटी रुपयांना करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्री निर्मला
सीतारामन यांनी त्याखेरीज २४ हजार आठशे एकोणऐंशी कोटी रुपयांचे खरेदी प्रस्ताव मंजूर
केले. त्यात नौदलकरता २४ बहुउपयोगी हेलिकॉप्टर्स, खरेदी करण्याचा प्रस्ताव असून स्वदेशनिर्मित
क्षेपणास्त्र यंत्रणांचाही समावेश आहे. ‘मेक इन इंडिया’ अंतऱ्गत भारतीय उद्योजकांना
प्रोत्साहन देण्याच्या धोरणानुसार या निर्णयात मान्यता देण्यात आली आहे.
****
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून
गेल्या साडेतीन वर्षात राज्यातल्या ४३ हजार रुग्णांच्या उपचारासाठी ४१२ कोटी रुपयांचा
निधी देण्यात आला असून, धर्मादाय रुग्णालयातून १७ लाख रुग्णांवर ६५० कोटी रुपयांचा
वैद्यकीय खर्च झाला आहे. मुख्यमंत्री सहायता वैद्यकीय निधी कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश
शेटे यांनी काल कोल्हापूर इथंही माहिती दिली. केंद्र सरकारकडून येत्या ऑक्टोबर महिन्यापासून
आयुष्मान योजना राबवण्यात येणार असून, त्यासाठी प्रत्येक तालुका रुग्णालयात उपचाराची
सुविधा आणि पाच लाख रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.
****
पुण्यात कॉसमॉस बँकेच्या
सर्व्हरमध्ये फेरफार करुन ९४ कोटी रुपये लुबाडण्याच्या घटनेनंतर आता क्लोन एटीएम कार्डच्या
माध्यमातून २८ देशांमधून ७८ कोटी रुपयांचा अपहार करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी
दिली. या देशांमध्ये अमेरिका, रशिया, ब्रिटन आणि संयुक्त अरब अमिरात या देशांचा समावेश
आहे. पुणे सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त ज्योतिप्रिया सिंह यांनी ही माहिती
दिली. याबाबत पुढच्या कारवाईसाठी या देशांच्या गुन्हे अन्वेषण संस्थांच्या संपर्कात
असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेच्या
परिवर्तीय भाडे- फ्लेक्सी फेअर योजनेत पुढील महिन्यापासून बदल करण्याचा निर्णय रेल्वे
मंडळानं घेतला आहे. कमी गर्दीच्या वेळी ३० टक्क्यांहून कमी आरक्षण झालेल्या काही रेल्वे
गाड्यांसाठी, ही योजना बंद करण्याचा विचार आहे. तर वास्तविक दरांपेक्षा अधिक दरानं
तिकीट विक्री होत असलेल्या हमसफर गाड्यांसाठीच्या योजनेत काही बदल विचाराधीन आहेत,
अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.
****
नालासोपारा स्फोटकां प्रकरणी,
दहशतवाद विरोधी पथकानं मुंबईतल्या घाटकोपर इथून अविनाश पवार याला अटक केली. त्याच्याकडून
एक संगणक आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला. त्याला मुंबईच्या स्थानिक न्यायालयानं ३१
ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नालासोपारा इथं स्फोटकं बनवण्यासाठी गंधक आणि
बॅटरी औरंगाबाद इथून खरेदी केली असल्याचं, चौकशीत निष्पन्न झालं असल्याचं सूत्रांनी
सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज
आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा
हा ४७ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा
कार्यक्रम प्रसारित होईल.
****
प्रलंबित खटल्यांचा निपटारा
योग्य पद्धतीने करण्यासाठी मध्यस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं मत, मुंबई
उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती तथा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे
प्रमुख नरेश एच.पाटील यांनी व्यक्त केलं आहे. काल औरंगाबाद इथं ‘मध्यस्थी : क्षमता
बांधणी, समस्या आणि आव्हानं’ या विषयावरच्या विभागस्तरीय परिषदेत ते बोलत होते. मध्यस्थी ही चळवळ असून त्यास
अधिक गती देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
उद्योग क्षेत्रात महिला उद्योजकांचं
प्रमाण हे फक्त नऊ टक्के असून, महिला धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीतून ते २० टक्क्यांपर्यंत
वाढवण्याचं उद्दिष्ट असल्याचं राज्याचे उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी
म्हटलं आहे. काल औरंगाबाद इथं महिला उद्योगस्वामिनी एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी
ते बोलत होते. महिलांना उद्योग-व्यवसाय सुरु करण्यासाठीची स्वतंत्र व्यवस्था निर्माण
करण्याच्या दृष्टीनं शासन प्रयत्नशील असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.
****
राज्य शासनानं नेहमी शेतीच्या
विकासावर भर दिला असून, विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी
प्रयत्न करत असल्याचं, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे.
जालना जिल्ह्यातल्या वाटूर इथं काल शेंदरी बोंड अळी व्यवस्थापनाबाबत आयोजित शेतकरी
मेळावा आणि सरपंच परिषदेत ते बोलत होते. जिल्ह्यातल्या २७ बँकांच्या १७४ शाखांमार्फत
८२ हजार २६ शेतकऱ्यांना ५३४ कोटी ५३ लाख रुपयांचं पीककर्ज वाटप करण्यात आलं असून, येत्या
३० ऑगस्टपर्यंत पीक कर्जाचं उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्याचं
लोणीकर यांनी सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर.
डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
ग्राहकांना अधिक व्याजदराचं
आमिष दाखवून कोट्यवधी रूपयांना गंडा घालणाऱ्या शुभ कल्याण मल्टीस्टेट या खाजगी बँकेचा
संचालक दिलीप आपेट याला काल बीड पोलिसांनी पुणे इथून अटक केली. या बँकेची स्थापना करून
आपेट यानं राज्यातल्या बँकेच्या १४० शाखांतून ग्राहकांकडून कोट्यवधी रूपये जमा केले.
यात बीड जिल्ह्यात ठेवीदांरांची १३ कोटी रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. बँकेवर फसवणुकीचे
५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या एक वर्षापासून आपेट हा पोलिसांना गुंगारा
देत होता.
****
इंडोनेशिया इथं सुरु असलेल्या
आशियाई क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत तेजिंदरपाल सिंगनं सुवर्णपदक
पटकावलं. ॲथलेटिक्समध्ये हे भारताचं पहिलं सुवर्णपदक आहे. स्क्वॅशमध्ये भारताला काल
तीन कांस्य पदकं मिळाली. पुरुष एकेरीमध्ये सौरभ घोषाल, महिला एकेरीमध्ये दीपिका पल्लिकल
आणि ज्योत्स्ना चिनप्पाला कांस्य पदक मिळालं. महिलांच्या हॉकी स्पर्धेत भारतानं मलेशियाला
चार - एकनं हरवलं. बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू या दोघींनी महिला
एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
पदक तालिकेत भारत सात सुवर्ण,
पाच रौप्य आणि १७ कांस्य पदकांसह आठव्या स्थानावर आहे.
****
लातूर इथं आयोजित राज्यस्तरीय
बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम फेरीत महिला एकेरीत नेहा पंडित
तर महिला दुहेरीत ऋतिका ठाकर आणि सिमरन सिंघी अजिंक्य ठरल्या. मिश्र दुहेरीत मुंबई
उपनगरचे दीप रंभिया आणि पूजा देवळेकर यांनी अजिंक्यपद पटकावलं. पुरुष एकेरीत मुंबई
उपनगरच्या कौशल धर्मामेर नं पुण्याच्या आर्य भिवपत्की चा २१ -१७, २१ - १० असा पराभव
केला.
****
केंद्र शासनानं शेतकऱ्यांसाठी
सुरु केलेली अटल सौर योजना हिंगोली जिल्ह्यात प्रभावीपणे राबवली जात आहे. जिल्ह्यांत
१०० कृषी पंप वाटपाचं उद्दिष्ट असून मागणी केलेल्या शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पूर्तता
झाल्यानंतर हे पंप वाटप करण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ३९
शेतकऱ्यांना कृषी पंपाचं वाटप करण्यात आलं आहे. कळमनुरी तालुक्यातल्या तोंडापूर इथले
या योजनेचे एक लाभार्थी शेतकरी, सिध्दार्थ थोरात यांनी आपला अनुभव या शब्दांत मांडला
-
मला पाच एकर जमीन आहे. कोरडवाहू
जमीन होती आणि त्याच्यातून आम्ही विहीर काढली. विहीरीची योजना घेतली.विहीर काढल्यानंतर
आम्हाला लाईनची सोय नव्हती ही योजना आम्हाला कळाली त्याच्यातून आम्ही पेपर वगैरे जमा
केले.आणि आम्हाला सौर पंपाचा लाभ भेटलेला आहे.त्याच्यातून आम्ही हळद, कापूस याची योजना
घेण्याचे बरेच प्रयत्न करत आहे. त्यातून चांगला लाभ मिळालेला आहे. प्रधानमंत्री योजनेतून जे सौर पंप मिळाले आहे त्याबद्दल आम्ही आभारी आहोत.
*****
दक्षिण मध्य रेल्वे -नांदेड विभागाच्या वतीनं चालवण्यात येत असलेल्या नांदेड
-पनवेल-नांदेड या साप्ताहिक विशेष रेल्वे गाडीच्या ४८ फेऱ्या वाढवण्याचा निर्णय रेल्वे
विभागानं घेतला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात येत्या
आठ सप्टेंबरपर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीनं नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात
येत आहे. या कालावधीत विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे, असं जिल्हा
नेत्र शल्य चिकित्सक डॉ. संतोष काळे यांनी कळवलं
आहे.
****
केरळ पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी
जालना शहरात काल ‘केरळ पूरग्रस्त सहायता समिती’च्या वतीनं मदत फेरी काढण्यात आली. मामा
चौकापासून काढण्यात आलेल्या या मदत फेरीत सर्वपक्षीय पदाधिकारी, विद्यार्थी आणि नागरिकांनी
सहभाग घेत मुख्य बाजारपेठेत फिरून निधी संकलित केला.
****
अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात पाऊस थांबल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात पैठण
इथल्या जायकवाडी धरणात होणारी पाण्याची आवक कमी झाली आहे. धरणातला पाणीसाठा
सध्या ४३ टक्क्यांवर पोहोचला आहे.
//*************//
No comments:
Post a Comment