Sunday, 21 December 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.12.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 21 December 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक डिसेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·         राज्यातल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीची आज मतमोजणी

·         २३ नगरपरिषदा आणि नगर पंचायतींसाठी शांततेत मतदान; धर्माबाद इथं पैसे वाटपाच्या आरोपाचं निवडणूक अधिकाऱ्यांकडून खंडन

·         बृहन्मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार

·         रामायण-महाभारत हे जागतिक राजकारणाचे धडे देणारे मार्गदर्शक ग्रंथ-पुणे पुस्तक महोत्सवात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचं प्रतिपादन

·         टी-२० क्रिकेट विश्वचषकासाठी सूर्यकुमार यादव र्णधार-शुभमन गिलला विश्रांती

आणि

·         १९ वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदासाठी आज भारत – पाकिस्तान लढत

****

राज्यातल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल. या मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

परभणी इथं जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी मतमोजणीच्या ठिकाणी नागरिक सुरक्षा संहितेचं कलम १६३ लागू केलं आहे.

****

दरम्यान, राज्यातल्या २३ नगरपरिषदा आणि नगर पंचायतींच्या अध्यक्ष तसंच सदस्यपदांसाठी, तसंच विविध नगरपंचायतींमधल्या १४३ सदस्यपदांसाठी मतदान प्रक्रिया काही किरकोळ अपवाद वगळता काल शांततेत पार पडली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री नगरपंचायतीतल्या प्रभाग १६ तसंच नगराध्यक्ष पदासाठी सुमारे ८४ टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे. पैठणच्या चार जागांसाठी सुमारे ७७ टक्के, वैजापूर इथं दोन जागांसाठी सुमारे ६८, तर गंगापूर इथं ७३ टक्के मतदान झालं.

लातूर जिल्ह्यातल्या निलंगा नगरपरिषदेसाठी ६७ पूर्णांक ३७, तर रेणापूर नगरपंचायतीसाठी तब्बल ८० पूर्णांक ५१ टक्के मतदान झालं. तसंच उदगीर नगरपरिषदेतल्या तीन जागांसाठी ५८ पूर्णांक २२ टक्के मतदानाची नोंद झाली.

हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत नगर परिषदेत सुमारे ७४ टक्के, तर जालना जिल्ह्यात भोकरदन नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक दोन आणि नऊसाठी एकूण ७३ टक्के मतदान झालं.

बीड जिल्ह्यात परळी इथं ६० पूर्णांक ३५, अंबाजोगाईत ६४ पूर्णांक ११, किल्ले धारूर इथं ६६ पूर्णांक २०, तर बीड नगर परिषदेसाठी ७३ टक्के मतदान नोंदवलं गेलं.

धाराशिव जिल्ह्यातल्या धाराशिव नगरपरिषदेत ५६ पूर्णांक ४०, तर उमरगा इथं ६३ पूर्णांक ७६ टक्के मतदान झालं. परभणी जिल्ह्यात जिंतूर इथं ६१, तर पूर्णा इथं सुमारे ७१ टक्के मतदानाची नोंद झाली.

 नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड नगरपरिषदेसाठी सुमारे ७६, तर धर्माबाद नगरपरिषदेसाठी ७१ पूर्णांक ७७ टक्के मतदान झालं. कुंडलवाडी इथं एका प्रभागासाठी झालेल्या मतदानात ७९ पूर्णांक १५, भोकर इथल्या एका प्रभागासाठी ७७ आणि लोहा इथल्या एका प्रभागासाठी ७८ पूर्णांक ५३ टक्के मतदान झालं.

दरम्यान, धर्माबाद इथं मतदान सुरू असताना पैशाचं वाटप होत असल्याच्या आरोपावरून गोंधळ झाला. लग्नाच्या हॉलमध्ये कथितरीत्या काही मतदारांना अडवून ठेवल्याचं वृत्त खासगी वाहिन्यांनी दिलं होतं. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याचं खंडन केलं. पोलिस आणि निवडणूक पथकानं भेट दिली असता इथं कोणीही आढळून आलं नसल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं.

****

बृहन्मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. सर्व २२७ जागांवर लढायची काँग्रेसची तयारी असल्याचं ते म्हणाले. देशाच्या विविध भागांमधून आलेले लोक मुंबईत राहतात, त्यांच्यात एकता राखण्यासाठी आणि त्यांच्या हितासाठी काँग्रेसनं हा निर्णय घेतल्याचं चेन्निथला यांनी सांगितलं. या निवडणुकीतही धर्मा-धर्मामध्ये फूट पाडायचा प्रयत्न होत असून, हे राजकारण संपायला हवं, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

****

शिवसंग्राम पक्ष आगामी महानगरपालिका निवडणुका लढवणार असल्याचं  पक्षाच्या अध्यक्षा डॉ. ज्योती मेटे यांनी सांगितलं आहे. लोकनेते विनायकराव मेटे विकास आघाडीच्या माध्यमातून पक्ष निवडणूक लढणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या संदर्भात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, तसंच पुणे इथल्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.

****

व्हॉट्सॲप इतर उपकरणांशी जोडण्याच्या प्रक्रियेतल्या कमजोर दुव्यामुळे व्हॉट्सॲप खात्यांवर सायबर हल्ले होण्याची शक्यता, सीईआरटी या राष्ट्रीय सायबर सुरक्षा संस्थेनं वर्तवली आहे. या कमजोर दुव्याला ‘घोस्ट पेअरिंग’ असं नाव देऊन यासंदर्भात संस्थेनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या. व्हॉट्सॲपचं खातं एखाद्या उपकरणाशी जोडताना पडताळणी न करता पेअरिंग कोड्स वापरून सायबर हल्लेखोर व्हॉट्सॲप खात्यांचं पूर्ण नियंत्रण मिळवू शकतात, हे टाळण्यासाठी ओळखीच्या व्यक्तीकडून आलेल्यासुद्धा संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नये, किंवा व्हॉट्सॲप, फेसबुकसारख्या दिसणाऱ्या कोणत्याही बाहेरच्या संकेतस्थळावर आपला फोन नंबर देऊ नये, अशी सूचना सीईआरटीनं केली आहे.

