Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 30 August 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० ऑगस्ट २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
ऊर्जा कार्यक्षमतेत सर्वोत्तम कामगिरी करत महाराष्ट्र
देशभरात पहिल्या स्थानावर
·
राज्य सरकारचे विविध क्षेत्रासाठी सुमारे ३४ हजार कोटी
रुपयांचे सामंजस्य करार
·
मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावर
उपोषण-पोलिसांकडून आंदोलनाला एक दिवस मुदतवाढ
·
नांदेड तसंच लातूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला-अनेक धरणातून
पाण्याचा विसर्ग सुरू
·
जालना जिल्ह्यात भरधाव कार रस्त्यालगतच्या विहिरीत पडून
पाच जणांचा मृत्यू
आणि
·
क्रीडा क्षेत्रात पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी पाठपुरावा
करणार- केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचं आश्वासन
****
ऊर्जा कार्यक्षमतेत
सर्वोत्तम कामगिरी करत महाराष्ट्रानं देशभरात पहिलं स्थान पटकावलं आहे. केंद्रीय ऊर्जा
मंत्रालयानं काल राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक २०२४ जारी केला. त्यात ही माहिती
दिली. या निर्देशांकाला राज्य पातळीवर माहितीसाठ्याची देखरेख, ऊर्जा वापर
व्यवस्थापनाचा मागोवा, सर्वोत्तम पद्धतींना प्रोत्साहन तसंच ऊर्जा
कार्यक्षमतेल्या स्पर्धात्मक सुधारणांच्या प्रक्रियेत महत्त्वाचं स्थान आहे.
****
गुंतवणूकदारांना
महाराष्ट्रात सहज आणि सुरळीत अनुभव मिळावा यासाठी सरकार वचनबद्ध आहे. गुंतवणुकीच्या
प्रत्येक टप्प्यावर राज्य शासन भागीदार म्हणून सोबत राहील असं आश्वासन मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काल सुमारे ३४ हजार कोटी रुपयांच्या
विविध १७ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या, या करारांमुळे ३३
हजारापेक्षा जास्त रोजगारनिर्मिती होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. वार्ताहरांशी
बोलतांना मुख्यमंत्र्यांनी या करारांबाबत अधिक माहिती दिली...
बाईट
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दरम्यान, मराठा आंदोलनावरून
विरोधकांनी सोयीची भूमिका न घेता, आपली भूमिका स्पष्ट करावी,
असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. या आंदोलनात विरोधकांना राजकीय पोळी
भाजायची असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. आंदोलकांनीही नागरिकांना त्रास होऊ नये,
याची खबरदारी घेण्याचं तसंच राज्याची सामाजिक वीण सुरक्षित राखण्याचं
आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. मराठा समाजाला दिलेलं दहा टक्के आरक्षण कायम असल्याकडेही
मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं. ते म्हणाले...
बाईट
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या प्रकरणी
स्थापन मंत्रिमंडळ उपसमिती, सरकार आणि आंदोलकांशी चर्चेनंतर प्रस्ताव सादर करेल. तोपर्यंत
संयम राखण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
****
आपण मुख्यमंत्री
असताना मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलेलं आहे, त्या आरक्षणाचा
लाभ आजही मराठा समाजाला मिळत असल्याचं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी म्हटलं आहे. ते काल ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते. शासन म्हणून केलेले सर्व
प्रयत्न मराठा समाजासमोर आहेत, असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी
नमूद केलं. ते म्हणाले.
बाईट
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मराठा समाजासाठी
आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी महायुती सरकारनं केल्या आणि यापुढेही करत राहणार असल्याची
ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
****
दरम्यान, मराठा आरक्षण
प्रकरणी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी
आजचा एक दिवस वाढवून दिला आहे. आधी जरांगे यांना दिलेली परवानगी काल संध्याकाळी सहा
वाजता संपणार होती.
जरांगे
पाटील आपल्या समर्थकांसह काल आझाद मैदानात दाखल झाले. आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार
नाही, असा निर्धार व्यक्त करत, जरांगे यांनी उपोषण
सुरू केलं आहे.
****
मराठवाड्यात
पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र विभागातल्या अनेक धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने, धरणांतून
पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. नांदेड जिल्ह्यात ६९ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद
झाली. विष्णूपुरी प्रकल्पाचे ११ दरवाजे उघडण्यात आले असून, एक
लाख २९ हजार ७४३ घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदावरी पात्रात विसर्ग सुरू आहे.
नांदेड
जिल्ह्यात उमरी रेल्वे स्टेशनचे अधीक्षक ओमप्रकाश मीना यांचा पुराच्या पाण्यात वाहून
गेल्यानं मृत्यू झाला.
दरम्यान, जिल्ह्यात
उद्भवलेली पूर परिस्थिती लक्षात घेता पालकमंत्री अतुल सावे काल नांदेड इथं दाखल झाले.
अतिवृष्टीमुळे स्थलांतर केलेल्या नागरिकांची सावे यांनी काल भेट देऊन त्यांची विचारपूस
केली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे पूर्ण करुन अहवाल
शासनाकडे सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
दरम्यान, जिल्ह्यात
साथीच्या संभाव्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाचं आरोग्य पथक सतर्क आहे,
मात्र नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असं
आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे.
**
लातूर जिल्ह्यात
मांजरा धरणातून होणाऱ्या विसर्गाच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांना खबरदारी
घेण्याचं आवाहन लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं केलं आहे.
**
बीड जिल्ह्यातल्या
१६ महसुली मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. माजलगाव प्रकल्पातून काल रात्री १० वाजता
सांडव्याद्वारे सिंधफणा नदी पात्रात ५ हजार ९१९ घनफुट प्रति सेकंद वेगानं पाण्याचा
विसर्ग सुरू करण्यात आला.
**
हिंगोली
जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात जवळा पांचाळ परिसरात ढगफुटी सदस्य पाऊस झाला असून, अनेक वसाहतींमध्ये
पाणी शिरलं आहे. जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणाचे १४, तर इसापूर
धरणाचे ७ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
धाराशिव
शहर आणि परिसरातही काल सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे.
**
परभणी जिल्ह्यात
सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. गंगाखेड तालुक्यातील मासोळी प्रकल्पातून
कोणत्याही क्षणी विसर्गाची शक्यता असल्याने, नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन उपविभागीय
अधिकारी जीवराज डापकर यांनी केलं आहे.
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात चार मंडळात अतिवृष्टी झाल्याचं वृत्त आहे. जिल्हाधिकारी दिलीप
स्वामी यांनी यंत्रणेला सतर्क राहण्याचे तसंच प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करण्याचे निर्देश
दिले आहेत.
पैठण इथल्या
जायकवाडी धरणात सध्या सुमारे १४ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु असून, धरणाच्या
१८ दरवाजातून २८ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदापात्रात सोडलं जात आहे.
**
दरम्यान, राज्यात कोकण,
खानदेश, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर,
जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांसह पुणे
सातारा तसंच कोल्हापूरच्या घाट परिसरात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
****
जालना जिल्ह्यात
एक भरधाव कार रस्त्यालगतच्या विहिरीत पडून पाच जणांचा मृत्यू झाला. राजुर-टेंभुर्णी
मार्गावर गाडेगव्हाण फाटा इथं काल पहाटे ही दुर्घटना घडली. अपघातग्रस्त कारच्या धडकेत
रस्त्यावरून पायी चालणारे देळेगव्हाण इथले एक नागरिक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर
जालना इथल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची टेंभुर्णी पोलिस ठाण्यात
नोंद करण्यात आली.
****
राष्ट्रीय
क्रीडा दिन काल साजरा झाला. महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस
साजरा केला जातो. शांतीपूर्ण आणि सर्वसमावेशक समाजाला प्रोत्साहन देण्यासाठी खेळ, ही यंदाची
या दिवसाची संकल्पना आहे.
****
क्रीडा
क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करत असून, यामध्ये उद्योग
क्षेत्राला सहभागी करून घेण्याची गरज केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री
रक्षा खडसे यांनी व्यक्त केली. काल छत्रपती संभाजीनगर इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठातील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया-साईच्या परिसरात झालेल्या सत्कार सोहळ्यात
क्रीडापटूंना मार्गदर्शन करत होत्या. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र कायम चमकदार
कामगिरी करत असल्याबद्दल त्यांनी क्रीडापटूंचं कौतुक केलं. त्या
म्हणाल्या...
बाईट
- केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे
साई औरंगाबादचं
यावेळी साई छत्रपती संभाजीनगर असं नामकरण झाल्याचं, यावेळी खडसे यांनी
जाहीर केलं. विविध क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी करणाऱ्या क्रीडापटूंना रक्षा खडसे
यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
****
No comments:
Post a Comment