Saturday, 27 December 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 27.12.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 27 December 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ डिसेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्यभरात महानहगरपालिका निवडणुकींची रणधुमाळी; मराठवाड्यात भाजप – शिवसेना युती अंतिम टप्प्यात – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

·      विविध बँक आणि इतर खात्यांमध्ये पडून असलेले पैसे खातेदारांना परत करण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडून विशेष मोहिम; दोन हजार कोटी रुपये खातेधारकांना परत

·      प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान; छत्रपती संभाजीनगर इथल्या अर्णव महर्षीचा गौरव

आणि

·      महिला क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी – ट्वेंटी सामन्यात भारताचा विजय; मालिकेतही तीन – शून्य अशी विजयी आघाडी

****

राज्यभरात महानहगरपालिका निवडणुकींची रणधुमाळी सुरु असून, युती, आघाड्यांमध्ये चर्चा सुरु आहे.

मराठवाड्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती अंतिम टप्प्यात आली असून, लवकरच सर्व निर्णय होतील, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं माध्यम प्रतिनिधिंशी बोलत होते. मराठवाड्यात जालना, परभणी, लातूर आणि नांदेड महापालिकेसाठी देखील बैठका घेऊन अडचणी दूर करण्यात येणार असल्याचंही बावनकुळे म्हणाले.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत समन्वय साधण्यासाठी शिवसेना तसंच भाजप नेत्याची समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार स्थापन या समितीत भाजप तसंच शिवसेनेच्या प्रत्येकी पाच नेत्यांचा समावेश आहे.

**

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने क्रांती चौक - पैठण गेट ते गुलमंडी अशी मशाल फेरी काढण्यात आली. या फेरीत युवा सेना प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. ठाकरे यांनी यावेळी विकासाच्या विविध प्रश्नांवर सरकार टीका केली. माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षेनेते अंबादास दानवे यावेळी उपस्थित होते.

**

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी एमआयएम पक्षाने आणखी चार उमेदवारांची दुसरी यादी काल जाहीर केली. पक्षाने मुंबई महानगर महापालिकेसाठी सात, अहिल्यानगर महापालिकेसाठी चार, तर लातूर आणि परभणीसाठी प्रत्येकी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा केली.

**

जालना शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी काल एकूण ५९९ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली. तर १६ प्रभागांमधून एकूण १३ अर्ज प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण १४ अर्ज दाखल झाले आहेत.

**

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नेते प्रकाश महाजन यांनी शिवसेनेत प्रवेश केला. काल ठाणे इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. आपण पद किंवा उमेदवारीसाठी कोणतीही मागणी न करता शिवसेनेत प्रवेश केला असल्याचं महाजन यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. ते शिवसेनेचे प्रवक्ते असतील, असं शिंदे यांनी सांगितलं.

**

पुण्याचे माजी महापौर आणि नुकताच राजीनामा दिलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाच्या पुण्यातल्या अनेक पदाधिकाऱ्यांसह काल काँग्रेसमधे प्रवेश केला. मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष विजयी झाले, त्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. आगामी महापालिका निवडणुकीसाठी ‘काँग्रेस लढणार, महाराष्ट्र जिंकणार’, या टॅगलाईनचं आणि टिझरचं प्रकाशनही करण्यात आलं.

**

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक, काँग्रेस, “विवाद नको, विकास हवा” या धोरणावर लढवणार आहे. लवकरच मुंबई काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल, अशी माहिती खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली. मुंबईमध्ये रस्ते, वाहतूक कोंडी, प्रदुषण, खड्डे या समस्यांवर काँग्रेसनं आवाज उठवला आहे. त्यामुळे इतर कोणताही विवाद निर्माण न करता, यंदाची महापालिका निवडणूक मुंबईकरांच्या प्रश्नांवर लढवणार असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं.

****

राज्य निवडणूक आयोगानं २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुधारित मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. तीन जानेवारीपर्यंत महानगरपालिकानिहाय संपूर्ण मतदारयादी तयार होताच प्रसिद्ध करण्याचे निर्देश आयोगानं दिले आहेत. दुबार मतदारांची छाननी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्यांचे कंट्रोल चार्ट आज अपलोड करण्यात येणार आहेत.

****

विविध बँक आणि इतर खात्यांमध्ये पडून असलेले पैसे खातेदारांना परत करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून देशभरात विशेष मोहिम सुरू आहे. यामुळे आतापर्यंत दोन हजार कोटी रुपये खातेधारकांना परत मिळाले आहेत, अशी माहिती अर्थ मंत्रालयानं काल दिली. विविध बँक खाती, वीमा खाती, म्युच्युअल फंड, लाभांश, समभाग आणि सेवानिवृत्तीचे लाभ यासाठी ही रक्कम नागरिकांनी वाचवून ठेवली होती. भारतीय बँकांमध्ये अशा प्रकारचे ७८ हजार कोटी रुपये पडून आहेत, ज्यावर कोणीही दावा केलेला नाही, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

वीर बाल दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी बोलतांना राष्ट्रपतींनी, देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर बालकांप्रति समाज सदैव कृतज्ञ राहील, असं नमूद केलं.

यावर्षी १८ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या २० बालकांना हे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यामध्ये छत्रपती संभाजीनगर इथल्या अर्णव महर्षी या मुलाचा समावेश आहे. अर्णवने वैयक्तिक अनुभवातून अर्धांगवायू झालेल्या रुग्णांसाठी विकसित केलेल्या उपकरणासाठी त्याला गौरवण्यात आलं. अर्णवने आपला अनुभव या शब्दांत व्यक्त केला…

बाईट – अर्णव महर्षी

क्रिकेटपटू वैभव सुर्यवशींचाही राष्ट्रपतींनी यावेळी गौरव केला.

**

शीख धर्माचे दहावे गुरु गोविंदसिंह यांचे सुपुत्र साहेबजादे बाबा जोरावर सिंग आणि साहेबजादे बाबा फतेह सिंग यांच्या हौतात्म्याचं स्मरण म्हणून वीर बाल दिवस पाळला जातो. यानिमित्त दिल्ली इथं मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना त्यांनी, संपूर्ण देश साहेबजादा बाबा जोरावर सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या अतुलनीय शौर्य आणि त्यागाचं स्मरण करत असल्याचं नमूद केलं. मुघलांच्या अत्याचारासमोर अढळ निश्चयाने उभे ठाकलेल्या साहेबजाद्यांनी आपल्या वयापेक्षा कितीतरी अधिक पटीने शौर्य दाखवल्याचं पंतप्रधान म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहेबजादा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांना आदरांजली वाहिली. मुंबईत शीव कोळीवाडा इथल्या गुरुद्वारात आयोजित कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला.

****

उत्तम स्वच्छता आणि अन्नसुरक्षा मानकांचं पालन करणाऱ्या हॉटेल आस्थापनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य आणि जिल्हास्तरावर पुरस्कार देण्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली आहे. ‘स्वागत नववर्षाचं, संकल्प हॉटेल स्वच्छतेचा’ हा विशेष उपक्रम १५ जानेवारी पर्यंत राबवण्यात येत आहे.

दरम्यान, जेजुरी नगरपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर विजयोत्सवाच्या वेळी भंडाऱ्याचा भडाका उडाल्याने दुर्घटना घडली होती. या प्रकरणी औषध निरीक्षक आणि पोलिसांनी घटनास्थळाहून दोन हजार २०० किलो भंडाऱ्याचा साठा जप्त केला.

****

महिला क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या तिसर्या टी – ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताने आठ खेळाडू राखून विजय मिळवत, पाच सामन्यांच्या मालिकेतही तीन – शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे. काल तिरुवअनंतपुरम इथं झालेल्या या सामन्यात श्रीलंकेनं दिलेलं ११२ धावांचं लक्ष्य भारतीय महिलांनी १३ षटकात पूर्ण केलं.

****

प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी राष्ट्रीय छात्र सेना – एन सी सी चा महाराष्ट्राचा संघ आज पहाटे पुण्याहून नवी दिल्लीला रवाना झाला. सुमारे सव्वाशे कॅडेट्सच्या या संघात छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी रेवा दीक्षित आणि एमजीएम विद्यापीठाचा विद्यार्थी ओम यादव यांच्यासह एनसीसीच्या औरंगाबाद गटातील नांदेडची रंजना यादव, लातूरचा अर्जुन पाचंगे, आणि अहिल्यानगरच्या वैष्णवी चव्हाण यांच्या सह जळगाव, धुळे, तसंच मनमाड इथल्या कॅडेट्सचा समावेश आहे.

****

बीड जिल्ह्यात केज तालुक्यातल्या आनंदगाव इथल्या येडेश्वरी साखर कारखान्यानं चालू गळीत हंगामात अवघ्या ५४ दिवसांत तब्बल चार लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा महत्त्वाचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. कारखान्याचा बारावा गळीत हंगाम सध्या पूर्ण क्षमतेने सुरू असून, नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे गाळपाचं उद्दिष्ट वेगाने साध्य होत आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली.

****

लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातल्या निटूर परिसरात काल दुपारी भूगर्भातून गूढ आवाज होऊन भूकंपसदृश्य धक्का जाणवल्याची माहिती स्थानिक प्रशासनाला प्राप्त झाली होती. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने तात्काळ खबरदारीचा उपाय म्हणून ही माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी यांच्याकडे तपासणीसाठी पाठवली, मात्र तपासणीनंतर निटूर परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नसल्याचं, प्रशानाने स्पष्ट केलं आहे.

****

राज्यात काल सर्वात कमी नऊ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमान गोंदिया इथं नोंदवलं गेलं. मालेगाव आणि नाशिक इथं सरासरी नऊ पूर्णांक सहा, छत्रपती संभाजीनगर १० पूर्णांक सहा, तर परभणी इथं ११ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 27 دسمبر 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 27 December-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خب...