****

माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं काल मुंबईत निधन झालं, त्या ९८ वर्षांच्या होत्या.  कायदेतज्ज्ञ असलेल्या शालिनीताई पाटील यांनी माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या ठोस भूमिकेसाठी त्या ओळखल्या जात. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या त्या पत्नी होत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रातून अनेक मान्यवरांनी शालिनीताई यांना श्रद्धांजली अर्पण केली

****

रामायण आणि महाभारत ही फक्त धार्मिक पुस्तकं नसून ती जागतिक राजकारणाचे धडे देणारे उत्तम मार्गदर्शक ग्रंथ असल्याचं प्रतिपादन, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केलं आहे. काल पुण्यात,पुणे पुस्तक महोत्सवात 'फ्रॉम डिप्लोमसी टू डिस्कोर्स'  या विषयावरच्या व्याख्यानात ते बोलत होते.  केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील   यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.भारताचं परराष्ट्र धोरण आता पाश्चात्य विचारांच्या पलीकडे जाऊन आपल्या सभ्यता आणि संस्कृतीवर आधारित असायला हवं, असंही जयशंकर यांनी नमूद केलं.

****

बुलडाणा जिल्ह्यातल्या कदमापूर इथल्या जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांनी गणित विषयात कमालीचं प्रभुत्व मिळवलं आहे. हे विद्यार्थी अवघ्या काही सेकंदात गुणाकार,भागाकार,बेरीज-वजाबाकी करून त्यांचा पडताळाही करतात. या उपक्रमाविषयी शा शाळेतले गणिताचे शिक्षक राजेश कोगदे यांनी अधिक माहिती दिली.

बाईट – शाळेतले गणिताचे शिक्षक राजेश कोगदे

या विद्यार्थ्यांना जर्मन भाषासुद्धा शिकवली जाते. विद्यार्थ्यांना डिजिटल व्यवहारांचं ज्ञान मिळावं यासाठी दीडशे विद्यार्थ्यांची बँकेत खाती उघडण्यात आली आहेत. या बँक खात्यातल्या पैशातून विद्यार्थी शालेय साहित्य खरेदी करतात.

****

राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल विविध उपक्रम राबवून त्यांना अभिवादन करण्यात आलं.

छत्रपती संभाजीनगर इथं वाळूज - बजाजनगरात तीन दिवसीय महास्वच्छता अभियान  राबवण्यात आलं. विविध सामाजिक संघटना तसंच स्वच्छता प्रेमींच्या पुढाकाराने, एक दिवस एक परिसर या प्रमाणे या परिसरात हे अभियान राबवण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगरातल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात गाडगेबाबांना अभिवादनपर कार्यक्रम घेण्यात आला. गाडगेबाबांनी दिलेला दशसूत्री संदेश प्रत्येकाने अंमलात आणण्याची गरज, ज्येष्ठ विचारवंत व्यंकटराव कांबळे यांनी यावेळी व्यक्त केली.

****

टी -२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या संघाचं कर्णधारपद सूर्यकुमार यादव कडे कायम ठेवण्यात आलं असून, अक्षर पटेल याला उपकर्णधार पद देण्यात आलं आहे. राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी काल १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. या स्पर्धेसह त्याआधी होणार्या न्युझीलंड विरुद्धच्या टी – ट्वेंटी मालिकेतून शुभमन गील याला वगळण्यात आलं असून, ईशान किशन आणि रिंकू सिंग यांना संघात पुन्हा स्थान मिळालं आहे.

****

१९ वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान संघात अंतिम लढत होणार आहे. दुबईत सकाळी साडे दहा वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला काल देवीच्या मंचकी निद्रेने प्रारंभ झाला. २८ डिसेंबरच्या पहाटे देवी सिंहासनारूढ होईल, त्याच दिवशी दुपारी बारा वाजता घटस्थापना करण्यात येणार आहे. चार जानेवारीपर्यंत साजऱ्या होणाऱ्या या महोत्सवात देवीच्या विविध अलंकार महापूजा, होम हवन, तसंच जलकुंभ यात्रा होणार आहे.

****

जालना-बीड मार्गावर अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारा एक कंटनेर जालना पोलिसांनी काल ताब्यात घेतला, या कारवाईत पोलिसांनी ४३ लाख रुपयांच्या गुटख्यासह ट्रक, मोबाईल, असा एकूण ७३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त  केला.

****

अजमेर उर्सकरीता रविवार दिनांक २८ डिसेंबर रोजी अजमेर – हैदराबाद रेल्वेची एक विशेष फेरी होणार आहे. ही रेल्वे नांदेड मार्गे धावेल, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड इथल्या संपर्क कार्यालयानं ही माहिती दिली.

****

राज्यात काल सर्वात कमी सहा अंश सेल्सियस तापमान जळगाव इथं नोंदवलं गेलं. त्या खालोखाल अहिल्यानगर इथं सहा पूर्णांक चार, नाशिक – सहा पूर्णांक नऊ, पुण्यात आठ पूर्णांक एक, तर छत्रपती संभाजीनगर इथं १० पूर्णांक आठ दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

 

 

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 21 دسمبر 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 21 December-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...