Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 29
August 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ ऑगस्ट २०२५ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रीय क्रीडा दिन आज साजरा होत आहे. महान हॉकीपटू
मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. शांतीपूर्ण आणि सर्वसमावेशक
समाजाला प्रोत्साहन देण्यासाठी खेळ, ही यंदाची या दिवसाची संकल्पना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या दिवशी भारताला आपला पहिला मॉन्डोट्रॅक
मिळाला आहे. अशा प्रकारचा ट्रॅक बनवणारा भारत हा जगातला २५वा देश बनला असल्याचं, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविय यांनी सांगितलं.
मॉन्डोट्रॅक हा फील्ड ॲथलेटिक्ससाठी वापरला जाणारा, मॉन्डो नावाच्या कंपनीने तयार केलेला एक विशेष, सिंथेटिक ट्रॅक आहे. हा ट्रॅक भारतीय ॲथलीट्सना उच्च दर्जाच्या
सुविधा प्रदान करेल, असं मांडविय म्हणाले.
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागातर्फे
आज पुण्यात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतल्या
पदक विजेत्यांना गौरवण्यात येणार आहे. म्हाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात हा
समारंभ होणार आहे.
क्रीडा दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं केंद्रीय युवक
कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या
ॲथलीट्सचा सत्कार केला जाणार आहे. राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरण-साईच्या परिसरात हा कार्यक्रम
होणार आहे.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे
पाटील मुंबईत आझाद मैदानात दाखल झाले असून, त्यांच्या उपोषणाला सुरुवात झाली आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय
मुंबई सोडणार नाही, असा निर्धार त्यांनी
यावेळी व्यक्त केला. लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाले असून, या आंदोलनामुळे मुंबईमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात या आंदोलनाच्या निमित्ताने कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला
आहे. शहरातले अनेक मार्ग बंद असून, वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
****
मराठवाड्यातल्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असून, पुरस्थिती निर्माण झाली आहे. सर्वत्र पाणीसाठ्यात मोठी
वाढ झाली असून, धरणांमधुनही विसर्ग सुरु आहे.
नांदेड जिल्ह्यात ६९ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.
गेल्या २४ तासात सर्वाधिक २८४ मिलीमीटर पाऊस कंधार मंडळात पडला आहे. पूर्ण जिल्ह्यात
१३२ मिलीमीटर पाऊस झाला असून, आतापर्यंत सरासरीच्या ८८ पूर्णांक ३२ टक्के इतक्या पावसाची नोंद
झाली आहे. नांदेड इथल्या विष्णूपुरी प्रकल्पाचे ११ दरवाजे उघडण्यात आले असून, एक लाख २९ हजार ७४३ घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदावरी पात्रात
विसर्ग सुरू आहे.
**
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत, औंढा, कळमनुरी तालुक्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे
जिल्ह्यातल्या सर्व शाळांना आज सुटी जाहिर करण्यात आल्याची माहिती, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी दिली. कळमनुरी तालुक्यातल्या
जवळा पांचाळ परिसरात ढगफुटी सदस्य पाऊस झाला असून, अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरलं आहे.
धाराशिव शहर आणि परिसरात आज सकाळपासून पावसाची संततधार
सुरू आहे.
**
बीड जिल्ह्यातल्या १६ महसुली मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद
झाली. जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे नदी, नाले, ओढे भरून वाहत आहेत, तर अनेक ठिकाणी शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
**
परभणी जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत
झालं आहे. गंगाखेड तालुक्यातला मासोळी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत असल्याने कोणत्याही
क्षणी कालव्यातून पाणी सोडण्यात येईल, त्यामुळे परिसरातल्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचं
आवाहन उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी केलं. तसंच झिरोफाटा - पूर्णा - नांदेड
मार्गावर माटेगाव इथल्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं हा मार्ग बंद करण्यात आला आहे.
पालम तालुक्यात शेती मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेली असून, डापकर यांनी या भागाची केली.
**
लातूर जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांत सरासरी
९१ पूर्णांक आठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये चाकूर तालुक्यात सर्वाधिक १५२
पूर्णांक चार मिलीमीटर, तर औसा तालुक्यात सर्वात कमी ३२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
****
जालना जिल्ह्यात राजुर-टेंभुर्णी रोडवरील गाडेगव्हाण फाटा
इथं आज पहाटे एक भरधाव कार रस्त्यालगतच्या विहिरीत पडल्याची घटना घडली. पोलीस प्रशासनाचे
स्थानिकांकडून मदत कार्य सुरू असून, आतापर्यंत एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. या कारमध्ये दोन
महिला आणि दोन पुरुष होते. अपघातग्रस्त कारच्या धडकेत रस्त्यावर पायी जाणारे देळेगवान
इथले नागरीक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जालना इथल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
पैगंबर जयंतीसाठी पाच सप्टेंबर रोजी जाहीर केलेली शासकीय
सुटी आठ सप्टेंबर रोजी द्यावी, अशी मागणी काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य, माजी मंत्री नसीम खान यांनी केली आहे. पाच तारखेची महम्मद
पैगंबर जयंतीची मिरवणूक आठ सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय मुस्लीम समाजानं घेतला आहे, याची नोंद घेऊन सुटीचा दिवस बदलावा, असं पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं
आहे.
****
No comments:
Post a Comment