Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 27 December 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२७ डिसेंबर
२०२५ सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू आजपासून
गोवा, कर्नाटक आणि झारखंडच्या दौऱ्यावर
जाणार आहेत. आज संध्याकाळी त्या गोव्यासाठी रवाना होतील. उद्या कर्नाटकातील कारवार
इथं सागरी यात्रा करतील. सोमवारी राष्ट्रपती जमशेदपूरमध्ये ओल चिकी लिपीच्या शताब्दी
समारंभात सहभागी होतील. या लिपीचं निर्माण १९२५ मध्ये रघुनाथ मुर्मू यांनी संथाली भाषेसाठी
केलं होतं. ही लिपी संथाल आदिवासी समुदायासाठी संस्कृती, साहीत्य आणि आदिवासी वारशाच्या संदर्भात
खूप महत्त्वपूर्ण आहे. त्याचदिवशी राष्ट्रपती एन.आय.टी. जमशेदपूरच्या १५ व्या दीक्षांत
समारोहाला संबोधित करतील. मंगळवारी राष्ट्रपती झारखंडच्या गुमला इथं कार्तिक यात्रेला
संबोधित करतील.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु गोविंद सिंहजींच्या पवित्र प्रकाश पर्वानिमित्त सर्व
देशवासीयांना, शुभेच्छा दिल्या आहेत.
श्री गुरु गोविंद सिंहजी हे अदम्य धैर्य आणि विलक्षण बुद्धिमत्तेचे प्रतीक होते. त्यांनी
लोकांना नीतिमान जीवन जगण्यासाठी प्रेरित केले आणि न्याय तसेच आत्मसन्मानाच्या रक्षणासाठी
आपल्या अनुयायांमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण केली असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात
म्हटले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री
गुरु गोविंद सिंहजी यांच्या पवित्र प्रकाश उत्सवानिमित्त, त्यांना आदरांजली वाहिली. श्री गुरु
गोविंद सिंहजी हे धैर्य, करुणा आणि बलिदानाचे
मूर्त स्वरूप आहेत. त्यांचे जीवन आणि शिकवण आपल्याला सत्य, न्याय, धार्मिकतेसाठी आणि मानवी प्रतिष्ठेचे
रक्षण करण्यासाठी प्रेरित करते, असं पंतप्रधानांनी सामाजिक
माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
बांगलादेशात अल्पसंख्याकांविरुद्ध
सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल भारतानं गंभीर चिंता व्यक्त केली आहे. बांगलादेशातील
मैमनसिंग इथं नुकत्याच झालेल्या एका तरुणाच्या क्रूर हत्येचा भारतानं तीव्र निषेध केला
आहे. बांगलादेशातील अंतरिम सरकारच्या काळात
अल्पसंख्याकांविरुद्ध हत्या आणि हिंसेच्या घटनांत वाढ झाल्याचं नाकारता येणार नाही
असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांशी
बोलताना म्हटलं. बांगलादेशात १२ फेब्रुवारी रोजी संसदीय निवडणुका होणार असून भारत बांगलादेशात
मुक्त, निष्पक्ष, समावेशक आणि सहभागी निवडणुकांना पाठिंबा
देत असल्याचंही जयस्वाल यांनी सांगितलं.
****
दहशतवाद हा मानवतेचा सर्वात मोठा
शत्रु असून प्रत्येकानं मिळून त्याविरोधात लढणं गरजेचं आहे, असं आवाहन केंद्रिय गृहमंत्री अमित
शहा यांनी केलं. देशातला दहशतवाद निपटून काढण्यासाठी केंद्र सरकार कठोर पावलं उचलत
आहे, असंही त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएतर्फे आयोजित दहशतवादविरोधी परिषदेचं उद्घघाटन काल शहा यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. दहशतवादविरोधी कारवाईत योगदान देणाऱ्या नऊ
राष्ट्रीय तपास संस्था-एनआयएच्या कर्मचाऱ्यांचा शहा यांच्या हस्ते सेवा पदक आणि वीरपदक
देऊन गौरव करण्यात आला.
****
मुलं ही देशाचे भविष्य आहेत आणि विकसित
भारताचे शिल्पकार आहेत असं महिला सक्षमीकरण आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी
म्हटले आहे. नवी दिल्लीत काल पंतप्रधानांच्या राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांच्या
मेजवानीत माध्यमांशी बोलताना त्यांनी मुलांच्या योगदानाचं कौतुक केलं. याप्रसंगी, केंद्रीय मंत्र्यांनी १७ पुरस्कार विजेत्यांचा सन्मान केला आणि मुलांशी संवाद
साधला. महिला सक्षमीकरण आणि बालविकास राज्यमंत्री
सावित्री ठाकूर आणि इतर मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते.
****
केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश
नड्डा यांनी मिशन-आधारित आरोग्यसेवा सुधारणा आणि क्षयरोगमुक्त भारताचं ध्येय साध्य
करण्यासाठी जलद प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे. काल नवी दिल्ली इथं उच्चस्तरीय आढावा
बैठकीत ते बोलत होते. नड्डा यांनी या आजारासंबंधीत औषधं खरेदीमध्ये रसद, पारदर्शकता आणि जबाबदारी सुधारण्यासाठी
केंद्र सरकार आयआयएम अहमदाबादसोबत काम करत असल्याची माहिती दिली. या बैठकीत सार्वजनिक
आरोग्य प्रणाली मजबूत करणं, रुग्णांचे समाधान सुधारणं, नियामक देखरेख वाढवणं आणि प्रमुख
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांना गती देणं, यावर भर देण्यात आला.
****
मराठवाड्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती अंतिम टप्प्यात आली असून, लवकरच सर्व निर्णय होतील, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
यांनी सांगितलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं माध्यम प्रतिनिधिंशी बोलत होते.
मराठवाड्यात जालना, परभणी, लातूर आणि नांदेड महापालिकेसाठी देखील बैठका घेऊन अडचणी दूर
करण्यात येणार असल्याचंही बावनकुळे म्हणाले.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या
पार्श्वभूमीवर महायुतीत समन्वय साधण्यासाठी शिवसेना तसंच भाजप नेत्याची समिती स्थापन
करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार स्थापन या समितीत
भाजप तसंच शिवसेनेच्या प्रत्येकी पाच नेत्यांचा समावेश आहे.
****
महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया
पार पाडताना सोपविलेली जबाबदारी सर्वांनी व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी समन्वयानं आणि
गांभीर्यानं काम करावं, असे निर्देश लातूरच्या
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी काल दिले.
****
No comments:
Post a Comment