Sunday, 21 December 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.12.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 21 December 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ डिसेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश, भाजप सर्वाधिक ठिकाणी विजयी

·      मराठवाड्यात ४९ नगरपरिषदा आणि ३ नगर पंचायतींमध्ये भाजपला ४१ तर महायुतीला ११ जागांवर विजय

·      भाजप आणि महायुतीचा विजय म्हणजे लोकांनी विकास कामाला दिलेली पावती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

आणि

·      संभाजीनगरमध्ये शिवसेना, काँग्रेसला प्रत्येकी दोन, भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला प्रत्येकी एक नगराध्यक्षपद

****

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीनं मोठं यश मिळवलं आहे. भारतीय जनता पक्ष सर्वाधिक ठिकाणी विजयी झाला आहे. काल तसंच गेल्या दोन डिसेंबरला झालेल्या, एकंदर २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकींच्या निकालाचं चित्र यातून स्पष्ट झालं. भारतीय जनता पक्षातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार यात भाजप ला १४२ तर महायुतीला ४६ जागांवर विजय मिळाला आहे. मराठवाड्यात ४९ नगरपरिषदा आणि ३ नगर पंचायतींमध्ये भाजपला ४१ तर महायुतीला ११ जागांवर विजय मिळाला.

कोकण – ठाणे २२ नगरपरिषदा आणि ५ नगर पंचायतींच्या निवडणुकांत भाजपला १७ तर महायुतीला १० जागांवर विजय मिळाला. उत्तर महाराष्ट्र - ४५ नगरपरिषदा आणि ४ नगर पंचायतींमध्ये भाजप ३९ तर महायुतीला १० ठिकाणी यश मिळालं. पूर्व विदर्भमध्ये ४० नगरपरिषदा आणि १५ नगर पंचायतींच्या निवडणुकांत भाजपला ५५ जागा मिळाल्या. पश्चिम विदर्भात ४० नगरपरिषदा आणि ५ नगर पंचायतींच्या निवडणूकांत भाजपला ४२ तर महायुतीला ३ जागा जिंकता आल्या. पश्चिम महाराष्ट्र - ५० नगरपरिषदा आणि १० नगर पंचायतींमध्ये भाजपला ४८ तर महायुतीला १२ जागांवर विजय मिळाला आहे.

****

हा विजय म्हणजे लोकांनी विकास कामांना दिलेली पावती, असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोंदवली आहे. ते म्हणाले -

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

बीड जिल्ह्यातील सहा नगराध्यक्षांपैकी बीड, माजलगाव, किल्ले धारूर तीन नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, अंबाजोगाई, गेवराई या दोन नगराध्यक्ष पदावर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मात्र माजलगाव या एका ठिकाणी नगराध्यक्ष पदावर समाधान मानावं लागलं. जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई, परळी, माजलगाव, गेवराई आणि किल्ले धारूर या सहा नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान झालं. बीड जिल्ह्यातील बीड नगरपरिषद ही अतिचुरशीची ठरली यामध्ये भाजप चे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर या दोन क्षीरसागर यांना धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार प्रेमलता पारवे या विजयी झाल्या आहेत.

बीड - राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेमलता पारवे, किल्ले धारूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे बालासाहेब जाधव, परळी वैद्यनाथ महायुतीचे‌ - पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी विजयी झाले आहेत. अंबाजोगाई - भारतीय जनता पक्षाचे नंदकिशोर मुंदडा, गेवराई - भारतीय जनता पक्ष उमेदवार गीता भाभी पवार तर माजलगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या श्रीमती चाऊस विजयी झाल्या.

बीड जिल्ह्यात नगर परिषदेच्या निवडणुक मतमोजणीला आज सकाळी सुरुवात होत असताना पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. मतमोजणी केंद्रात जाण्यासाठी मोठी गर्दी उसळल्यानं झालेल्या गोंधळावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली.

****

परभणी जिल्ह्यात गंगाखेडच्या नगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पच्क्षाच्या उर्मिला केंद्रे, जिंतूर इथं भारतीय जनता पक्षाचे प्रताप देशमुख नगराध्यक्ष म्हणून तर, सेलू इथं भाजपचेच मिलिंद सावंत नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत.

