Wednesday, 29 August 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.08.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 August 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ ऑगस्ट २०१ दुपारी १.०० वा.

****



 भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी पाच नागरी हक्क कार्यकर्त्यांना केलेल्या अटकेविरोधात इतिहास अभ्यासक रोमिला थापर आणि अन्य चार मानवाधिकार कार्यकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयानं या याचिकेवर आज दुपारी सुनावणी घेण्याला होकार दिला आहे. या प्रकरणी अटक केलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांची त्वरित मुक्तता करावी, तसंच या अटकेबाबत स्वतंत्र चौकशीचे निर्देश द्यावेत, अशा मागण्या या याचिकेद्वारे करण्यात आल्या आहेत.

 दरम्यान, याप्रकरणी काल अटक केलेल्या संशयितांपैकी वरवरा राव, व्हरनॉन गोन्साल्विस आणि अरुण फरैरा या तीन जणांना काल रात्री पुण्यात आणण्यात आलं असून, त्यांना आज दुपारी न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

****

 विविध आजारांच्या प्रतिबंधात्मक, तसंच परवडणाऱ्या दरातल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर, सरकार जोर देत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. वाराणसीतल्या भाजप कार्यकर्त्यांशी ते आज दूरदृष्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. सरकारच्या या धोरणाचा गरीब आणि मध्यमवर्गातल्या लोकांना सर्वात जास्त लाभ होईल, असं त्यांनी नमूद केलं. आरोग्याची देखभाल खर्चिक नसावी, असं सांगून, सरकारी योजनांचा लाभ गरिबांपर्यंत पोहोचवणं, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

****

 सध्या मुलांमध्ये लोकप्रिय होऊ पहात असलेला ऑनलाईन खेळ मोमो चॅलेंज पासून मुलांना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं काही सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये, या खेळाच्या आहारी जात असलेल्या मुलांची लक्षणं सांगितली आहेत. मित्र आणि कुटुंबाशी तुटक वागणं, इंटरनेट शिवाय इतर कोणत्याही गोष्टीतल रस कमी होणं आणि अंगावर जखमांच्या खुणा दिसणं, अशा बाबी आढळल्यास पालकांनी तत्काळ सतर्क व्हावं आणि मुलांच्या नेट वापराकडे लक्ष द्यावं, असं या सूचनांमध्ये म्हटलं आहे.

****

 जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातल्या मुनिवार्ड भागात तीन तास चाललेल्या कारवाईत दोन अतिरेकी मारले गेल्याचं वृत्त असून, यातला एक जण हिजबूल मुजाहिदीनचा कमांडर अलताफ काचरू, असल्याचं वृत्त आहे. चकमकीच्या ठिकाणावरून हत्यारं आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. यानंतर, अनंतनाग आणि कुलगाम जिल्ह्यातल्या बहुतांश भागातली इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून, श्रीनगर-बनिहाल दरम्यानची रेल्वेसेवा थांबवण्यात आली आहे.

****

 भारताविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी काही युवकांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवण्यात एका व्यक्तीला अप्रत्यक्ष मदत केल्याबद्दल जम्मूतल्या अंफुला तुरुंगाचा उपाधीक्षक फिरोज अहमद लोन, याला राष्ट्रीय तपास यंत्रणेनं अटक केली आहे. या प्रकरणातला मुख्य संशयित आरोपी इशाक पल्ला याला न्यायालयानं दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

****

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या, अरबी समुद्रातल्या प्रस्तावित स्मारकासाठी, निकषांचं उल्लंघन करून विविध प्रकारच्या मान्यता, देण्यात आल्याच्या आरोपाबाबत केंद्र सरकार आणि महाराष्ट्र किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणानं उत्तर द्यावं, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. याबाबत न्यायालयात दाखल काही याचिकांच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले आहेत.

****

 विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर रद्द करण्यात आलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांबाबतची प्रक्रिया पूर्ण झाल्याचं रिजर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. या निर्णयानंतर नव्व्याण्णव पूर्णांक तीन टक्के नोटा परत आल्याचंही या बँकेनं म्हटलं आहे.

****

 मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून, मिशन ध्वनी अंतर्गत गेल्या साडेतीन वर्षात राज्यातल्या सातशे पासष्ट बालकांवर कॉक्लियर इंप्लांट, ही श्रवणशक्ती देणारी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती, या कक्षाचे विशेष कार्य अधिकारी ओमप्रकाश शेटे यांनी दिली आहे. या योजनेतून, ऐकू न येणाऱ्या पाचशे मुलांवर आगामी वर्षभरात ही शस्त्रक्रिया करण्याचं उद्दिष्ट असल्याचं शेटे यांनी सांगितलं.

****

 इंडोनेशियात सुरू असलेल्या अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत, भारताचा अमित फंगल मुष्टीयुद्ध स्पर्धेच्या उपांत्यफेरीत दाखल झाला आहे. महिला हॉकी संघाचा आज उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. या स्पर्धेत सध्या नऊ सुवर्ण, १९ रौप्य आणि २२ कांस्य पदकांसह भारत पदक तालिकेत आठव्या क्रमांकावर आहे.

*****

***

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...