Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 30 August 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३०
ऑगस्ट २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø भीमा कोरेगाव प्रकरणी पाचही कार्यकर्त्यांच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाची
स्थगिती; येत्या सहा सप्टेंबरपर्यंत स्थानबद्धतेचे आदेश
Ø शेतीच्या आधुनिकीकरणासाठी १०० टक्के राज्य पुरस्कृत
कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यास
राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
Ø
अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिहेरी उडीमध्ये
अरपिंदर सिंग याला तर हेप्टॅथ्लॉन मध्ये स्वप्ना बर्मन हिला
सुवर्ण पदक
आणि
Ø
येत्या डिसेंबर महिन्यापासून लातूर इथं
ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचं आयोजन
****
भीमा कोरेगाव प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केलेल्या पाचही
कार्यकर्त्यांच्या अटकेला स्थगिती देत, या सर्वांना येत्या सहा सप्टेंबरपर्यंत स्थानबध्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. सरन्यायाधीश
दीपक मिश्र यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं, यासंदर्भात दाखल याचिकांच्या सुनावणी
दरम्यान हे निर्देश दिले. मतभेद हे लोकशाही पद्धतीत सुरक्षा व्हॉल्व प्रमाणे असतात,
मतभेद व्यक्त झाले नाही, तर विस्फोट होण्याची शक्यता असते, असं न्यायालयानं नमूद केलं.
भीमा कोरेगाव घटनेला नऊ महिने उलटून गेल्यावर केलेल्या या कारवाईवर न्यायालयानं प्रश्न
उपस्थित केला.
दरम्यान, पाच जणांना अटक करतांना, मानक
प्रक्रियेचं पालन न केल्याच्या कारणावरून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं महाराष्ट्र
सरकार आणि पोलिस महासंचालकांना नोटीस जारी केली आहे. चार आठवड्यात याबाबतचा अहवाल देण्याचे
निर्देश आयोगानं दिले आहेत. देशातल्या अनेक शहरांतून परवा झालेल्या या कारवाईबाबत माध्यमांमध्ये
आलेल्या वृत्तांची स्वत:हून दखल घेत आयोगानं ही नोटीस जारी केली.
राज्य सरकारनं मात्र, या कारवाईचं समर्थन करत, नक्षलवाद्यांशी
संबंधांचे पुरावे
असल्याच्या आधारावरच भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात या कार्यकर्त्यांना
अटक केल्याचं म्हटलं आहे. ही कारवाई राबवताना, निर्दिष्ट प्रक्रियेचं पालन
केल्याचं गृहराज्यमंत्री
दीपक केसरकर यांनी सांगितलं.
****
शेतीच्या
आधुनिकीकरणासाठी १०० टक्के राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यास राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. चालू
आर्थिक वर्षापासून या योजनेची
अंमलबजावणी केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसह
अनुसूचित जाती- जमाती प्रवर्गातले
शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांना
ट्रॅक्टरसाठी ३५ टक्के तर इतर बाबींसाठी ५० टक्के अनुदान देण्यात येईल. इतर
लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी २५ टक्के तर इतर बाबींसाठी ४० टक्के अनुदान
दिलं जाईल. याशिवाय कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी ४० टक्के अनुदान देण्यात
येणार आहे. या योजनेसाठी यावर्षापासून प्रत्येक वर्षांकरता ५०
कोटी रूपये निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
जळगाव जिल्ह्यातल्या तीन तर औरंगाबाद
जिल्ह्यातल्या एक अशा एकूण चार पाझर तलावांच्या कामाला
काल मंत्रिमंडळानं प्रशासकीय मंजुरी दिली. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्याच्या सोयगाव
तालुक्यातल्या लिहे तांडा क्रमांक
दोन या पाझर तलावाचा समावेश आहे.
****
राज्य
शासनाच्यावतीने दिला जाणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार येत्या शनिवारी डॉ. किसन
महाराज साखरे यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुण्यातल्या अण्णा भाऊ साठे
नाट्यगृहात सायंकाळी साडेसहा वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. पाच लाख
रूपये, मानपत्र आणि मानचिन्ह असं या
पुरस्कारांचं स्वरुप आहे.
****
येत्या एक सप्टेंबरला इंडिया पोस्ट
पेमेंट बँक- आय पी पी बी चा राष्ट्रीय स्तरावर प्रारंभ होणार आहे, दूरसंचार मंत्री
मनोज सिन्हा यांनी ही माहिती दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते काल वार्ताहरांशी
बोलत होते. देशभरात साडेसहाशे ठिकाणी या बँकेच्या शाखा सुरू होणार असून, येत्या डिसेंबरपर्यंत
ही बँक देशातल्या ग्रामीण भागांमध्ये लोकांच्या घरांपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचवणार
असल्याचं सिन्हा यांनी सांगितलं.
****
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या, महागाई भत्त्यात दोन टक्के
वाढ करण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. या निर्णयाचा जवळपास
एक कोटी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना लाभ होणार आहे. महागाई भत्त्यातली
ही वाढ या वर्षीच्या एक जुलैपासून लागू होईल.
सागरी सेवांशी संबंधित अंब्रेला या योजनेला केंद्रीय
मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं काल मंजुरी दिली. याअंतर्गत सोळा उप परियोजनांसाठी
या समितीनं एक हजार सहाशे तेवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या योजनेद्वारे सुमारे
पाच लाख मच्छिमारांना मासळीचं नेमकं ठिकाण आणि समुद्राच्या स्थितीबद्दल मोबाईल फोनद्वारे
माहिती देण्यात येणार असून, यामुळे वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे.
****
भारतीय अस्मिता अजूनही स्वतंत्र झाली नसल्याचं मत,
जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांनी व्यक्त केलं आहे. काल औरंगाबाद इथं ज्येष्ठ पत्रकार अरुण
करमरकर यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत एका प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते. आशिया
खंडाचं नेतृत्व करण्याची संधी भारताकडे असून, जगासोबत संबंध वृद्धिंगत करणारी भावी
पिढी घडवण्याची जबाबदारी आपण समर्थपणे पार पाडावी, असं आवाहन चितळे यांनी यावेळी केलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारनंही इतर मागासवर्गीयांसाठीची उन्नत प्रवर्ग- क्रिमीलेअरची
मर्यादा दहा लाख रूपयांपर्यंत वाढवण्याच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचं, भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष
विजय चौधरी यांनी सांगितलं आहे. ते काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्य सरकारनं ओबीसी महामंडळाच्या कर्ज
मर्यादेत एक लाख रुपयापर्यंतची वाढ केली असून मुख्यमंत्र्यानी मंडळाला पाचशे कोटी रुपये
निधी जाहीर केल्याची माहिती त्यांनी दिली.
****
इंडोनेशियात सुरू असलेल्या अठराव्या
आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारतानं दोन सुवर्ण आणि प्रत्येकी एक रौप्य आणि कांस्य
पदक पटकावलं. पुरुषांच्या तिहेरी उडी प्रकारात अरपिंदर सिंग यानं तर महिलांच्या हेप्टॅथ्लॉन
क्रीडा प्रकारात स्वप्ना बर्मन हिनं सुवर्ण पदक पटकावलं. महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या
स्पर्धेत भारताच्या दुती चंदला रौप्य पदक मिळालं. टेबल टेनिस मिश्र दुहेरीत शरत कमल
आणि मणिका बात्रा या जोडीला कांस्यपदक मिळालं. याशिवाय मुष्टीयुद्धात विकास कृष्णन
आणि अमीत पलघल यांनी उपांत्य फेरीत प्रवेश करत प्रत्येकी एक पदक निश्चित केलं आहे.
भारतानं आतापर्यंत ११ सुवर्ण, २१ रौप्य आणि २४ कांस्य पदकं जिंकली आहेत.
****
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी क्रिकेट
मालिकेतला चौथा कसोटी सामना आजपासून सुरु होत आहे. मालिकेत दोन एकनं भारत पिछाडीवर
आहे.
****
नावाजलेल्या
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या खेळाडूंना चमकदार कामगिरी करण्याची
प्रेरणा मिळावी यासाठी येत्या डिसेंबर महिन्यात लातूर
ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचं आयोजन करणार असल्याची माहिती, लातूरचे पालकमंत्री संभाजीराव
पाटील निलंगेकर यांनी दिली आहे. जिल्ह्यातल्या विविध विकास कामांच्या उद्घाटन समारंभात
ते काल बोलत होते. लातूरच्या विभागीय क्रीडा संकुलासाठी बत्तीस कोटी रुपयांचा निधी
मंजूर झालेला असून, त्यातून जागतिक दर्जाच्या क्रीडा विषयक सुविधा पुरवणार असल्याचंही
त्यांनी यावेळी सांगितलं.
****
केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत योजने’ अंतर्गत देशात
वैयक्तिक शौचालयं बांधली जात आहेत. या योजनेमुळेच आपण शौचालय बांधू शकलो, असं जळगावचे
लाभार्थी अमोल पाटील यांनी सांगितलं.
स्वच्छ भारत अभियानामुळे
माझ्या घरात स्वत:चे शौचालय बांधले गेले. आमची परिस्थिती तशी फार काही चांगली नव्हती.
आई मोलमजूरी करते, मी सुध्दा रोजंदारीवर काम करतो. वडील तर लहान असतांना सोडून गेले.
घरी शौचालय बांधणे शक्य नव्हते. घरचे सर्व मंडळी सार्वजनिक शौचालयाचा वापर करीत होते.
किंवा मोकळ्या जागेचा वापर करीत होते. केंद्र शासना कडून माननीय पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी केलेल्या स्वच्छ भारत अभियान योजनेमुळे मी शौचालय बांधू शकलो. या योजनेत
मला १८ हजार पर्यंत मदत मिळाली. त्यामुळे घरात शौचालय झाले. मी त्यामुळे परिसर देखील
स्वच्छ आहे. मी शतश: आभारी आहे शासनाचा.
****
नीती आयोगानं जाहीर
केलेल्या, देशभरातल्या एकशे पंधरा मागास जिल्ह्यांच्या यादीतून उस्मानाबाद जिल्ह्याला
बाहेर काढण्यासाठीच्या उपाय योजनांसंदर्भातल्या, उस्मानाबाद जीवन रेखा, या कार्यशाळेचं
काल उस्मानाबाद इथं आयोजन करण्यात आलं होतं. उस्मानाबाद जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक
उंचावण्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्यावर भर देणार असल्याचं जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे
यांनी यावेळी सांगितलं.
*****
***
No comments:
Post a Comment