Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 August 2018
Time 18.00 to 18.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ ऑगस्ट २०१८ सायंकाळी ६.०० वा.
****
भारतीय
अंतराळ संशोधन संस्था-इस्रो पहिल्या भारतीयाला अवकाशात पाठवण्यासाठी सज्ज होत असल्याचं
केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी
बोलत होते. देशाची विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षमता वृद्धींगत करण्यास गगन यानची मदत
होईल, गगन यानच्या प्रवासादरम्यान तीन अंतराळवीर सात दिवस अवकाशात वास्तव्य करतील असं
इस्रोचे अध्यक्ष के.सिवन यांनी यावेळी सांगितलं. अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेपासून ३००
ते ४०० किलोमीटरवर राहील, यासाठी एकूण खर्च १० हजार कोटी रुपयांपेक्षा कमी येणार आहे.
****
इंदोर-मनमाड
दरम्यान नवीन रेल्वे मार्ग टाकण्यासाठीच्या करारावर आज नवी दिल्लीत स्वाक्षऱ्या करण्यात
आल्या. ३६२ किलोमीटर लांबीच्या या रेल्वे मार्गासाठी जहाजबांधणी मंत्रालयाचं जवाहरलाल
नेहरु पोर्ट ट्रस्ट, रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकार यांच्यात हा
करार झाला. या रेल्वे मार्गामुळे मुंबई आणि पुण्याहून इंदूरपर्यंतचं अंतर १७१ किलोमीटरनं
कमी होणार आहे. यामुळे इंदोर आणि मनमाड दरम्यान औद्योगिक संपर्क वाढण्यास मदत होईल,
असं केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
****
केंद्र
शासनामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या सहा हजार रुपये
शिष्यवृत्तीत वाढ करुन ती आता १२ हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. यापूर्वी शिष्यवृत्तीची
रक्कम वर्षातून चार वेळा देण्यात येत होती, ती आता दरवर्षी एकाचवेळी देण्यात येणार
आहे. तसंच या परिक्षेत प्रत्येक विषयात ४० टक्के गुण आवश्यक असण्याची अट आता रद्द करण्यात
आली आहे.
****
पुणे
जिल्ह्यात भीमा कोरेगांव इथं गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचार प्रकरणी आज पुणे पोलिसांनी
देशभरातल्या काही कार्यकर्त्यांच्या घरांवर छापे घातले. हैदराबाद इथं डाव्या विचारसरणीचे
कार्यकर्ते आणि कवी पी. व्ही. राव, मुंबईतले कार्यकर्ते वेरॉन गोन्झालविस आणि अरुण
परेरा, छत्तिसगडच्या कामगार संघटना कार्यकर्त्यां सुधा भारद्वाज, दिल्लीत राहणारे नागरी
हक्क कार्यकर्ते गौतम नवलाखा यांच्या घरावर छापे टाकले. संशयित माओवादी धागे शोधण्यासाठी
पोलिसांनी हे छापे टाकल्याचं एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं.
****
मुंबईतल्या
रसायन तंत्रज्ञान संस्था-आयसीटीचं उपकेंद्र मराठवाड्यात सुरु होणं हा ऐतिहासिक क्षण
असल्याचं या संस्थेचे कुलगुरु पद्मश्री जी.डी.यादव यांनी म्हटलं आहे. जालना इथं आजपासून
आयसीटीच्या नियमित तासिकांना सुरुवात झाली, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आयसीटीमध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या संशोधनामुळे मराठवाड्याच्या विकासाला हातभार
लागेल, तसंच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल, असं ते म्हणाले.
****
परभणी
शहरात येत्या १५ दिवसात नागरी सुविधा उपलब्ध करुन द्याव्या, अन्यथा आंदोलन करण्याचा
इशारा महानगरपालिका आयुक्तांना दिला असल्याचं आमदार राहुल पाटील यांनी सांगितलं आहे.
परभणी इथं ते आज वार्ताहरांशी बोलत होते. परभणी शहरातला एकही रस्ता चांगला नाही, नियोजनाअभावी
१२ ते १५ दिवसाआड पिण्याचं पाणी मिळतं, शहरात ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढीग साठल्यामुळे
नागरिक त्रस्त असल्याचं पाटील म्हणाले.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या अंबेजवळगे या गावात महावितरण कार्यालयातल्या लाईनमनला पंधराशे रुपये
लाच घेताना अटक करण्यात आली. विज मीटरमधलं जास्तीचं आलेलं बील कमी करण्यासाठी आणि वीज
मीटर बदलण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
मुंबईच्या
सुलभी प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा पंडित वामनराव पाध्ये पुरस्कार परभणी इथले
युवा गायक श्रीपाद लिंबेकर यांना जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र
असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. येत्या दोन सप्टेंबर रोजी पुणे इथं या पुरस्काराचं
वितरण होणार आहे.
****
बुलडाणा
जिल्ह्यातली वारकरी साहित्य परिषद शासनाच्या सहकार्यानं वृक्ष लागवड आणि स्वच्छता मोहिमेबाबत
जनप्रबोधन करणार आहे. हा उपक्रम राज्यातल्या ३६ जिल्ह्यात राबवण्यात येणार असून, प्रत्येक
तालुक्यासाठी एका कीर्तनकाराची निवड करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गंत प्रत्येक
तालुक्यात प्रत्येकी एका कीर्तनकार, प्रवचनकार, भारूडकार त्या तालुक्यातल्या ग्रामीण
भागात प्रवचन, भारूड आणि कीर्तनाच्या माध्यमातून जनप्रबोधन करणार आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातल्या बाबरता गावातून नदीपात्रात बुडून वाहून गेलेल्या
दोन लहान मुलांचे मृतदेह आज दुपारी सापडले. एक मृतदेह नांदूर इथं, तर दुसरा बाबुलगाव
इथं सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment