Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 30 August 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० ऑगस्ट २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या
दौऱ्यावर आहेत, त्यांनी आज जपानच्या
विविध प्रांतांच्या सोळा राज्यपालांशी संवाद साधला. प्राचिन सांस्कृतीक संबंधांमुळे
भारत-जपानचे समकालीन संबंध सतत वाढत असल्याचं त्यांनी म्हटलं. हे संबंध दोन्ही राष्ट्रांच्या
राज्य आणि प्रांत स्तरावर वाढायला हवे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. व्यापार, तंत्रज्ञान, पर्यटन, कौशल्य, सुरक्षा आणि सांस्कृतिक संबंधांना
चालना मिळेल, असं ते यावेळी म्हणाले. जपानचं तंत्रज्ञान आणि भारतीयांची
गुणवत्ता यामुळे क्रांती घडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जपानमधील प्रत्येक
प्रांताकडे विशिष्ट आर्थिक आणि तांत्रिक क्षमता असून भारतीय राज्यांकडे आपापल्या विविध
क्षमता आहेत असं म्हणत पंतप्रधांनांनी जपानी राज्यपालांना भारताच्या विकासयात्रेत सहभागी
होण्याचे निमंत्रण दिले.
****
अमेरिकेने लादलेल्या आयात शुल्कादरम्यान
भारत आणि रशियामधील सहकार्य वाढत असून याचाच एक भाग म्हणून रशियाचे राष्ट्राध्यक्ष
व्लादिमीर पुतिन या वर्षी डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहेत. तत्पुर्वी राष्ट्राध्यक्ष
पुतीन आणि पंतप्रधान मोदी हे चीनमधील तियानजिन इथं होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या
शिखर परिषदेच्या वेळी येत्या सोमवारी भेटतील, असं रशियाचे परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाकोव्ह यांनी
पत्रकारांशी बोलताना सांगितलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून
तेल खरेदी करत असल्याच्या पार्श्वभुमीवर भारतावर आयात शुल्क जाहीर केल्यानंतर रशियन
राष्ट्राध्यक्षांचा हा पहिलाच दौरा आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई
दौऱ्यावर आले आहेत. आपल्या या दौऱ्यात ते लालबागच्या राजाचं दर्शन घेणार असून, इतरही गणेश मंडळांना भेटी देतील.
यानंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन, मराठा आरक्षण आंदोलन, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी आदींबाबत आढावा घेणार आहेत, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे
यांचे कालपासून आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. आज त्यांना एक दिवसाची मुदतवाढ देण्यात
आली आहे. दरम्यान, आंदोलनकर्ते आक्रमक झाले
असून पालिका मुख्यालय आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरात मोठ्या प्रमाणावर त्यांनी
गर्दी केली आहे. गेल्या काही तासांपासून सीएसटी स्थानकासमोरील रस्ता अडवल्यामुळे मोठी
वाहतूक कोंडी झाली आहे. आझाद मैदानात पावसामुळे चिखल आणि पाणी साचल्याने
आंदोलकांनी मैदानात खडी टाकण्याची मागणी केली आहे.
****
जम्मू आणि काश्मीरमध्ये, रामबन जिल्ह्यातील राजगड तालुक्यात
द्रुपद गावात आज ढगफुटी झाल्याने तिघांचा मृत्यू झाला तर दोघे बेपत्ता झाले. बचाव पथकांकडून
घटनास्थळी शोधकार्य अजूनही सुरुच आहे. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर
राष्ट्रीय महामार्ग आज पाचव्या दिवशीही बंद राहिला. २७० किमी लांबीच्या महामार्गावर
दोन हजारांहून अधिक वाहने अडकली आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये इंधन, स्वयंपाकाचा गॅस, भाज्या आणि इतर आवश्यक वस्तूंचा गंभीर
तुटवडा आहे.
****
मराठवाड्यासह वनक्षेत्र वाढवण्यासाठी
प्रयत्न करावेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं
आहे. ते काल मुंबईत याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. वन विभागाने ३३ टक्के वनआच्छादन
निर्मिती करण्याचा आगामी चार वर्षांचा आराखडा या तीन महिन्यात सादर करावा असे निर्देशही
मुख्यमंत्र्यांनी दिले.
****
केंद्र शासनाने निश्चित केलेल्या
आधारभूत दरानुसार राज्यात पणन महासंघामार्फत कडधान्यं तसंच तेलबियांची खरेदी करण्यात
येणार आहे. आधारभूत दराने खरेदी करण्याकरीता ई-पिक पाहणी असलेला ७/१२ उतारा आवश्यक
आहे. ही खरेदी प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन प्रणालीद्वारे राबवली जाणार आहे. या योजनेचा
लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांची ई-पिक पाहणी शासनाने दिलेल्या कालावधीत पूर्ण करावी, असं आवाहन पणन महासंघातर्फे करण्यात
आलं आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या ठेवीदारांच्या
ठेवी परत करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी काल आढावा बैठक घेतली. या
संदर्भातील कामकाज गतीने होण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांशी पत्रव्यवहार केला जाईल, महिनाभरानंतर या संदर्भात परत आढावा
घेण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
दरम्यान, बीड जिल्ह्यात भरधाव कंटेनरने दिलेल्या
धडकेत चार जणांचा मृत्यू झाला. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर नामलगाव फाटा उड्डाणपुलाजवळ
आज सकाळी हा अपघात झाला. बीड ग्रामीण पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतलं आहे.
या अपघातात अन्य दोन जण जखमी झाले, त्यांच्यावर बीड जिल्हा
रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
हॉकी आशिया करंडक स्पर्धेच्या आपल्या
पहिल्या सामन्यात भारताने विजयी सलामी दिली आहे. बिहारमध्ये राजगीर इथं सुरू असलेल्या
या स्पर्धेत काल चार सामने झाले. यामध्ये भारतीय संघाने चीन संघाचा चार गोलविरुद्ध
तीन असा पराभव केला. भारताचा पुढचा सामना उद्या रविवारी जपान सोबत होणार आहे.
****
पॅरिस बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत
भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने उपांत्य फेरीत प्रवेश
करत एक पदक निश्चित केलं आहे. सात्विक चिराग जोडीने काल मलेशियाच्या जोडीचा २१ विरुद्ध
१२, २१ विरुद्ध १९ असा पराभव केला.
****
No comments:
Post a Comment