Sunday, 28 December 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.12.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 28 December 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

नव वर्ष २०२६ साठी देशवासियांना शुभेच्छा देताना मावळत्या वर्षानं स्वदेशीच्या माध्यमातून भारताला आणखी आत्मविश्वास दिला असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी आज आकाशवाणीवरील मन की बातया कार्यक्रम मालिकेतल्या १२९व्या भागामध्ये देशवासियांशी संवाद साधला, त्यावेळी बोलत होते. ते म्हणाले -

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

यावेळी त्यांनी सरत्या वर्षातील अनेक घटनांचा आढावा घेत स्मरण केलं. ऑपरेशन सिंदूरहे प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचं प्रतीक असून भारत आपल्या सुरक्षेशी कुठलीही तडजोड करत नसल्याचं जगानं पाहिल्याचं त्यांनी नमूद केलं. वंदे मातरम्ला १५० वर्षे पूर्ण झाली तेव्हाही देशात उत्साह पहायला मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. यावर्षी आपल्या पुरुष क्रिकेट संघानं आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा तर महिला क्रिकेट संघानें प्रथमच विश्वचषकावर आपलं नाव कोरल्याचा गौरवपुर्ण उल्लेख करत भारताच्या मुलींनी दृष्टिहीन महिला क्रिकेटची पहिली टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकून इतिहास रचल्याचा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधानांनी केला. विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रातही भारतानं उत्तुंग झेप घेतली असून शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय ठरल्याचं त्यांनी सांगितलं. २०२५ या वर्षी श्रद्धा, संस्कृती आणि भारताचा अद्वितीय वारसा हे सगळं एकत्र पहायला मिळाल्याचं सांगत वर्षाच्या सुरुवातीला प्रयागराज महाकुंभच्या आयोजनानं संपूर्ण जगाला अचंबित केलं असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

पुढल्या महिन्याच्या १२ तारखेला स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी ‘राष्ट्रीय युवा दिवस’ साजरा केला जाणार आहे. याच दिवशी युवा नेत्यांचा संवाद’ होणार आहे आणि ते यात सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मागील ७-८ वर्षांत स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये १३ लाखांहून अधिक विद्यार्थी आणि ६ हजारांहून अधिक संस्था सहभागी झाल्याचं सांगत युवकांनी शेकडो समस्यांवर अचूक उपाय सूचवल्याची प्रशंसा त्यांनी केली. आयसीएमआर म्हणजेच भारतीय वैद्यकीय संषोधन परिषदेनं नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात न्यूमोनिया आणि मूत्रमार्ग संसर्गासारख्या अनेक आजारांवर प्रतीजैविकं कुचकामी ठरत असल्याचं सागितलं आहे. वाढत्या आजारांमुळे लोकांमध्ये स्वतःच्या मर्जीनं औषधं घेण्याचं प्रमाण वाढलं असून ते टाळण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. प्रतीजैविकांच्या बाबतीत तर हे विशेष महत्वाचं असून औषधं फक्त डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच घेण्याची सूचना मोदी यांनी यावेळी केली.

पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजने’ अंतर्गत प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला सौर पॅनेल बसवण्यासाठी सुमारे ७५ ते ८० हजार रुपये सरकार देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मणिपूरमधील ४० वर्षांपेक्षा कमी वय असलेला युवक मोइरांगथेम सेठ यानं मणिपूरच्या दुर्गम भागातील वीजेच्या समस्येवर सौरऊर्जा हा उपाय शोधला असून त्यामुळे परिसरातील शेकडो घरांमध्ये सौरऊर्जा पोहचल्याचं ते म्हणाले.

जगाच्या कानाकोपऱ्यात भारतीय आपली भूमिका बजावत असून दुबई इथं सुरु झालेल्या कन्नड शाळेचा विशेष उल्लेख त्यांनी केला. गेल्या महिन्यात फिजीच्या राकी-राकी भागातही एका शाळेत पहिल्यांदाच तमिळ दिवस साजरा करण्यात आल्याचं ते म्हणाले. येणाऱ्या वर्षांत विकसित भारतचा संकल्प निश्चितच पूर्ण होईल. हा विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत चालला आहे. नवीन वर्ष या संकल्पाच्या पूर्ततेच्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा ठरो असं सांगत सर्व भारतीयांचं जीवन आनंदी होवो या शुभेच्छा पंतप्रधान मोदी यांनी दिल्या.

****

राज्यातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपूर्ण पीठ असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सुरुवात आज दुपारी बारा वाजता घटस्थापनेनं झाली. पहाटे देवीची मंचकी निद्रा संपून देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. या शाकंभरी नवरात्र महोत्सवात ३१ डिसेंबर रोजी सकाळी जलकुंभ यात्रा, एक जानेवारी रोजी शतचंडी होम हवन, ३ जानेवारी रोजी पौर्णिमा, पूर्णाहूती तर ४ जानेवारीला अन्नदान महाप्रसादानं या शाकंभरी नवरात्र महोत्सवाचा समारोप होणार आहे. या नवरात्र महोत्सवासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणातील लाखो भाविक तुळजापुरात दाखल होत आहेत.

****

राज्यात काल सर्वात कमी सात पूर्णांक सात पूर्णांक तीन अंस सेल्सिअस तापमान अहिल्यानगर इथं नोंदवलं गेलं.

****

No comments: