Thursday, 23 August 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 23.08.2018 - 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 August 2018

Time 18.00 to 18.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ ऑगस्ट २०१ सायंकाळी ६.०० वा.

****

बौद्ध धर्माशी संबंधित पर्यटनाला चालना देण्यासाठी देशात अजुनही योग्य व्यवस्था नसून, यासंदर्भात अधिक विचार करण्याची गरज असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज आंतरराष्ट्रीय बौद्ध संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. केंद्र सरकारनं बौद्ध परिक्रमा स्थळांच्या विकासासाठी अनेक उपाययोजना केल्याचं पर्यटन राज्यमंत्री के जे अल्फोन्स यांनी यावेळी सांगितलं.

या संमेलनाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातल्या अजिंठा इथंही उद्या बौद्ध संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संमेलनात बौद्ध अभ्यागत, भिक्खू आणि बौद्ध राष्ट्रांमधले महावाणिज्यदूत उपस्थित राहणार असून, यावेळी राज्यातल्या बौद्ध आकर्षणांवर प्रकाश टाकणारी सादरीकरणं आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

****

माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते गुरुदास कामत यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत चेंबूर इथल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी त्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी कामत यांचं अंत्यदर्शन घेतलं.

****

माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे अस्थिकलश आज राज्यात विविध ठिकाणी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. औरंगाबाद इथल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात सकाळी हा अस्थिकलश अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. याठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर हा अस्थिकलश दुपारनंतर जालना शहरात ठेवण्यात आला. उद्या शुक्रवारी परभणी आणि नांदेड इथं अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात येईल, त्यानंतर नांदेड इथं गोदावरी घाटावर या अस्थींचं विसर्जन करण्यात येणार आहे.

****

जलयुक्त शिवार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विद्यापीठातल्या संशोधक विद्यार्थ्यांनी यासंदर्भात संशोधन करणं गरजेचं असल्याचं मत विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६०व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. सध्याच्या स्पर्धेच्या युगात मराठवाड्यातला विद्यार्थी टिकण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं गरजेचं असून, विद्यापीठानं त्यादृष्टीनं वाटचाल केली पाहिजे, असं बागडे म्हणाले. विद्यापीठाच्या या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त विविध क्षेत्रातल्या आठ मान्यवरांचा जीवनगौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. डॉ.बिंदेश्वर पाठक, डॉ.प्रताप पवार, राधेश्याम चांडक, डॉ.राजेंद्र शेंडे, प्राचार्य रा.रं.बोराडे, नामदेव कांबळे, भास्करराव पेरे आणि तुकाराम जनपदकर गुरुजी यांना बागडे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं.

****

राज्यातल्या प्राध्यापकांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात येत्या चार सप्टेंबरला मुंबई विद्यापीठात राज्यव्यापी जेल भरो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या अध्यक्ष डॉ.ताप्ती मुखोपाध्याय यांनी दिली आहे. त्या आज औरंगाबाद इथं आयोजित मेळाव्यात बोलत होत्या. यावेळी सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी, कंत्राटी आणि तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना समान काम समान वेतन, निवृत्ती वेतनासह विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. या संघटनेच्या सचिव मधू परांजपे यांनीही यावेळी मार्गदर्शन केलं.

****

कोल्हापूर महानगरपालिकेच्या २० नगरसेवकांचं पद सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. या नगरसेवकांनी जातवैधता प्रमाणपत्र वेळेवर सादर न केल्यानं ही कारवाई केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

केरळ पूरग्रस्तांसाठी आज उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांत जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीनं मदत फेरी काढण्यात आली. या फेरीत जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री यांच्यासह शहरातील अनेक पदाधिकारी यांनी व्यापारी नागरिकांना केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

****

औरंगाबाद शहरातल्या बीड बायपास रस्त्यावर ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी हा अपघात झाला.

****

इंडोनेशिया इथं सुरु असलेल्या अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आज आणखी एक रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली. नेमबाजीत पुरुषांच्या डबल ट्रॅप प्रकारात शार्दुल विहाननं रौप्य पदक जिंकलं. तर टेनिसमध्ये महिला एकेरीत अंकिता रैनानं चीनच्या खेळाडूचा पराभव करत कांस्य पदक पटकावलं. पुरुष दुहेरीत रोहन बोपन्ना आणि दीविज शरण यांच्या जोडीनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. कबड्डी मध्ये भारतीय महिला संघानं चीनी तैपेईचा २७ - १४ असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. मात्र पुरुष संघाला उपान्त्य फेरीत इराणकडून २७ - १८ असा पराभव पत्कराला लागला.

****

No comments: