Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 December 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ डिसेंबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
वीर बाल दिनाच्या पार्श्वभूमीवर
‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान
करण्यात आले. यावेळी बोलतांना राष्ट्रपतींनी, देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर
बालकांप्रति समाज सदैव कृतज्ञ राहील, असं नमूद केलं. पुरस्कारप्राप्त बालकांचं कौतुक
करतांना राष्ट्रपती म्हणाल्या -
बाईट-राष्ट्रपती
यावर्षी १८ राज्यं
आणि केंद्रशासित प्रदेशात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या २० बालकांना हे पुरस्कार देऊन
गौरवण्यात आलं. यामध्ये छत्रपतीसंभाजीनगर इथल्या अर्णव महर्षी या मुलाचा समावेश आहे.
अर्णवने वैयक्तिक अनुभवातून अर्धांगवायू झालेल्या रुग्णांसाठी विकसित केलेल्या उपकरणासाठी
त्याला गौरवण्यात आलं. अर्णवने आपला अनुभव या शब्दांत व्यक्त केला -
बाईट – अर्णव
****
‘वीर
बाल दिवस’ आज साजरा केला जात आहे. शीख धर्माचे दहावे गुरु गोविंदसिंह यांचे सुपुत्र साहिबजादे बाबा जोरावरसिंग आणि साहिबजादे बाबा फतेहसिंग
यांच्या हौतात्म्याचं स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात वीर
साहिबजाद्यांच्या बलिदानासोबतच माता गुजरीदेवी यांची अढळ श्रद्धा आणि गुरु गोबिंदसिंह यांचे शाश्वत उपदेश यांचं स्मरण
केलं. हा दिवस धैर्य आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक असून, साहिबजाद्यांचं
जीवन आणि त्यांचे आदर्श देशाच्या भावी पिढ्यांना सदैव
प्रेरणादायी ठरतील, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
या दिनानिमित्त दिल्लीत भारत मंडपम इथं
आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले आहेत.
****
हुतात्मा उधम
सिंग यांच्या १२६ साव्या
जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. तत्कालिन
पंजाबमधील सुनाम इथं १८९९
साली जन्मलेल्या उधम सिंग यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा सूड घेत
तत्कालीन पंजाबचे लेफ्टनंट गव्हर्नर मायकेल ओ’ड्वायर यांची
हत्या केली होती.
****
केंद्रीय
गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्ली इथं दहशतवाद विरोधी परिषदेचं उद्घाटन
करतील. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत
दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये तांत्रिक तसंच राष्ट्रीय
सुरक्षेवर परिणाम करणाऱ्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
****
विकसित भारत
योजने अंतर्गत वर्ष २०४७ पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी ग्रामीण
भागात विविध विकास कार्य राबविले जातील, असं कृषी मंत्री शिवराज
सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्ली इथं बोलत होते. या योजनेत मजुरी, साहित्य आणि
प्रशासनिक घटकांसाठी एकूण १ लाख ५१ हजार रुपयांच्या वार्षिक निधीची गरज असून
त्यापैकी केंद्र सरकारचा वाटा ९५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, असं चौहान
यांनी सांगितलं.
****
यमगरवाडीसारखे
सेवा प्रकल्प,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीच्या वाटचालीत पथदर्शी
असल्याचे गौरवोद्गार संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी काढले. ते काल
धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातल्या यमगरवाडी प्रकल्पात ज्येष्ठ
स्वयंसेवकांच्या सन्मान समारंभात बोलत होते. या कार्यक्रमात भैय्याजी जोशी यांच्या
हस्ते पद्मश्री भिकुजी तथा दादा इदाते, पद्मश्री गिरीश
प्रभुणे, डॉक्टर अभय शहापूरकर, डॉक्टर
राघवेंद्र डंबळ, महादेवराव गायकवाड, वैजनाथ आप्पा लातूरे यांच्यासह या यमगरवाडी प्रकल्पावर पूर्णवेळ सेवा
देणाऱ्या ओक आणि पवार दांपत्याचा सत्कार करण्यात आला.
****
वाशिम इथं
आजपासून दोन दिवसीय 'वत्सगुल्म जिल्हा' मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ झाला. त्यानिमित्तानं
काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद
मिळाला. या साहित्य संमेलनात विविध चर्चासत्र, परिसंवाद आणि कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं
आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर महापालिका
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत
समन्वय साधण्यासाठी शिवसेना तसंच भाजप नेत्याची समिती स्थापन करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार स्थापन या समितीत भाजप तसंच शिवसेनेच्या
प्रत्येकी पाच नेत्यांचा समावेश आहे.
****
महिला
क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका दरम्यान तिसरा टी-ट्वेंटी सामना आज तिरूवनंतपुरम
इथं खेळवला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरूवात होईल. पाच
सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला संघ दोन – शून्यने आघाडीवर आहे.
****
No comments:
Post a Comment