Friday, 31 August 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.08.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३१ ऑगस्ट २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये चौथ्या बिम्सटेक शिखर परिषदेचं आयोजन केलं जात आहे. बांग्लादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड या सात सदस्य देशांचे नेते यावेळी घोषणापत्र जाहीर करणार आहेत. पंतप्रधान थायलंड, म्यानमार आणि भूतान या देशांच्या नेत्यांशी यावेळी संवाद साधणार आहेत.

****



 वेतनप्राप्त करणारे तसंच व्यापारी आणि अन्य व्यवसायांशी जोडले गेलेल्यांसाठी प्राप्तीकर परतावा दाखल करण्याची आज अंतिम मुदत आहे. दरम्यान, प्राप्तीकर भरणाऱ्यांची संख्या यावर्षी आतापर्यंत पाच कोटी झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही संख्या ६० टक्क्यांनी अधिक आहे. सरकारी वित्त संस्थेसाठी प्राप्ती कर भरणाऱ्यांची संख्या वाढणं हे चांगले संकेत असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

****



 ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना मराठी साहित्यातील भरीव योगदानाबद्दल रानगंध साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. १६ सप्टेंबर रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेडे इथं नामवंत साहित्यिक श्याम मनोहर यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. मंगला घुणावत आणि रामलालजी घुणावत यांनी आपल्या उद्योगाच्या वतीनं कविवर्य ना.धो महानोर यांच्या सन्मानार्थ रानगंध पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.

एक लाख रूपये मानपत्र आणि सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

****



 नांदेडच्या दक्षिण मध्य रेल्वे विभागानं नांदेड ते दिल्ली हजरत निझामुद्दीन या आठवड्यातून एक दिवस धावणाऱ्या रेल्वेगाडीच्या आणखी ५२ फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या जानेवारी पर्यंत ही गाडी सुरू राहील. नांदेड रेल्वे स्थानकातून ही गाडी दर गुरुवारी सुटेल. पूर्णा,  हिंगोली,  अकोला,  खांडवा, भोपाळ, आग्रा, मार्गे ती निझामुद्दीन-नवी दिल्लीला दुसऱ्या दिवशी पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ही गाडी दर शनिवारी दिल्लीहून सुटणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वे विभागानं कळवलं आहे.

//*****//

No comments: