Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 21 December 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ डिसेंबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या मोजणीला आज सकाळी दहा वाजता सुरुवात झाली आहे. कालच्यासह
गेल्या दोन डीसेंबरला झालेच्या, एकंदर २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी
सुरु आहे. या प्रक्रियेसाठी संबंधीत ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून,
सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद
शहर नगरपरिषदेवर काँग्रेसचे अमेर पटेल नगराध्यक्षपदाच्या निवडणूकित विजयी झाले आहेत.
तसंच, फुलंब्रीच्या
नगराध्यक्षपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजेंद्र ठोंबरे निवडून झाले
आहेत.
तर, बीड जिल्ह्यात अंबाजोगाई नगरपरिषदेत लोकजनविकास
आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकिशोर मुंदडा अडीच हजारांच्या मताधिक्यानं विजयी
झाले. परभणी जिल्ह्यात गंगाखेडच्या नगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उर्मिला केंद्रे, जिंतूर इथं भारतीय जनता पक्षाचे
प्रताप देशमुख नगराध्यक्ष म्हणून तर, सेलू इथं भाजपचेच मिलिंद सावंत नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत.
****
लातूर जिल्ह्यात, औसा नगरपालिका निवडणूकीत राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शेख परवीन विजयी
झाल्या आहेत.
उदगीर नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी
भाजपच्या स्वाती हुडे विजयी झाल्या आहेत. तर, निलंग्याच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपचेच उमेदवार
संजय हलगरकर विजयी झाले आहेत.
रेणापूर नगरपंचायतसाठी भाजपच्या नगराध्यक्ष
पदाच्या उमेदवार शोभा आकनगीरे आघाडीवर आहेत.
****
जालना जिल्ह्यात भोकरदन नगरपालिकेत
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या समरीन मिर्झा विजयी झाल्या आहेत. तसंच, अंबड तालुक्यात भाजपच्या देवयानी कुलकर्णी
विजयी झाल्या आहेत.
****
बीड जिल्ह्यात नगर परिषदेच्या निवडणूक मतमोजणीला आज सकाळी सुरुवात होत असताना
पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. मतमोजणी केंद्रात जाण्यासाठी मोठी गर्दी उसळल्यानं
झालेल्या गोंधळावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली. ही मतमोजणी कृषी
उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात सुरू आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री
अजित पवार यांनी स्वतः जिल्ह्यातील प्रत्येक नगरपरिषदेच्या प्रचारासाठी सभा घेतल्या
होत्या. त्यामुळे या निकालांकडे विशेष लक्ष आहे.
****
अमरावतीच्या चिखलदरा नगरपरिषदेच्या
नगराध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत काँग्रेसचे शेख अब्दुल शेख विजयी झाले. नंदुरबार नगरपरिषदेसाठी
शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रत्ना रघुवंशी तिसऱ्या फेरी अंती मोठ्या
मताधिक्यानं आघाडीवर आहेत. वाशिम इथं भाजपचे अनिल केंदळे, तर जिल्ह्यातील रिसोड इथं भाजपचेच भगवान
क्षीरसागर, मंगरूळपीर इथं राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अशोक
परळीकर, मालेगाव जहागिर इथं कांग्रेसचे गणेश अहिर आघाडीवर आहेत.
धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार
चिंतन पटेल आघाडीवर आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
आसाम राज्याच्या दोन दिवसीय दौऱ्यात आज दुसऱ्या दिवशी, त्यांच्या हस्ते नामरूप इथं बारा हजार कोटी रुपयांच्या अमोनिया-युरिया खत प्रकल्पाचं
उद्घाटन होत आहे. ब्रह्मपुत्र नदीत जहाजातून प्रवास करत पंतप्रधान मोदी स्थानिक शालेय
विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ द्वारे संवादही साधणार आहेत.
****
आजही मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी
थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. संपुर्ण उत्तर भारतात धुक्याचं
सावट असून, सकाळी
आणि रात्री दाट धुक्यामुळे अडचणी वाढत आहेत. दृश्यमानता कमी झाल्याने रस्ते,
रेल्वे आणि हवाई सर्वच वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. राष्ट्रीय
राजधानी दिल्लीत धुक्यासह हवेतील प्रदूषणामुळे समस्यांमध्ये वाढ झाली आहे.
****
नवी दिल्लीमध्ये सैन्य दलाच्या संरक्षण
दलातील अधिकाऱ्यासह
एका मध्यस्थाला लाच घेतल्या प्रकरणी सी.बी.आय.- केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं अटक
केली आहे. लष्कराच्या उत्पादन विभागातील उपनियोजन अधिकारी लेफ्टिनेंट कर्नल दीपक कुमार
शर्मा आणि मध्यस्थी म्हणून कार्यरत विनोद कुमार अशी या आरोपींची नाव असून त्यांना न्यायालयानं
परवा २३ डिसेंबर पर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे. यासह दीपक कुमार शर्माची पत्नी
लष्करातच कार्यरत कर्नल काजल बाली, तसंच दुबईस्थित संरक्षण उत्पादन
निर्माता-निर्यात कंपनीचे प्रतिनिधी आणि अन्य व्यक्तींविरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला
आहे. दीपक कुमार शर्माच्या दिल्लीतील घराच्या झडतीत तीन लाख रुपये लाचेच्या रकमेसह
दोन कोटींहून जास्त रोख रक्कम जप्त करण्यात आली. तर, संबंधीत
प्रकरणी राजस्थानच्या श्रीगंगानगर इथल्या घरातून दहा लाख रुपये रोख रक्कम आणि अन्य
आक्षेपार्ह सामग्री जप्त करण्यात आली.
****
आज दूसरा जागतिक ध्यान दिवस साजरा
केला जात आहे. संयुक्त राष्ट्र महासभेनं मागिल वर्षी याबाबत घोषणा केली होती.
आजची तिथि उत्तरीय गोलार्धात शीतकालीन
संक्रांतिला विचारात घेत निवडण्यात आली असून, जी आत्मनिरीक्षण आणि आंतरिक शांतिचं प्रतीकही
आहे.
****
No comments:
Post a Comment