Friday, 24 August 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 24.08.2018....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 August 2018

Time 18.00 to 18.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ ऑगस्ट २०१ सायंकाळी ६.०० वा.

****

आपल्या पूर्वजांकडून देशाला मिळालेल्या संस्कृती, परंपरा आणि वारसा मूल्यांना पुन्हा स्थापित करण्याची गरज, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. आंध्रप्रदेश मधल्या विशाखापट्टणम इथं आज भाभा अणुसंशोधन केंद्र आणि होमी भाभा कर्करोग रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांशी ते संवाद साधत होते. खराब हवामानामुळे शेतीवर होणारे दुष्परिणाम आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर न करण्यावर त्यांनी चिंता व्यक्त केली. ‘स्वच्छ भारत’ आणि ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनांची सुरुवात केल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी केंद्र सरकारची प्रशंसा केली.

****

दिव्यांगांना स्वावलंबी बनवणं ही समाजाची जबाबदारी असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. रायगड जिल्ह्यातल्या पेण इथं आज मतिमंद मुलांच्या शाळेच्या इमारतीचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. दिव्यांगांना त्यांच्या आवडीच्या कलेचं प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी समाजानं प्रयत्न करावेत, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

ऑस्ट्रेलिया आणि महाराष्ट्र यांच्यात पर्यटन आणि व्यापार वाढीसाठी खंडित झालेली विमानसेवा पुन्हा सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. भारतात नियुक्त असलेले ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त हरिंदर सिद्धू यांच्या शिष्टमंडळानं आज मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. गोदावरी नदी खोऱ्याचं काम ऑस्ट्रेलियाबरोबर झालेल्या सामंजस्य करारातून होत असून, मराठवाड्यात वॉटर ग्रीडच्या माध्यमातून पाणी टंचाई दूर करण्याचं काम शासनानं हाती घेतलं आहे, तसंच राज्यात ५० टक्के धरणांचं काम सुरू आहे, यात ऑस्ट्रेलियानं योगदान द्यावं, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

****

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचं आज राज्यातल्या विविध नद्या तसंच गेट वे ऑफ इंडिया नजीक समुद्रात विसर्जन करण्यात आलं.

नाशिक शहरातल्या रामकुंडात पालकमंत्री गिरीश महाजन आणि दुग्ध विकास आणि पशु संवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते अस्थींचं विसर्जन करण्यात आलं. नाशिक इथं काल या अस्थीकलशाचं सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी दर्शन घेतलं.

नांदेड इथं गोदावरी घाटावर विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते अस्थींचं विसर्जन करण्यात आलं. 

****

देशात संविधानाची जोपासना व्हावी यासाठी सर्वत्र दौरा करत असून, आपला कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचं विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांनी म्हटलं आहे. ते आज परभणी इथं वार्ताहरांशी बोलत होते. देशात दहशतीचं वातावरण पसरत असून, सगळ्यांनी एकत्र येऊन याचा सामना केला पाहिजे, असं ते म्हणाले. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत कन्हैया कुमार यांनी, देशात निरपेक्ष वातावरण कसं निर्माण करता येईल, त्यावर आपला भर असल्याचं सांगितलं.

****

धनगर समाजाला आरक्षण जाहीर करावं या मागणीसाठी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाजानं मोर्चा काढला. यात तीन हजारांहून अधिक समाज बांधव उपस्थित असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आरक्षण लागू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या मागणीसाठी आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरदेखील मोर्चा काढण्यात आला.  

****

सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर इथं चंद्रभागा नदीत एक युवक वाहून गेल्याचं वृत्त आहे. हा युवक लातूरचा रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नांदेड रेल्वे विभागातल्या वाणिज्य विभागानं केरळमधल्या पुरग्रस्तांना तीन लाख रुपयांची मदत दिली आहे. केरळ राज्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, लोकांना मदत करण्याचं आवाहन रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष अश्विनी लोहानी यांनी सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना केलं आहे, त्यानुसार नांदेड विभागातल्या कर्मचाऱ्यांनी तीन लाख रुपये इतकी रक्कम जमा केली.

****

इंडोनेशिया इथं सुरु असलेल्या अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आज दोन सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य पदकांची कमाई केली. टेनिसमध्ये पुरुष दुहेरीत रोहन बोपन्ना आणि दीविज शरण यांच्या जोडीनं कझाकिस्तानच्या जोडीचा पराभव करत सुवर्ण पदक जिंकलं. तर दुसरं सुवर्ण पदक नौकानयनमध्ये दत्तु भोकनळ, स्वर्णसिंह, ओम प्रकाश आणि सुखमित सिंह यांच्या संघानं जिंकलं.

कबड्डी मध्ये भारतीय महिला संघाचा अंतिम फेरीत पराभव झाल्यानं त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...