Saturday, 30 August 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.08.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 30 August 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० ऑगस्ट २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेली विविध प्रकारची आयात शुल्कं फेडरल न्यायालयाकडून रद्दबातल

·      शांघाय सहकार्य संघटनेच्या २५ व्या शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये दाखल

·      कुणबी मराठा जात प्रमाणपत्रासंदर्भातील वंशावळ समितीला ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ

·      ज्येष्ठा कनिष्ठा गौरी आगमनाच्या पार्श्वभूमीवर विविध साहित्याने बाजारपेठा सजल्या

आणि

·      बीड जिल्ह्यात भरधाव कंटेनरच्या धडकेत सहा पादचारी भाविकांचा मृत्यू

****

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेली विविध प्रकारची आयात शुल्कं बेकायदेशीर असल्याचं सांगत फेडरल न्यायालयाने रद्दबातल ठरवली आहेत. आंतरराष्ट्रीय आपत्कालीन अधिकार कायदा या करांना मान्यता देत नसल्याचं .न्यायालयानं नमूद केलं. फेडरल न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी ट्रम्प प्रशासनाला १४ ऑक्टोबरपर्यंत वेळ दिलेला असून तोपर्यंत हे शुल्क लागू असेल, असं व्हाईट हाऊसचे प्रवक्ते कुश देसाई यांनी सांगितलं

****

१५ व्या भारत - जपान वार्षिक शिखर परिषदेदरम्यान सुरू केलेल्या भागीदारी उपक्रमामुळे दोन्ही देशातल्या व्यापार, तंत्रज्ञान, पर्यटन, कौशल्य, सुरक्षा आणि सांस्कृतिक भागीदारीला चालना मिळेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज टोकयोमध्ये बोलत होते. मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्यासह आज बुलेट ट्रेननं प्रवास केला. सेंदई इथल्या इलेक्ट्रॉन कारखान्यालाही त्यांनी भेट दिली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी चीनमध्ये दाखल झाले. भारतीय वंशाच्या नागरिकांनी त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. शांघाय सहकार्य संघटनेची २५ वी शिखर परिषद उद्यापासून चीनमधे तिएनजीन इथं सुरू होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत संघटनेच्या मागच्या २५ वर्षांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाईल तसंच पुढल्या दहा वर्षांसाठी धोरण आखलं जाणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मन की बात या कार्यक्रम मालिकेतून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. सकाळी अकरा वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाणार आहे.

****

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेत चांगल्या वाढीची नोंद झाली आहे.

देशाची अर्थव्यवस्था केवळ जगात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था नसून जीडीपीत झालेली वाढ उल्लेखनीय असल्याचं केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे. तर, सुधारणा आणि लवचिकतेच्या बळावर जागतिक स्तरावर भारताच्या अर्थव्यवस्थेनं वेग घेतल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. देशभरातल्या अर्थतज्ज्ञांनीही याबाबत समाधान व्यक्त केलं आहे. आर्थिक विश्लेषक उदय तारदाळकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले..

बाईट - उदय तारदाळकर

****

तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीला शासनानं ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं जारी केला, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली. सदर समितीस २५ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयातील सर्व तरतूदी लागू राहतील, असं शासन निर्णयात नमूद करण्यात आलं असल्याचंही शिरसाट यांनी सांगितलं.

****

राज्यात परवान्याशिवाय अनधिकृत बाईक टॅक्सी सेवा सुरू असलेल्या रॅपिडो, ओला, उबर या सारख्या कंपन्यांवर मोटार परिवहन विभागामार्फत सातत्यानं कारवाई सुरू राहील, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. राज्य शासनानं ई-बाईक टॅक्सी धोरण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्यानुसार संबंधित संस्थांनी परवाने काढून आपली ई -बाईक टॅक्सी सेवा सुरू करावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. शासनानं परवाना मिळेपर्यंत अशा सेवा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यासंदर्भात संबंधित कंपन्यांनी प्रतिज्ञापत्र देखील सादर केले होते, तरीही या नियमांचं उल्लंघन करून सेवा सुरू असल्याचं निदर्शनास आलं आहे.

****

मराठा नेते मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मराठा आरक्षणासंदर्भात काम करणाऱ्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यासह दोन वरिष्ठ अधिकारी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा करतील, अशी माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज वार्ताहरांना दिली. हा प्रश्न सुटावा, हीच सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी नमूद केलं. आंदोलनासाठी मुंबईत आलेल्या मराठा बांधवांच्या सोयीसाठी पाणी, दिवे, स्वच्छतेची सोय करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, काल मुसळधार पाऊस झाल्यामुळे आझाद मैदानात चिखल आणि पाणी साचलं, त्यामुळे आंदोलकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे काहींनी मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलं. नवी मुंबईच्या सिडको प्रदर्शन केंद्रात उतरलेल्या कार्यकर्त्यांनी वीज आणि पाण्याची सोय नसल्याबद्दल आज रास्ता रोको आंदोलन केलं.

****

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज मुंबईत 'लालबागच्या राजा'चं सहकुटुंब दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माहिती-तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यापूर्वी अमित शहा यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी स्थापन गणेशाचं दर्शन घेतलं.

****

सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यात डॉल्बी आणि लेझर शो बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

****

ज्येष्ठा कनिष्ठा गौरी अर्थात महालक्ष्म्यांचं उद्या घरोघरी आगमन होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याच्या तयारीसाठी घरोघरी महिला वर्गाची लगबग सुरू झाली आहे. गौरीचे मुखवटे, साड्या, दागदागिने, मखर, तसंच सजावटीच्या साहित्याने आणि हे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत झालेल्या गर्दीने शहरातले रस्ते फुलून गेले आहेत.

****

बीड जिल्ह्यात भरधाव कंटेनरच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पेंडगाव फाटा इथं आज सकाळी ही घटना घडली. हे सर्वजण पेंडगावला दर्शनासाठी जात होते. या घटनेबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत तसंच मृतांच्या कुटुंबियांना शासन स्तरावरून तातडीनं सर्वोतोपरी मदत उपलब्ध करून दिली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी वाहतूक सुरक्षेबाबत अधिक कडक आणि प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देशही संबंधित विभागांना दिले असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

****

केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत. आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिरात त्या बोलत होत्या. 

****

छत्रपती संभाजीनगर इथं होली क्रॉस इंग्लिश हायस्कूलला संस्कृत अनुरागी शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. संस्कृत प्रतिष्ठान संस्थेतर्फे दिला जाणारा डॉ.चंपालाल देसरडा संस्कृत अनुरागी शाळा पुरस्कार या शाळेच्या मुख्याध्यापक सिस्टर सिंथिया फर्नांडिस, शाळेचे संस्कृत शिक्षक गिरीश जोशी आणि अनिरुद्ध महाजन यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संस्कृतदिनाच्या औचित्याने संस्कृत भाषेच्या प्रचार प्रसाराच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार दिला जातो.

****

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण -  म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या एक हजार ३२३ निवासी सदनिका आणि १८ भूखंडांच्या सोडतीद्वारे विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेला ०८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, मंडळाचे मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले यांनी ही माहिती दिली.

****

बीड विधानसभा क्षेत्रात मागील दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानाचे तातडीने पंचनामे पूर्ण करुन सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.

परळी वैजनाथ मतदारसंघात झालेल्या नुकसानाचा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज समग्र आढावा घेतला. या नुकसानाचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत अशा सूचना आमदार मुंडे यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या.

दरम्यान, मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणारी पाण्याची आवक मंदावल्याने, धरणाचे सर्व दरवाजे आज दुपारनंतर बंद करण्यात आले.

बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यात वाण नदीच्या पुरात वाहून गेलेले अनिल लोखंडे यांचा मृतदेह आज सकाळी सापडला. २७ तारखेला लोखंडे हे पुराच्या पाण्यात वाहून गेले होते.

****

No comments: