Tuesday, 28 August 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.08.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 August 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ ऑगस्ट २०१ दुपारी १.०० वा.

****



 भारत पुढच्या वर्षात जगातली पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल अशी अपेक्षा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत भारतीय बँक संघटनेच्या ७१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते. भारतात सध्या अर्थव्यवस्थेत जे बदल होत आहेत, त्यात बँकिंग उद्योगाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, यासाठी बँकिंग व्यवस्थेत व्यावसायिकता, विश्वासार्हता आणि बँकिंग क्षेत्राचा विस्तार होणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. या सभेच्या निमित्तानं बँकिंग क्षेत्रानं दीर्घकालीन विकासासाठी आराखडा तयार करण्याची गरज जेटली यांनी व्यक्त केली. 

****



 ड्रोनच्या सुरक्षित आणि व्यावसायिक वापराकरता केंद्र सरकारनं नियम जाहीर केले आहेत. येत्या एक डिसेंबर पासून हे नियम लागू होणार असल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं. नव्या नियमानुसार ड्रोनचा वापर केवळ दिवसा आणि ४०० फूट उंचीवरुन करता येईल. हवाई क्षेत्राला रेड झोनमध्ये ठेवण्यात आल्यानं या भागात ड्रोनच्या वापरांवर बंदी घालण्यात आली आहे. येलो झोन हे नियंत्रित हवाई वाहतुकीसाठी निश्चित करण्यात आलं असून, ग्रीन झोन हे स्वयंचलित अनुमतीसाठी उपलब्ध आहे.

****



 कर्जबुडव्या विजय मल्ल्या याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यासंदर्भात पुढच्या सुनावणीसाठी मुंबईच्या विशेष न्यायालयानं तीन सप्टेंबर ही तारीख निश्चित केली आहे. बँकांचं नऊ हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवल्या प्रकरणी काही इतर पक्षांनी कागदपत्रं मागवली आहेत. नवीन काळा पैसा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मल्ल्या याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यासाठी पाच पक्षांनी कागदपत्रं मागवल्याचं एका अधिकाऱ्यानं म्हटलं आहे. सक्तवसूली संचालनालयानं मल्ल्याविरोधात आरोपपत्र दाखल केल्यानंतर न्यायालयानं मल्ल्याला २६ ऑगस्टला न्यायालयात हजर राहण्याबाबत नोटीस बजावली होती.

****



 द्रविड मुनेत्र कळघम - डीएमके पक्षाच्या अध्यक्षपदी एम के स्टॅलिन यांची निवड करण्यात आली आहे. चेन्नई इथं आज झालेल्या पक्षाच्या सर्वसाधारण बैठकीत पक्षाचे सरचिटणीस के अन्बाळगन यांनी स्टॅलिन यांची अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाल्याचं सांगितलं. अध्यक्षपदासाठी स्टॅलिन यांनीच अर्ज भरला होता. या सभेत पक्षाचे माजी अध्यक्ष एम के करुणानिधी, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव संमत करण्यात आला. या बैठकीत केरळमधल्या पुरात मृत्यू झालेल्यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.   

****



 ग्रामीण भागात महिलांच्या आर्थिक स्वावलंबनातून निर्माण होणाऱ्या सबलीकरणातूनच आर्थिक समृद्धी येईल, असं ग्रामविकास आणि महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. खारघर इथं काल मिलाप - महाअस्मिता इन्नोव्हेटीव्ह लाईव्हलीहूड ॲक्सीलरेशन प्रोग्राम या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचं उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. राज्य शासनाच्या ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि मिलाप च्या माध्यमातून महिला बचत गटांच्या चळवळीला पाठबळ देऊन, येत्या दोन वर्षात पाच लाख महिला बचत गट स्थापन करण्यात येतील, असं त्यांनी सांगितलं. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला बचत गटांना मुंडे यांच्या हस्ते यावेळी सन्मानित करण्यात आलं. त्यात बीड जिल्ह्यातल्या वारणी इथल्या सावित्रीबाई फुले स्वयंसहाय्यता गटाचा समावेश आहे. उस्मानाबाद इथल्या लघु उद्योजक सल्लागार कमल कुंभार यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आलं.

****



 इंडोनेशिया इथं सुरु असलेल्या अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं, नुकत्याच झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चिनी तैपेईच्या ताई झू यिंगने सिंधूचा  २१-१३, २१-१६ असा पराभव केला. आशियाई स्पर्धेत बॅटमिंटनच्या अंतिम फेरीत पोहोचणारी सिंधू ही पहिली भारतीय बॅटमिंटनपटू आहे.



 तीरंदाजीमध्ये भारतीय महिला तसंच पुरुष संघांनी आज रौप्य पदकं जिंकली. महिलांच्या अंतिम फेरीत मुस्कान किरार, मधुमिता कुमारी आणि ज्योती सुरेशा वेन्नम यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाला कोरिया संघाकडून २३१ -२२८ असा पराभव पत्करावा लागला.



पुरुषांच्या संघालाही अटीतटीच्या अंतिम लढतीत रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं, कोरिया संघासोबत २२९ - २२९ अशी बरोबरी झाल्यानंतर, शूट आऊटमध्ये कोरिया संघ विजेता ठरला.



ॲथलीट हिमा दास आणि दुती चंदनं महिलाच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे.



या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत आठ सुवर्ण, १६ रौप्य आणि २० कांस्य पदकाची कमाई करत पदक तालिकेत नववं स्थान मिळवलं आहे.

*****

***

No comments: