Thursday, 23 August 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.08.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 August 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ ऑगस्ट २०१ सकाळी .५० मि.

****   

v  देशभरात सर्व विद्यापीठांच्या परिसरात जंक फूड वर बंदी - विद्यापीठ अनुदान आयोगाचे निर्देश

v  माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांचं हृदयविकारानं निधन; आज मुंबईत अंत्यसंस्कार

v  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज ६० वा वर्धापन दिन

v नॉटिंगहम कसोटीत भारताचा इंग्लंडवर २०३ धावांनी विजय 

आणि

v आशियाई क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरच्या राही सरनौबतचा सुवर्णवेध

****



 देशभरातली सर्व विद्यापीठं आणि उच्च शिक्षण संस्थांनी आपापल्या परिसरात जंक फूड म्हणजे उष्मांकासह  कमी पौष्टीकता असणाऱ्या पदार्थांवर बंदी घालण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोग - युजीसीनं दिले आहेत. जंक फूडवर बंदीमुळे निरोगी अन्नासाठी नवीन मानकं तयार होतील, तसंच विद्यार्थ्यांना होणारे आजार टाळण्यास मदत होईलं, असं युजीसीनं म्हटलं आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या निर्देशानुसार युजीसीनं अशा आशयाचं पत्र जारी केलं आहे. 

****



 माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं काल नवी दिल्ली इथं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं, ते ६३ वर्षांचे होते. प्रकृती खालावल्यानं काल पहाटे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १९७२ मध्ये कामत यांनी विद्यार्थी चळवळीतून राजकारणात प्रवेश केला. १९७६ला ते भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी परिषद - एनएसयुआयचे अध्यक्ष झाले. १९८४ला ते पहिल्यांदा काँग्रेसकडून लोकसभेवर निवडून गेले. २००९ ते २०११ या कालावधीत ते संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होते. कामत यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, ज्येष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी, प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आदींनी शोक व्यक्त केला आहे.

****



 माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचं मुंबईत स्मारक उभारण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत आयोजित श्रद्धांजली सभेत, अटलजींच्या अस्थिकलशाला अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. अटलजींच्या अस्थिकलशांना राज्याच्या विविध जिल्ह्यात श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर विविध ठिकाणी नदीपात्रात अस्थिविसर्जन होणार आहे.



 औरंगाबाद इथं उस्मानपुरा भागात भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात सकाळी आठ वाजेपासून अकरा वाजेपर्यंत या अस्थिकलशाचं नागरिकांना दर्शन घेता येईल. त्यानंतर हा अस्थिकलश दुपारी जालना इथं तर उद्या शुक्रवारी परभणी तसंच नांदेड शहरामध्ये दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर नांदेड इथं गोदावरी नदीच्या घाटावर या अस्थींचं विसर्जन करण्यात येणार आहे.

****



 मुंबईच्या परळ उपनगरात १७ मजली इमारतीला काल लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला तर अन्य २१ जण जखमी झाले. इमारतीच्या १२ व्या मजल्यावर आग लागली आणि काही वेळातच संपूर्ण इमारतीत धूर पसरला. यामुळे अनेक लोक पायऱ्यांवर अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी या लोकांची सुटका केली.

****



 केरळ इथल्या पुरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू आणि साहित्य असलेले पाच ट्रक काल मुंबईतून रवाना झाले. जैन इंटरनॅशनल संघटनेच्यावतीनं पाठवण्यात आलेल्या या मदत साहित्यात बेडशीट, भांडी, औषधी आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.

****



       हायब्रीड अँन्युइटी प्रणालीअंतर्गत राज्यातले मंजूर रस्ते येत्या मे-२०१९ पर्यंत तीन पदरी होतील. असं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. काल राज्यातील रस्त्यांच्या कामांचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. सर्व रस्ते येत्या डिसेंबरअखेर पर्यंत खड्डेमुक्त करण्यासह विभागास्तरावर प्रत्येक महामार्गांवर महिलांसाठी किमान पन्नास जनसुविधा केंद्र उभारण्याच्या सूचना पाटील यांनी यावेळी दिल्या.

****



 केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कराअंतर्गत जुलै महिन्याचं तीन हे विवरण पत्र भरण्यासाठीची मुदत २४ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. याआधी ही मुदत २० ऑगस्टपर्यंत होती.

****



 औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज ६० वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त विविध क्षेत्रातल्या आठ मान्यवरांचा जीवनगौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर बी. ए. चोपडे यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली. ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे, डॉक्टर बिंदेश्वर पाठक, डॉक्टर प्रताप पवार, राधेश्याम चांडक, डॉक्टर राजेंद्र शेंडे, नामदेव कांबळे, भास्करराव पेरे आणि तुकाराम जनपदकर गुरुजी यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या नाट्यगृहात आज सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. सुवर्णपदक विजेत्या ६५ विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 त्याग आणि समर्पणाची शिकवण देणारा ईद उल अजहा - बकरी ईदचा सण काल सर्वत्र साजरा झाला. औरंगाबाद शहरात मुख्य छावणी इदगाहमध्ये नमाज अदा करण्यात आली.



 उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, नांदेड आणि परभणीतही पारंपारिक पद्धतीनं ईदचा सण साजरा करण्यात आला. लातूर इथं ईदगाह मैदानावर केरळमधल्या पुरग्रस्तांसाठी मदत संकलनासाठी व्यवस्था करण्यात आली होती. नमाज अदा करण्यासाठी जमलेल्या नागरिकांसह शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या लोकप्रतिनिधींनी या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

****



 भारत आणि इंग्लंड यांच्यात नॉटिंगहम इथं झालेला तिसरा कसोटी क्रिकेट सामना भारतानं २०३ धावांनी जिंकला आहे. भारतानं इंग्लंडसमोर विजयासाठी ५२० धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात ३१७ धावांचं करू शकला. जसप्रित बुमराहनं पाच, ईशांत शर्मानं दोन, तर रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्यानं प्रत्येकी एक बळी घेतला. कर्णधार विराट कोहली सामनावीर ठरला. भारतीय संघानं हा विजय केरळच्या पूरग्रस्तांना समर्पित केला असून या सामन्याचं मानधनही पूरग्रस्तांसाठी दिलं आहे. पाच सामन्याच्या मालिकेत यजमान इंग्लंड दोन - एकनं आघाडीवर आहे. मालिकेतला चौथा सामना येत्या तीस तारखेपासून सुरू होईल.

****



 इंडोनेशियात सुरु असलेल्या अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत महिलांच्या पंचवीस मीटर पिस्टल प्रकारात कोल्हापूरच्या राही सरनौबतनं हे सुवर्ण पदक पटकावलं. आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे.



 स्पर्धेत टेनिसमध्ये महिला एकेरीत काल भारताच्या अंकिता रैनानं उपांत्य फेरीत प्रवेश करत भारताचं आणखी एक पदक निश्चित केलं.



 पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत अ गटात तिसऱ्या सामन्यात भारतीय संघानं हॉंगकाँगच्या संघाचा विक्रमी सव्वीस - शून्य असा पराभव केला. यात भारताच्या चार खेळाडूंनी हॅट्रीक नोंदवली.



 भारत या स्पर्धेत आतापर्यंत चार सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कांस्य पदकांसह पदक तालिकेत सहाव्या स्थानावर आहे. 



 दरम्यान, सुवर्णपदक पटकावल्याबद्दल राहीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केलं असून या स्पर्धेत पदक पटकावणाऱ्या राज्यातल्या खेळाडूंना राज्य शासनाकडून रोख पारितोषिकांची घोषणा केली आहे. सुवर्णपदक विजेत्यांना प्रत्येकी पन्नास लाख रुपये, रौप्य पदक विजेत्यांना प्रत्येकी तीस लाख तर कांस्य पदक विजेत्यांना प्रत्येकी वीस लाख रुपये प्रदान करण्यात येती, असं  मुख्यमंत्री म्हणाले.

****



 राज्यात काल अनेक भागात पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यात काल दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. जायकवाडी धरणाची पाणी पातळी ३६ टक्क्यांवर पोहोचली आहे. काल सायंकाळी धरणात २२ हजार पन्नास घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु होती.



 ठाणे जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरु असल्यामुळे भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले भातसा परिसरात एक जूनपासून आत्तापर्यंत एक हजार आठशे सदुसष्ठ मिलीमीटर पास झाला. बारवी धरण आणि मोडकसागर धरण १०० टक्के, तर तानसा धारण ९९ टक्के भरलं आहे.



 नाशिक जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे खरीपाच्या १०५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात आठ तालुक्यांमधे ५० टक्क्यापेक्षा कमी पाऊस झाल्यान पेरण्या खोळंल्या होत्या. आतापर्यंत झालेल्या पेरण्यांमध्ये ४ लाख २७ हजार ९९२ हेकटर क्षेत्रावर तृणधान्याची लागवड केली आहे.

****



 औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातल्या नारंगी - सारंगी धरणात नाशिकच्या पालखेड धरणातून पाणी सोडण्यात आलं आहे. या पाण्यामुळे वैजापूर आणि सभोवतालच्या २५ ते ३० गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

****



 परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर इथं काल धार्मिक स्थळाच्या विटंबनेच्या घटनेवरुन काही काळ तणाव निर्माण झाला होता. या घटनेतल्या आरोपींचा लवकरात लवकर शोध घेतला जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर हा तणाव निवळल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

 हिंगोली जिल्ह्यात अनधिकृत फलकं लावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. विविध कार्यक्रमांसह, घोषणा तसंच जाहिरातींसाठी लावलेली फलकं, भित्तीपत्रकांमुळे होणारं विद्रुपीकरण थांबवण्याचा यामागचा उद्देश आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाचं पथक हिंगोलीसह, औंढा, कळमनुरी, सेनगाव आदी ठिकाणी भेट देऊन कारवाईचा अहवाल नगर परिषद प्रशासन संचालनालयाकडे सादर करणार आहे.

*****

***

No comments: