Saturday, 25 August 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 25.08.2018 6.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 August 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ ऑगस्ट २०१ सकाळी .५० मि.

****   

§   औरंगाबाद महापालिकेनं कचरा व्यवस्थापनाचा कालबद्ध कार्यक्रम शपथप्रत्राद्वारे सादर करावा- मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे निर्देश

§   ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं काल मुंबईत दीर्घ आजारानं निधन

§   अजिंठा आणि वेरुळ हा जागतिक स्तरावरचा ऐतिहासिक ठेवा - पर्यटनमंत्री जयकुमार रावल

आणि

§   अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला काल दोन सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य पदकं

****

औरंगाबाद शहरातल्या कचरा व्यवस्थापनासंबधीचा सविस्तर कालबद्ध कार्यक्रम शपथप्रत्राद्वारे सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं औरंगाबाद महानगरपालिकेला दिले आहेत. शहरातल्या कांचनवाडी, हर्सुल तसंच पडेगाव इथल्या नागरिकांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयानं हे आदेश दिले. मनपा आयुक्तांनी या प्रकरणी लक्ष घालण्याचं न्यायालयानं सूचित केलं. चिकलठाणा, हर्सुल, पडेगाव इथल्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून दोन आठवड्यात त्यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे आदेशही न्यायालयानं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत.

****

स्वच्छ भारत अभियानासाठी केंद्र सरकारनं यावर्षी राज्याला सर्वसाधारण घटकासाठीचं ७१६ कोटी रूपयांचं अनुदान मंजूर केलं असल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी काल मुंबईत दिली. हे अनुदान जिल्हा परिषद आणि पाणीपुरवठा तसंच स्वच्छता सहाय्य संस्था यांच्या मार्फत खर्च केलं जाणार असल्याचं लोणीकर यांनी सांगितलं.

****

इंटरनेट हाताळणाऱ्या प्रत्येकानं सायबर सुरक्षेविषयी साक्षर होणं आवश्यक असल्याचं मत, राज्याचे सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केलं आहे. बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, महाराष्ट्र पोलीस तसंच महाराष्ट्र सायबर विभाग यांच्या वतीनं, काल मुंबईत यासंदर्भात आयोजित एक दिवसीय परिषदेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. सामाजिक संपर्क माध्यमं हाताळताना तसंच इंटरनेट द्वारे आर्थिक व्यवहार करताना पूर्णत: सजगता बाळगावी, असं आवाहन ब्रिजेश सिंह यांनी यावेळी केलं.

****

देहू, आळंदी, पंढरपूर आणि सेवाग्राम विकास आराखड्यातल्या कामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. देहू, आळंदी आणि पंढरपूर इथं वारकरी सुविधांच्या विकासासाठी एक हजार ९४ कोटी रुपये मंजूर झाले असून त्यापैकी ७४५ कोटी रूपये वितरित करण्यात आले आहेत. यावर्षी नव्यानं २१२ कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत. सेवाग्रामच्या विकासासाठी १७० कोटी रूपयांच्या आराखड्यासह १७ कोटी रुपये अतिरिक्त निधी देण्यात येणार आहे. या सर्व विकास कामांना गती देऊन ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

****

ऑस्ट्रेलिया आणि महाराष्ट्र यांच्यात पर्यटन आणि व्यापार वाढीसाठी खंडित झालेली विमानसेवा पुन्हा सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त हरिंदर सिद्धू यांच्या शिष्टमंडळानं काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. गोदावरी नदी खोऱ्याचं काम ऑस्ट्रेलियाबरोबर झालेल्या सामंजस्य करारातून होत असून, मराठवाड्यात वॉटर ग्रीडच्या माध्यमातून पाणी टंचाई दूर करण्याचं काम शासनानं हाती घेतलं आहे, यामध्ये ऑस्ट्रेलियानं योगदान द्यावं, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

****

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचं काल राज्यातल्या विविध नद्या तसंच मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथं अरबी समुद्रात विसर्जन करण्यात आलं.

नाशिक इथं पालकमंत्री गिरीश महाजन आणि दुग्ध विकास आणि पशु संवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते रामकुंडात अस्थींचं विसर्जन करण्यात आलं. तर नांदेड इथं गोदावरी घाटावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते वाजपेयींच्या अस्थीं विसर्जित करण्यात आल्या. 

****

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं काल पहाटे मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते ६३ वर्षांचे होते. श्वसनाच्या तक्रारीनंतर त्यांना परवा मुलुंड इथं एका रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, उपचारादरम्यान काल पहाटे त्यांचं निधन झालं. मराठी नाटक, चित्रपट तसंच दूरचित्रवाणी मालिकांमधून आपल्या विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले विजय चव्हाण यांनी ‘मोरूची मावशी’ या नाटकात रंगवलेली प्रमुख भूमिका रसिकांच्या आजही स्मरणात आहे. वहिनीची माया, झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत अशा जवळपास साडे तीनशेहून अधिक चित्रपटांतून त्यांनी विविध भूमिका साकारल्या.

चव्हाण यांच्या पार्थिव देहावर काल दुपारी मुलुंड इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. चव्हाण यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातून दु:ख व्यक्त होत आहे, चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांना व्यापून टाकणारा अष्टपैलू अभिनेता आपण गमावला, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांना श्रद्धांजली अपर्ण केली आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४७वा भाग असेल.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

अजिंठा आणि वेरुळ हा जागतिक स्तरावरचा ऐतिहासिक ठेवा असल्याचं, राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा इथं सहाव्या जागतिक बौद्ध परिषदेत बोलत होते. या जागतिक परिषदेसाठी सहा देशांचे पर्यटनमंत्री आणि २९ देशातून २०० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. या सर्व प्रतिनिधींचं रावल यांनी काल औरंगाबाद इथं स्वागत केलं. देशभरातली महत्त्वाची बौद्ध स्थळं आणि तीर्थस्थळं इथं पर्यटनाला चालना देण्यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

इंडोनेशिया इथं सुरु असलेल्या अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं काल दोन सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य पदकांची कमाई केली. टेनिसमध्ये पुरुष दुहेरीत रोहन बोपन्ना आणि दीविज शरण यांच्या जोडीनं कझाकिस्तानच्या जोडीचा पराभव करत सुवर्ण पदक पटकावलं, तर पुरुष एकेरीत प्रज्नेश गुणेश्वरनला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.

नौकानयन स्पर्धेत दत्तु भोकनळ, स्वर्णसिंह, ओम प्रकाश आणि सुखमित सिंह यांच्या संघानं सुवर्ण पदक जिंकलं.  नौकानयन स्पर्धेतच भारताच्या दुष्यंत चौधरीनं पुरुषांच्या लाईटवेट सिंगल स्कल्स प्रकारात तर रोहित कुमार - भगवान सिंह जोडीनं लाईटवेट डबल स्कल्स प्रकारात कांस्यपदक पटकावलं. नेमबाजीत महिलांच्या १० मीटर एयर पिस्टल प्रकारात हिना सिद्धुनं कांस्य पदक जिंकलं.

कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय महिला संघाचा इराणच्या संघाकडून पराभव झाल्यानं त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.

या स्पर्धेत सहा सुवर्ण, पाच रौप्य आणि चौदा कांस्य पदकांसह पदकतालिकेत भारत आठव्या क्रमांकावर आहे.

****

अटल सौर कृषी पंप योजनेअंतर्गत मराठवाड्यात सात हजार कृषी पंप बसवण्यात येणार असून याबाबतचा अहवाल लवकरच राज्यपालांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी दिली आहे. मंडळाची काल औरंगाबाद इथं बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मोफत सौर ऊर्जा पंप देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

परभणी जिल्ह्यात मातृवंदन योजनेत नऊ हजार तीनशे अठ्ठ्याण्णव महिलांना लाभ झाला आहे. या योजनेसाठी दोन कोटी सदतीस लाख पंच्याण्णव हजार रुपये निधी खर्च झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बी.एन.शिंदे यांनी दिली आहे. जिल्ह्यातल्या पोखर्णी इथल्या शीतल शिंदे यांनी, प्रधानमंत्री मातृवंदन योजनेच्या लाभामुळे आपली गैरसोय टळल्याचं सांगितलं. त्या म्हणाल्या…. 



मी शीतल नरहरी शिंदे परभणी जिल्ह्यातील पोखर्णी नरसिंह येथील रहिवाशी आहे. बाळांतपणासाठी काय करावे असा प्रश्न निर्माण झाला. परंतु प्रधानमंत्री मातृवंदन योजने अंतर्गत लाभ मिळाला. शासनाच्या अनुदानामुळे बाळांतपण सुखरूप झाले. याबद्दल  प्रधानमंत्री  यांचे धन्यवाद.

****

केरळमधल्या पुरग्रस्तांसाठी रेल्वेच्या नांदेड वाणिज्य विभागानं तीन लाख रुपयांची मदत दिली आहे. केरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांनी केलं आहे, त्याला प्रतिसाद देत, नांदेडच्या वाणिज्य विभागातल्या कर्मचाऱ्यांनी ही मदत जमा केली.

****

सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर इथं चंद्रभागा नदीत एक युवक वाहून गेल्याचं वृत्त आहे. हा युवक लातूरचा रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

देशात संविधानाची जोपासना व्हावी यासाठी सर्वत्र दौरा करत असून, आपला कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचं विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांनी म्हटलं आहे. ते काल परभणी इथं वार्ताहरांशी बोलत होते. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत कन्हैया कुमार यांनी, देशात निरपेक्ष वातावरण कसं निर्माण करता येईल, यावर आपला भर असल्याचं सांगितलं.

****

लातूर शहरात लोकमान्य टिळक यांचं स्मारक उभारण्यासाठी येणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी घेऊ असं आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिलं आहे. लोकमान्य टिळक विचार मंचच्या वतीनं काल पालकमंत्र्यांकडे यासंदर्भात मागणी करण्यात आली, त्यानंतर ते बोलत होते. दरम्यान, लातूर महारपालिकेनं प्लास्टिक बंदीच्या कारवाईतून काल ३५ हजार ४०० रूपये दंड वसूल करत, ४०० किलो प्लास्टीक पिशव्या जप्त केल्या. 

****

औरंगाबाद इथं काल भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव उत्साह आणि भक्तिभावाच्या वातावरणात साजरा झाला. यावेळी सिङको-हडको परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली.  

****

उस्मानाबाद जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी भारतीय जैन संघटना जिल्हा प्रशासनाच्या सोबत जिल्ह्यातल्या सिंचन प्रकल्पातला जवळपास एक लाख मेट्रीक टन गाळ काढणार आहे. भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

//*********//

No comments: