Friday, 24 August 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 24.08.2018 11.00


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२४  ऑगस्ट २०१८ सकाळी ११.०० वाजता.

****

 ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं आज पहाटे मुलुंड इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते ६३ वर्षांचे होते. श्वसनाच्या तक्रारीनंतर त्यांना परवा मुलुंड इथं एका रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, आज पहाटे उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. मराठी नाटक, चित्रपट तसंच दूरचित्रवाणी मालिकांमधून आपल्या विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले विजय चव्हाण यांनी मोरूची मावशी या नाटकात रंगवलेली प्रमुख भूमिका रसिकांच्या आजही स्मरणात आहे. वहिनीची माया, झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत, अशा जवळपास साडे तीनशेहून अधिक चित्रपटांतून त्यांनी विविध भूमिका रंगवल्या आहेत.

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या १२ वीच्या फेरपरीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल डब्ल्यू डब्ल्यू डब्लयू डॉट महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर पाहता येईल. संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील तसंच या निकालाची प्रतही घेता येईल. १७ जुलै ते चार ऑगस्ट दरम्यान ही फेरपरीक्षा घेण्यात आली होती.

****

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नौकानयन संघानं, सुवर्णपदक पटकावलं आहे. दत्तु भोकनळ, स्वर्णसिंह, ओम प्रकाश आणि सुखमित सिंह यांच्या संघानं, आज सकाळी झालेल्या स्पर्धेत सहा मिनिटं आणि १७ पूर्णांक १३ शतांश सेकंद, या वेळेत निर्धारित लक्ष्य पूर्ण करत, सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेतलं भारताचं हे पाचवं सुवर्णपदक आहे. याआधी सकाळच्या सत्रात दुष्यंत चौधरीनं पुरुषांच्या लाईटवेट सिंगल स्कल्स प्रकारात तर रोहित कुमार - भगवान सिंह जोडीनेही लाईटवेट डबल स्कल्स प्रकारात कांस्यपदक पटकावलं.



//***********//

No comments: