Friday, 31 August 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 31.08.2018....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 August 2018

Time 18.00 to 18.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ ऑगस्ट २०१ सायंकाळी ६.०० वा.

****

राज्यात अलिकडेच अटक करण्यात आलेले कार्यकर्ते माओवाद्यांशी संबंधित असल्याचे पुरावे आहेत तसंच त्यातील एकाच्या पत्रांमध्ये ‘राजीव गांधी यांच्याप्रमाणे प्रकार’ घडवण्याचा उल्लेख असल्याचं राज्य पोलिसांनी म्हटलं आहे. रोना विल्सन आणि माकपच्या एका नेत्यादरम्यान ईमेल संवादामध्ये ‘मोदीराज’ ‘राजीव गांधी सारख्या प्रकारानं’ संपवण्याचा उल्लेख असल्याचं अतिरिक्त पोलिस महासंचालक परमबीर सिंह यांनी मुंबईत पत्रकारांना सांगितलं. 

****

कोल्हापुरातल्या औद्योगिक वसाहतीमध्ये आज सकाळी आग लागली. डिझेलच्या टाकीला गळती लागल्यानं ही आग लागली. या आगीमध्ये ऑइल आणि भांडी बनवण्याचे दोन कारखाने भस्मसात झाले आहेत. यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालं असून महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या चार बंबांनी सुमारे दीड तास प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. तर एक कारखानदार जखमी झाला असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात औषध उपचार सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं आहे.

****

येत्या डिसेंबर मध्ये तीन राज्याच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागू नये म्हणून भारतीय जनता पक्ष एकत्रित निवडणुकीचा घाट घालत असल्याचा आरोप, महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ते बीड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी टीका केली. इव्हिएम - मतदान यंत्रांच्या उपयोगाबाबतही राज ठाकरे यांनी यावेळी शंका उपस्थितीत केली.    

****

औरंगाबाद इथं एकलव्य संघटनेच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांसाठी आज क्रांती चौकापासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर टीकोरा मोर्चा काढण्यात आला. धनगर समाजाचा अनुसूचीत जमातीमध्ये समावेश करू नये, वन जमीन आदिवासींच्या नावे करण्यात यावी, स्वाभिमान सबळीकरण योजनेचा लाभ तात्काळ मिळावा यासह विविध मागण्यांचं निवेदन आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प आधिकाऱ्यांना देण्यात आलं.

****

औरंगाबाद इथल्या बीड बायपासवर आज सकाळी देवळाई चौकात हायवा ट्रकनं मोटार सायकलला पाठीमागून धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

****

शेतमाल हमीभावापेक्षा कमी दरानं खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या शासन निर्णयाच्या विरोधात हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील खरेदी-विक्री व्यवहार गेल्या तीन दिवसांपासून ठप्प आहेत. सदर शासन निर्णय मागे घेत नाही तो पर्यंत खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय भुसार संघटनेनं घेतला आहे. जिल्ह्यातल्या वसमत बाजार समितीत मात्र खरेदी सुरू असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधकांनी दिली आहे.

जालना इथंही बाजार समितीमधल्या आडत व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार पाच दिवसांपासून बंद ठेवले आहेत. यामुळे शेतकरी, हमाल तसंच मापाड्यांचे हाल होत आहेत. शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत एक निवेदन दिलं असून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या समनापूर इथं जादूटोणा करून पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवणाऱ्या पाच मांत्रिकांना काल मध्यरात्री पोलिसांनी धाड टाकून रंगेहाथ पकडलं. रात्रीच्या गस्तीवरील पोलिसांनी गोरे वस्तीवर ही कारवाई केली. या मांत्रिकांविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासोबत अन्य गुन्ह्यांचीही नोंद करण्यात आली आहे.

****

कर्जमाफी न मिळाल्यानं बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातल्या मुरंबा इथल्या एका शेतकऱ्यानं आज आत्महत्या केली. या शेतकऱ्यानं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पिंपळगाव शाखेतून पीक कर्ज घेतलं होतं. मात्र त्याची परतफेड करू न शकल्यानं त्यांनं आत्महत्या केली.

****

भारतानं इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात साउथम्पटन इथं दुसऱ्या दिवशी उपाहाराला खेळ थांबला तेंव्हा दोन बाद १०० धावा केल्या आहेत. सलामीवीर शिखर धवन २३ आणि लोकेश राहुल १९ धावा काढून बाद झाले आहेत. स्टुअर्ट ब्रॉडनं त्यांना बाद केलं. इंग्लंडचा पहिला डाव २४६ धावांवर आटोपला आहे. पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंड संघ २-१ असा आघाडीवर आहे.

****

इंडोनेशिया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सेलिंगमध्ये भारताच्या वर्षा गौतम आणि श्वेता शेवगर यांनी रौप्य पदक जिकलं आहे. सेलींगमधील ओपन लेझर प्रकारात हर्षिता तोमर हिनं कांस्य पदक जिकलं आहे. वरून ठाकूर आणि गणपती चेनगप्पा यांनी पुरूष सेलिंगमध्ये कास्य पदक पटकवलं आहे. मुष्टीयुध्दात ४९ किलो गटात अमित फनगल अंतिम फेरीत दाखल झाला आहे.

****

No comments: