Monday, 22 December 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.12.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 22 December 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ डिसेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक जागा

·      मराठवाड्यात नगराध्यक्षपदाच्या ५२ जागांपैकी भारतीय जनता पक्ष १७, तर शिवसेनेची ११ जागांवर सरशी

·      निवडणुकीतील विजय हा नागरिकांनी विकासकामांना दिलेली पावती-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन, निवडणूक आयोगावर काँग्रेसची टीका

·      रेल्वेच्या प्रवासभाडे आकारणीत बदल, २६ डिसेंबरपासून सुधारीत दर लागू 

आणि

·      ४५ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी फ. म. शहाजिंदे यांची निवड

****

राज्यातल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीत महायुतीतल्या घटक पक्षांनी सरशी साधली असून, भारतीय जनता पक्षानं सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंही चांगलं यश मिळवलं, मात्र महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना अपेक्षित यश मिळालं नाही. तीन नगराध्यपदांसाठीच्या निवडणूका याआधीच बिनविरोध झाल्या होत्या. नगराध्यक्षपदाच्या एकूण २८५ जागांपैकी भाजपने ११७, शिवसेनेनं ५३, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं ३७ जागांवर विजय मिळवला. महाविकास आघाडीत काँग्रेसनं २८, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं नऊ, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं सात जागांवर विजय मिळवला.

**

मराठवाड्यात नगराध्यक्षपदाच्या ५२ जागांपैकी, भाजपनं १७, शिवसेनेनं ११, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं ११ जागांवर विजय मिळवला. काँग्रेसनं चार, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळाला. स्थानिक शहर विकास आघाडी आणि मराठवाडा जनहित पक्षाला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या.

**

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबाद आणि कन्नड नगरपरिषदेत काँग्रेसचे उमेदवार, फुलंब्री इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, सिल्लोड आणि पैठण मध्ये शिवसेनेचे उमेदवार, गंगापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे, तर वैजापूर नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले.

**

जालना जिल्ह्यात परतूर तसंच अंबड नगराध्यक्ष पदी भाजपचे, तर भोकरदन इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विजयी झाले.

परतूरमध्ये भाजपचे सहा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सहा, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पाच तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसचे प्रत्येकी तीन नगरसेवक निवडून आले.

अंबड नगरपरिषदेत भाजपचे १४, रासपचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चार, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक एक उमेदवार विजयी झाला.

भोकरदन नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला सत्ता राखण्यात यश आलं. या ठिकाणी शरद पवार गटाचे नऊ, भाजपचे आठ, काँग्रेसचा एक तर शिवसेनेचा एक नगरसेवक निवडून आला.

**

बीड जिल्ह्यात सहा नगराध्यक्षांपैकी बीड, माजलगाव, किल्ले धारूर इथं राष्ट्रवादी काँग्रेस, अंबाजोगाई आणि गेवराई इथं भाजप तर माजलगावच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विजयी झाले.

बीड नगरपरिषदेच्या चुरशीच्या लढतीत भाजपचे युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संदीप क्षीरसागर या दोघांना धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार प्रेमलता पारवे विजयी झाल्या.

दरम्यान, बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी मतमोजणी केंद्र परिसरात उसळलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

**

मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यांचा निकाल ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून:

‘‘परभणी जिल्ह्यातल्या सात नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदांपैकी जिंतूर आणि सेलू इथं भाजप, पाथरी इथं शिवसेना, गंगाखेड आणि मानवत इथं राष्ट्रवादी काँग्रेस, तर सोनपेठ आणि पूर्णा इथं शहर विकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले.

**

हिंगोली जिल्ह्यातल्या तीन नगरपरिषदांपैकी हिंगोली आणि कळमनुरी इथं शिवसेनेचे, तर वसमत इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आले.

**

नांदेड जिल्ह्यातल्या १२ नगरपरिषदांपैकी भोकर, मुदखेड आणि कुंडलवाडी इथं भाजपचे उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आले. उमरी आणि देलगूर इथं राष्ट्रवादी काँग्रेस, मुखेड आणि हदगाव इथं शिवसेना, कंधार आणि हिमायतनगर इथं काँग्रेस, तर किनवट इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आले. बिलोली आणि धर्माबाद इथं मराठवाडा जनहित पक्षाचा विजय झाला.

**

लातूर जिल्ह्यात उदगीर, निलंगा, अहमदपूर आणि रेणापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजप, तर औसा नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले.

**

धाराशिव जिल्ह्यातल्या आठ नगरपरिषदांपैकी धाराशिव, तुळजापूर, नळदुर्ग आणि मुरुम नगरपालिकेत भाजपचे, तर भूम, परंडा, उमरगा आणि कळंब नगरपालिकेत शिवसेनेचे उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आले.

धाराशिव नगरपालिकेत भाजपचे २१, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रत्येकी आठ, काँग्रेसचे तीन, तर एमआयएम पक्षाचा एक उमेदवार निवडून आला. तुळजापूर नगरपालिकेत भाजपचे १८, तर महाविकास आघाडीचे पाच, नळदुर्ग नगरपालिकेत भाजपचे १०, भुम नगरपालिकेत स्थानिक जनशक्ती आघाडीचे १४ तर अलमप्रभू नगर विकास आघाडीचे सहा उमेदवार निवडून आले. परंडा नगरपालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नऊ, शिवसेना आणि भाजप प्रत्येकी सहा, तर काँग्रेसला एका जागेवर विजय मिळाला. कळंब नगरपालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नऊ, भाजप सहा, शिवसेना चार, तर काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला. मुरूम नगरपालिकेत भाजपनं १९, काँग्रेसनं नऊ, तर शिवसेनेनं एक जागा जिंकली आहे.’’

****

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीत भाजपला मिळालेला विजय हा लोकांनी विकासकामांना दिलेली पावती असल्याची प्रतिक्रीया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोंदवली आहे. ते म्हणाले...

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

या निवडणुकीत मतदारांनी विकासाला पसंती दिल्यामुळेच शिवसेनेला चांगलं यश मिळालं, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात वार्ताहर परिषदेत केलं. तर, या निकालांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकासात्मक, सर्वधर्मसमभावी भूमिकेवर शिक्कामोर्तब झालं, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

**

या निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाल्याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी जनतेचे आभार मानले. मतदारांचा कौल विकास, सेवा आणि सुशासनला असल्याचं यातून स्पष्ट झाल्याचं त्यांनी नमूद केलं.

**

नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाचा गलथान कारभार अधोरेखित झाला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ही निवडणूक मुक्त आणि न्याय्य पद्धतीनं झालेली नाही, असा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले,

बाईट - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

****

विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका अभियान – ग्रामीण, म्हणजे व्ही बी जी राम जी विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली आहे. मनरेगा योजनेची जागा घेणारा हा कायदा एका आर्थिक वर्षात ग्रामीण भागतल्या प्रत्येक कुटुंबात १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी देतो. गेल्या आठवड्यात संसदेच्या दोन्ही सभागृहांनी हे विधेयक मंजूर केलं होतं. ग्रामीण भागात आत्मनिर्भरता, समृद्धी, सर्वसमावेशक विकास आणि सक्षमीकरण ही या कायद्याची उद्दिष्टं आहेत. हा कायदा ग्रामीण भारताच्या विकासातला मैलाचा दगड ठरेल असं ग्रामविकास मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

****

रेल्वे विभागाने प्रवासभाडे आकारणीत बदल केले असून, ते येत्या २६ डिसेंबरपासून लागू होणार आहेत. यात सर्वसामान्य वर्गाच्या प्रवास भाड्यात २१५ किलोमीटर अंतरापर्यंत काहीही बदल झालेला नाही. त्यापुढच्या सामान्य वर्गाच्या प्रवासाकरता प्रति किलोमीटर एक पैसा तर मेल – एक्सप्रेस गाड्यांसाठी प्रति किलोमीटर दोन पैसे भाडेवाढ झाली आहे. ५०० किलोमीटर अंतराच्या प्रवासाकरता १० रुपये जास्त मोजावे लागतील. उपनगरी गाड्याच्या प्रवासभाड्यात बदल केलेला नाही असं रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

****

बीडमधल्या शांतीवन इथं होणाऱ्या ४५ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी फ. म. शहाजिंदे यांची निवड करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल पार पडलेल्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला.

****

जागतिक ध्यान दिनाचं औचित्य साधून काल लातूर इथं ध्यान साधनेविषयी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला. ध्यान ही आंतरिक शक्तीचा आणि अमर्याद आनंदाचा शोध असून, तणावमुक्त, चिंतामुक्त आणि परिपूर्ण जीवनासाठी ध्यान अत्यंत आवश्यक असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं.

****

राज्यात काल सर्वात कमी सहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान अहिल्यानगर इथं नोंदवलं गेलं. पुणे, परभणी, बीड इथं सरासरी आठ अंश, तर छत्रपती संभाजीनगर इथं दहा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

****

No comments: