Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 30 August 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० ऑगस्ट २०२५ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान दौऱ्यानंतर
काही वेळापुर्वीच चीनमधील तियानजिनला रवाना झाले आहेत. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या
निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेला उपस्थित राहतील.
दरम्यान, येत्या
सोमवारी पंतप्रधान मोदी हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा
करतील, असं परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाकोव्ह यांनी पत्रकारांशी
बोलताना सांगितलं.
****
जम्मू आणि काश्मीरमध्ये आज ढगफुटी
आणि मुसळधार पावसामुळं दोन ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला, तर दोघेजण बेपत्ता आहेत. रियासी जिल्ह्यातल्या
एका दुर्गम गावात आज पहाटे मुसळधार पावसामुळं भूस्खलन झालं. एकाच कुटुंबातील सात जणांचा
मृत्यू झाला तर, रामबन जिल्ह्यातील राजगड तालुक्यात द्रुपद गावात
ढगफुटी झाल्यानं तिघांचा मृत्यू झाला आहे. पोलिस, राज्य आपत्ती
प्रसिसाद पथक आणि स्थानिक प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांसह बचाव पथकं शोधकार्य करत आहेत. जिल्हा प्रशासनाने डोंगराळ आणि
भूस्खलनाच्या शक्यता असलेल्या भागातल्या रहिवाशांना सतर्क राहण्याचे आणि मुसळधार पावसात
असुरक्षित इमारतींमध्ये राहण्याचे टाळावं असं आवाहन केलं आहे.
****
राज्य शासनाच्या आदेशाला न जुमानता
परवान्याशिवाय अनाधिकृत बाईक टॅक्सी सेवा सुरू असलेल्या रॅपिडो, ओला, उबर या सारख्या
कंपन्यांवर मोटार परिवहन विभागामार्फत सातत्यानं कारवाई सुरू राहील, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.
राज्य शासनानं ई-बाईक टॅक्सी धोरण
निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्यानुसार संबंधित संस्थांनी परवाने काढून
आपली ई -बाईक टॅक्सी सेवा सुरू करावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
मुंबई महानगर परिसरात बाईक टॅक्सी
ॲग्रिगेटर-संकलक सेवा परवाना प्राप्त न करता सुरू ठेवण्यात आल्याच्या अनेक तक्रारी
नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत. शासनानं अशा सेवांना परवाना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचे
आदेश दिले असून, संबंधित
कंपन्यांनी त्यासंदर्भात प्रतिज्ञापत्र देखील सादर केले होते, तरीही या नियमांचे उल्लंघन करून सेवा सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या
पार्श्वभुमीवर मंत्री सरनाईक यांनी हा इशारा दिला आहे.
****
बीड जिल्ह्यात धुळे-सोलापूर राष्ट्रीय
महामार्गावर पेंडगाव फाटा इथं आज सकाळी पायी जाणाऱ्या भाविकांना भरधाव कंटेनंरनं धडक
दिली. या अपघातातील मृतांची संख्या आता सहावर पोहचली आहे.
या घटनेबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री
तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना अत्यंत
वेदनादायी असून पायी देवदर्शनासाठी निघालेल्या निष्पाप जीवांचा मृत्यू झाल्यानं मन
हेलावून गेलं अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसंच अपघातातील मृतांच्या कुटुंबियांप्रती
संवेदना व्यक्त केल्या.
****
दरम्यान, भाविकांच्या अपघाती मृत्यूनंतर अजित पवार
यांनी बीडचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून या
घटनेची सविस्तर माहिती घेतली. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे
आदेश त्यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत. तसंच मृतांच्या कुटुंबियांना शासन स्तरावरून
तातडीनं सर्वोतोपरी मदत उपलब्ध करून दिली जाईल असं म्हटलं आहे. भविष्यात अशा दुर्घटना
टाळण्यासाठी वाहतूक सुरक्षेबाबत अधिक कडक आणि प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देशही
संबंधित विभागांना दिले असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
****
बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यातल्या
आवरगावाजवळील वाण नदीवरील पुलावरुन एक व्यक्ती वाहून गेला आहे. अनिल बाबुराव लोखंडे
असे वाहुन गेलेल्या व्यक्तीचं नाव असून ही घटना आज सकाळी घडली. दरम्यान, छत्रपती संभाजी नगर इथले अग्निशामन दलाच्या
वतीनं त्यांचा शोध घेत आहे.
****
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात
जोराचे वारे आणि वीजांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कोकण आणि
मध्य महाराष्ट्राच्या घाट माध्यांवर देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे.
****
माजलगाव धरणातल्या पाणी पातळीत वाढ
होत असून ही पातळी नियंत्रित करण्यासाठी आज सकाळपासून विसर्ग सुरु आहे. या विसर्गात
वाढ करण्यासाठी आणखी दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. सद्यस्थितीत एकूण पाच दरवाजे उघडण्यात
आले असून याद्वारे ९ हजार ८८६ क्युसेसनं विसर्गात वाढ होत आहे. या पार्श्वभुमीवर सिंधफणा
आणि गोदावरी नदी किनाऱ्यालगत राहणाऱ्या नागरीकांनी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनानं
केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल
सावे हे नांदेड शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण परिसरातील पूरग्रस्त भागांना भेटी देत
आहेत. अतिवृष्टीमुळं नांदेड शहरातील पावसाच्या तडाख्यात सापडलेल्या श्रावस्तीनगर, विष्णुनगर, दत्तनगर,
वसंतराव नाईक पुतळा परिसर, नमस्कार चौक,
नाथनगर अशा काही भागांना भेटी देऊन सावे यांनी पाहणी केली आणि नागरिकांशी
संवाद साधला. यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, आमदार
बालाजी कल्याणकर, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आदींची
उपस्थिती होती.
****
अकोला जिल्ह्यात काल आणि परवा जोरदार
पाऊस झाला असून चार महसूल मंडळाच्या परिसरात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
****
No comments:
Post a Comment