****

जालना जिल्ह्यातल्या परतूर, भोकरदन आणि अंबड नगरपरिषदेचा निवडणूक निकाल आज जाहीर झाला. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत परतूरमध्ये भाजपाच्या प्रियांका राक्षे, अंबडमध्ये भाजपाच्या देवयानी कुलकर्णी, तर भोकरदनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या समरीन मिर्झा यांचा विजय झाला. नगरसेवक पदासाठी परतूरमध्ये भाजपचे सहा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सहा, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पाच तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसचे प्रत्येकी तीन नगरसेवक विजय झाले आहेत. अंबड नगरपरिषदेत भाजपचे १४, रासपचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चार, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा प्रत्येक एक उमेदवार विजयी झाला. भोकरदन नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला सत्ता राखण्यात यश आलं आहे. या ठिकाणी शरद पवार गटाचे नऊ, भाजपचे आठ, काँग्रेसचा एक तर शिवसेनेचा एक नगरसेवक निवडून आला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद मध्ये काँग्रेसचे अमेर पटेल, फुलंब्री इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजेंद्र ठोंबरे, सिल्लोड मध्ये शिवसेनेचे अब्दुल समीर, कन्नड इथं काँग्रेसच्या फरीन बेगम जावेद, गंगापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय जाधव तर वैजापूर मध्ये भारतीय जनता पक्षाचे डॉ. दिनेश परदेशी हे नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत.

****

नांदेड जिल्ह्यातील विजयी नगराध्यक्ष आणि त्यांचे पक्ष याप्रमाणे -

भोकर - भारतीय जनता पक्षाचे भगवानराव दंडवे

मुदखेड - विश्रांती माधव पाटील - भारतीय जनता पक्ष,

कुंडलवाडी - प्रेरणाताई कोटलवार - भारतीय जनता पक्ष

उमरी - शकुंतला मुदीराज - राष्ट्रवादी कॉंग्रेस

देगलूर - विजयमाला टेकाळे - राष्ट्रवादी कॉंग्रेस

बिलोली - संतोष कुलकर्णी - मराठवाडा जनहित पार्टी

धर्माबाद - संगीता बोलमवाड - मराठवाडा जनहित पार्टी

मुखेड - विजया देबडवार - शिवसेना

हदगाव - रोहिणी भास्कर वानखेडे - शिवसेना

कंधार - शहाजी नळगे - काँग्रेस

हिमायतनगर - शेख रफिक शेख महेबुब - काँग्रेस

तर किनवट इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुजाता विनोद एंड्रलवार नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत.

जनतेनं विकासाला मतदान केलं असल्याची प्रतिक्रीया भाजपचे नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

बाईट – भाजप नेते अशोक चव्हाण

****

धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून आठपैकी चार नगरपालिकांवर भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत तर उर्वरित चार नगरपालिकांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. धाराशिव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या नेहा राहुल काकडे तर तुळजापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी विनोद गंगणे, नळदुर्ग नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी बसवराज धरणे आणि मुरूम नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी बापूराव पाटील यांचा विजय झाला आहे. धाराशिव नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे २१ नगरसेवक विजयी झाले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आठ, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ०८, एम आय एम एक तर काँग्रेसला तीन जागा मिळाल्या आहेत. तुळजापूर नगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचे १८ तर महाविकास आघाडीला पाच जागा मिळाल्या आहेत, मुरूम नगरपालिकेत भाजपाचे १९ नगरसेवक निवडून आले आहेत तर नळदुर्ग नगरपालिकेत भाजपाचे १० नगरसेवक निवडून आले आहेत. भूम नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी संयोगिता गाढवे या नगराध्यक्ष म्हणून विजयी झाल्या आहेत. या नगरपालिकेत स्थानिक आघाडी जनशक्ती आघाडीला १४ तर संजय गाढवे, संयोगिता गाढवे यांच्या अलमप्रभू नगर विकास आघाडीला सहा नगरसेवक विजयी करण्यात यश आलं आहे. परंडा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी शिंदे सेनेचे जाकीर सौदागर विजय झाले आहेत. परंड्यात २० पैकी सहा ठिकाणी शिवसेना, सहा ठिकाणी भाजप, नऊ ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर एका ठिकाणी काँग्रेस विजयी झाले आहे. कळंब नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी शिंदे सेना भाजपा युतीच्या सौ सुनंदा कापसे या विजयी झाल्या असून कळंब मध्ये भाजपा शिवसेना युतीला २० पैकी भाजपला सहा, शिवसेनेला चार, उद्धव बाळासाहेब ठाकरे नऊ, काँग्रेस एक अशा जागा निवडून आणण्यात यश मिळाल आहे. मुरूम नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला १९ शिवसेना एक तर काँग्रेसला नऊ जागा मिळाल्या आहेत.

****

No comments: