Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 August 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ ऑगस्ट २०१८ दुपारी १.०० वा.
****
पूर्णत: जैव इंधनावर उडणाऱ्या प्रवासी विमानाचं चाचणी
उड्डाण यशस्वी ठरलं आहे. उत्तराखंडची राजधानी डेहराडून इथून आज सकाळी उड्डाण केलेलं
विमान दिल्ली विमानतळावर सुखरुपपणे उतरलं. नागरी हवाई वाहतुक मंत्री सुरेश प्रभू, पेट्रोलियम
मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, पर्यावरण मंत्री डॉ
हर्षवर्धन, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी विमानतळावर उपस्थित होते. भारतीय पेट्रोलियम
संस्थेनं हे जैव इंधन विकसित केलं असून, ही चाचणी यशस्वी ठरल्यामुळे भारतीय हवाई वाहतुक
क्षेत्र तसंच ऊर्जा क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे.
****
निवडणूक सुधारणासंदर्भात चर्चेसाठी निवडणूक आयोगानं आज
नवी दिल्लीत राष्ट्रीय तसंच प्रादेशिक राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे. मतदार याद्यांसंदर्भात
या बैठकीत चर्चा होईल. आगामी लोकसभा तसंच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार
याद्यांची दुरुस्ती तसंच इतर सुधारणांसंदर्भात आयोगानं, राजकीय पक्षांकडून सूचना मागवल्या
आहेत.
****
नंदुरबार जिल्ह्यात सलसाडी शासकीय आश्रम शाळेतल्या एका
विद्यार्थ्यांचा शॉक लागून मृत्यू झाला. सचिन मोरे असं विद्यार्थ्यांचं नाव असून, तो
पाचव्या इयत्तेत शिक्षण घेत होता. या दुर्घटनेनंतर संतप्त पालक तसंच गावकऱ्यांनी सहाय्यक
जिल्हाधिकारी विनय गौडा आणि तहसीलदार योगेश चंद्रे यांच्यावर हल्ला केला, या हल्ल्यात
विनय गौडा गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याचं,
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना जिल्हा कारागृहात एका कैद्यानं आज पहाटे गळफास घेऊन
आत्महत्या केली. रमेश गणेश हिवाळे, असं या कैद्याचं नाव असून, त्याला बाललैंगिक अत्याचार
प्रकरणीत अटक करण्यात आली होती. या प्रकरणी जालना पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद
करण्यात आली आहे.
****
दहशतवाद विरोधी पथक - एटीएसनं काल रात्री उशीरा जालना
शहरानजिक एका फार्महाऊसवर छापा टाकून, आक्षेपार्ह साहित्य जप्त केलं. नालासोपारा स्फोटकं
तसंच डॉ नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणात अटकेत असलेला माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर
याच्या चौकशीत, त्यानं जालना इथं दोन गावठी बॉम्ब तसंच इतर स्फोटकं लपवून ठेवल्याची
माहिती दिली होती, त्याआधारे ही कारवाई करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे, मात्र या कारवाईसंदर्भात एटीएसकडून सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. श्रीकांत
पांगारकरचा औरंगाबाद आणि जालना भागात अनेक तरुणांशी संपर्क असल्याचं समोर आलं आहे.
****
पुणे जिल्ह्यातून उजनी धरणात मोठी आवक होत असल्यानं, उजनी
धरण शंभर टक्के भरलं आहे. आज सकाळपासून धरणातून पाच हजार घनफूट वेगानं भीमा नदी पात्रात
पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा
इशारा देण्यात आला आहे. धरणातली आवक वाढत असल्यानं, विसर्गातही वाढ होण्याची शक्यता
आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असं आवाहन उजनी लाभक्षेत्र प्राधिकरणाच्या
वतीनं करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणातला पाणी
साठा ४४ टक्क्यांवर पोहोचला आहे. अहमदनगर तसंच नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून पाण्याचा
विसर्ग होत असल्यानं, जायकवाडी धरणात सध्या सुमारे साडे तीन हजार घनफूट प्रतिसेकंद
वेगानं पाण्याची आवक सुरू असल्याचं, पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
****
अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची बॅटमिंटनपटू
पी व्ही सिंधू महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल झाली आहे, नुकत्याच झालेल्या रोमांचक
सामन्यात, सिंधूनं जपानच्या अकाने यामागुचीचा २१-१७, १५-२१, २१-१० असा पराभव केला.
दुसरीकडे सायना नेहवालला मात्र, कांस्य पदकावर समाधान
मानावं लागलं. आज सकाळी झालेल्या उपांत्य सामन्यात सायनाचा चीनी तैपईच्या ताई झू यिंगने
१७-२१, १४-२१ असा पराभव केला. मात्र आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅटमिंटन प्रकारात पदक
मिळवणारी ती पहिली भारतीय बॅटमिंटनपटू ठरली आहे.
दरम्यान, स्क्वॅशमध्ये आज भारताच्या पुरुष संघानं इंडोनेशिया
संघाचा तीन शून्यनं पराभव केला. तर भारत आणि थायलंड संघादरम्यान हॉकीचा सामना सध्या
सुरू आहे.
ॲथलेटिक्समध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा,
तर मुष्टीयुद्ध स्पर्धेत विकास कृष्णन आणि अमित फंगल आज मैदानात उतरणार आहेत. महिला
हॉकी, टेबल टेनिस, तसंच व्हॉलीबॉलचे, सामने आज होत असून, भारोत्तोलन आणि घोडेस्वारीतही
भारतीय क्रीडापटूंकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. या स्पर्धेत भारत, आतापर्यंत सात
सुवर्ण, दहा रौप्य आणि २० कांस्य पदकांसह पदक तालिकेत नवव्या स्थानावर आहे.
****
No comments:
Post a Comment